Sambhaji Nagar : संशयाच्या भुताने ‘संसारा’ला आग! ; पत्नीने घर पेटविल्याची डॉक्टर पतीची पोलिसात तक्रार
सिडको : पती-पत्नीचे भांडण झाले. यात पत्नीने रागाच्या भरात घराला आग लावल्याची तक्रार पतीने पोलिसात दिली. ही घटना सोमवारी (ता. २९) सकाळी सहा वाजता एन-२ भागातील नालंदा अपार्टमेंटमध्ये घडली. पती-पत्नी दोघेही डॉक्टर आहेत. पत्नी घेत असलेल्या संशयावरून हा प्रकार घडल्याचे पतीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले. या प्रकरणी पत्नीविरुद्ध मुकुंदवाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला. दरम्यान, संशयाच्या भुताने त्यांच्या संसारालाच आग लावल्याची नागरिकांत चर्चा आहे.
या प्रकरणी पती डॉ. गोविंद सुभाषराव वैजवाडे (वय ४० रा. फ्लॅट क्रमांक १२, नालंदा कॉम्पलेक्स, एपीआय कॉर्नर, एन २, मुकुंदवाडी) यांनी तक्रार दिली. डॉ. वैजवाडे हे फिनिक्स कंदरफळे हॉस्पिटल, सिडको बस स्टँड येथे नोकरीला आहेत. त्यांची पत्नी डॉ. विनीता गोविंद वैजवाडे ऊर्फ विनीता वसंत भायेकर (वय ४०) यासुद्धा डॉक्टर असून, नक्षत्रवाडी येथील धनेश्वरी आयुर्वेद कॉलेजमध्ये लेक्चरर आहेत. वैजवाडे दांपत्याचा २०१९ मध्ये विवाह झाला आहे. या दांपत्याला मूलबाळ नाही; तसेच पत्नी वैजवाडे यांच्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यात बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू आहेत, असे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.
रात्री कडाक्याचे भांडण
२८ जानेवारीला रविवारची सुटी असल्याने पती-पत्नी घरीच होते. रात्री ११ वाजता त्यांच्यात घरगुती कारणावरून वाद सुरू झाला. यावेळी वैजवाडे यांनी मध्यस्थीसाठी शेजाऱ्यांना बोलावून घेतले. शेजाऱ्यांनी विनीता यांना समजावून सांगितले. यानंतर रात्री दीड वाजता विनीता यांच्या सांगण्यावरून शेजाऱ्यांनी विनीता यांना फिनिक्स हॉस्पिटलमध्ये सोडले. या ठिकाणी वैजवाडे नोकरीला आहेत. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर विनीता यांनी डॉ. कंदरफळे यांना माहेरी नांदेडला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनला सोडण्याचा आग्रह केला. मात्र, डॉ. कंदरफळे यांनी विनीता यांची समजूत घातली.
सकाळी सहालाच पेटवला फ्लॅट
वैजवाडे यांनी दिलेल्या तक्रारीचा आशय असा ः सोमवारी सकाळी सहा वाजताच विनीता या पुन्हा नालंदा कॉम्पलेक्स येथे फ्लॅटवर आल्या. आल्या बरोबर त्यांनी जोरजोरात आरडाओरड करीत दरवाजा ठोठावणे सुरू केले. वैजवाडे यांनी वाद होऊ नये म्हणून पुन्हा शेजाऱ्यांना बोलावून घेतले. शेजारी आल्यानंतर वैजवाडे हे दरवाजा उघडून फ्लॅटच्या बाहेर पडून इमारतीच्या खाली निघून आले. काही वेळाने त्यांना शेजाऱ्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला.
डॉ. वैजवाडे वर जात असताना विनीता या बॅग घेऊन खाली निघून गेल्या. वैजवाडे यांनी वर जाऊन पाहिले असता त्यांच्या फ्लॅटला आग लागलेली दिसली. विनीता यांनी आग लावल्याची माहिती वैजवाडे यांना शेजाऱ्यांनी दिली. त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दल आणि मुकुंदवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झणझण यांच्या मार्गदर्शनखाली स्टेशन अधिकारी आर. के. सुरे, उप अग्निशमन अधिकारी एस. के. भगत, ड्यूटी इंचार्ज एस. एस. कुलकर्णी, एस. ई. भोसले, अग्निशामक अशोक वेलदोडे, प्रवीण पचलोरे, आनंद भारसाखळे, राजू राठोड, लालचंद दुबेले, दीपक लव्हाळे, अब्दुल हमीद आदींनी ही आग आटोक्यात आणली.
लाखो रुपयांचे नुकसान
या आगीत डॉक्टर दांपत्याच्या फ्लॅटमधील सोफासेट, दोन फ्रिज, एसी, टीव्ही, कूलर, लाकडी कपाट, पलंग, मोठे शोकेस, त्यामधील वस्तू, घराचे दरवाजे, खिडक्या, घराची मूळ कागदपत्रे, डॉ. वैजवाडे यांचे पदवी प्रमाणपत्र, कपडे आदी साहित्य खाक होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले.
मोठा अनर्थ टळला
या इमारतीमध्ये एकूण १२ फ्लॅट आहेत. डॉक्टर दांपत्य हे वरच्या मजल्यावर राहत होते. आग लावल्यानंतर काही वेळातच आगीचे लोळ गॅलरी तसेच खिडकीतून बाहेर येऊ लागले. यामुळे एकच खळबळ उडाली. फ्लॅटमध्ये दोन गॅसच्या टाक्या असल्यामुळे इतर फ्लॅटधारकांनी आपआपल्या फ्लॅटमधून पळ काढला. इमारतीमधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.