एक साधू होता. नदीत अर्घ्य देत असताना एक विंचू बुडताना त्यानं पाहिला. त्या विंचवाला काठावर ठेवावं म्हणून त्यानं तो ओंजळीत घेतला. विंचवानं लगेच साधूला डंख मारला अन् पुन्हा नदीत पडून बुडू लागला. साधूनं पुन्हा त्याला उचललं आणि काठाकडे येऊ लागला. विंचवानं पुन्हा डंख मारला. हा प्रकार अनेकदा झाला. अखेर काठावर येण्यात साधूला यश आलं आणि विंचू पळून गेला. शिष्यानं विचारलं, ‘‘महाराज जो विंचू चावला त्यालाच तुम्ही कशाला वाचवलं?’’ साधू म्हणाले, ‘‘तो बिचारा त्याचा चावण्याचा धर्म सोडत नाही अन् मीसुद्धा माझा माणुसकीचा धर्म सोडू शकत नाही...’’ असंच काहीसं कोरोनामुळे औरंगाबाद येथे घडले.
औरंगाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरला रुग्णसेवा करताना कोरोनाची बाधा झाली. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात (मिनी घाटी) उपचार सुरू आहेत. त्यांना ज्या वॉर्डात ठेवण्यात आले आहे त्याच वॉर्डात अजून १६ कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. डॉक्टर स्वतः कोरोनाबाधित असूनही ते आपल्यासोबतच्या रुग्णांचे समुपदेशन करीत आहेत. लवकरात लवकर कोरोनामुक्त होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करीत आहेत. कोरोनाचा राक्षस बाधित करण्याचा त्याचा धर्म सोडत नाही. मग मी माझा डॉक्टरी धर्म कसा सोडू, असाच काहीसा संदेश ते आपल्या कृतीतून देत आहेत.
२८ मार्चची रात्र. अचानक एक महिला आणि तिचा पती रुग्णालयात आले. महिलेची प्रकृती बिघडलेली होती. कोरोनाच्या संशयाने डॉक्टरांनी तिला बाहेर कुठे प्रवास केला, परराज्यांतून, परगावांतून आलेल्या कुणाला भेटलात हे विचारले. पण, परराज्यांतील प्रवास करून आलेले असतानाही त्यांनी नाही म्हणून खोटे सांगितले. तरीही खबरदारी म्हणून चेहऱ्याला मास्क आणि हातमोजे घालून डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले. ३१ मार्चला संबंधित महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. त्याचक्षणी डॉक्टर आणि त्यांचे एक सहयोगी डॉक्टर यांच्यासह रुग्णालयातील सात कर्मचारी रुग्णालयातच क्वारंटाइन झाले. ३ एप्रिलला डॉक्टर वगळता सहा कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. डॉक्टरांच्या चाचणीत शंका आल्याने पुन्हा त्यांच्या लाळेचे नमुने घेत त्यांना जिल्हा प्रशासनाने क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला. ५ एप्रिलला जो अहवाल आला तो पॉझिटिव्ह होता. त्यामुळे डॉक्टरांना जिल्हा सामान्य रुग्णालयात शिफ्ट केले.
कुटुंबीयांच्या काळजीने भीती
बाधित असलेल्या डॉक्टरांच्या आईचे वय ७० आहे. १०-१२ वर्षांच्या दोन मुली आहेत. त्यांची पत्नीसुद्धा डॉक्टर आहे. पण, आई आणि मुलीचे वय पाहता २९ व ३० मार्चदरम्यान आपल्याकडून त्यांनाही संसर्ग झाला असावा, या भीतीने डॉक्टरांना ग्रासले. डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये या चौघींनाही क्वारंटाइन करण्यात आले. सुदैवाने चौघींचीही कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे डॉक्टर तणावमुक्त झाले.
सध्या डॉक्टरसह १७ कोविड-१९ चे रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने त्यांची योग्य ती काळजी घेतली जात आहे. कोरोनाबाबत सोशल मीडियातील मेसेज, व्हिडिओ यामुळे बाधित रुग्णांपैकी काहीजण प्रचंड घाबरलेले होते. त्यांचे समुपदेशन करण्याचे काम आता हे बाधित डॉक्टर करीत आहेत. कोरोना झाला म्हणजे मृत्यू होत नाही. कोरोनातून अवघ्या काहीच दिवसांत व्यक्ती पूर्णतः बरी होते, असे त्यांना हे डॉक्टर समजावून सांगत आहेत. शिवाय प्रतिकारशक्ती कशी वाढवावी, आहार कसा घ्यावा, व्यायामाचे महत्त्व याचेही मार्गदर्शन करीत आहेत. एकूणच काय, स्वतः रुग्ण असून, हे बाधित डॉक्टर आपल्या डॉक्टरी धर्माचे पालन करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.