छत्रपती संभाजीनगर : ‘हम खाने-पिनेवाले लोगा हैं, हमारा कोई क्या बिगाड लेगा’, असे म्हणत रस्त्यावरच बिअर पिणाऱ्या दारुड्याच्या सणकन कानाखाली वाजवत पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी क्षणार्धात त्याचे हवेत उडणारे विमान जमिनीवर आणले. तीन दिवसांपूर्वी रात्री साडेअकरा वाजता नागेश्वरवाडी भागातील वर्षम बिअर शॉपीबाहेर हा प्रकार घडला. या प्रकरणी शॉपीचालकासह दोन ग्राहकांवर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नशेच्या बाजाराविरुद्ध ‘सकाळ’ने सातत्याने वृत्तमालिका प्रसिद्ध करीत हा प्रकार उघडकीस आणला. त्याची दखल पोलिसांनी घेतली असूनस कारवाया सुरू केल्या आहेत. परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त बगाटे हे रात्री साडेअकरा वाजता नागेश्वरवाडी भागातून कारने जात होते. यावेळी वर्षम बिअर शॉपीसमोर त्यांना रात्री उशिरापर्यंत काही दारुडे बाहेरच बिअर पिताना आढळून आले.
बगाटे यांनी हा प्रकार पाहताच कार थांबवून मोबाइलद्वारे चित्रिकरण सुरू केले. यावेळी मद्यपींनी सिव्हिल ड्रेसमध्ये असलेल्या उपायुक्त बगाटे यांना ओळखले नाही आणि ‘हम खाने-पिनेवाले लोगा हैं, हमारा कोई क्या बिगाड लेगा’ असे आपसात बोलणे सुरू केले. यानंतर एका मद्यपीने उपायुक्त बगाटे यांना शूटिंग करण्याचे कारण विचारत अरेरावी सुरू केली. यावेळी बगाटे यांनी त्याच्या कानाखाली आवाज काढला. बगाटे यांनी क्रांती चौक पोलिसांना माहिती देत कारवाईसाठी वाहन बोलावून घेतले. तोपर्यंत या दारुड्यांना समोरील व्यक्ती कोणीतरी अधिकारी आहे, याचा अंदाज आला होता. त्यांनी दुचाकीवर पलायनाचा प्रयत्न केला; तोपर्यंत बगाटे यांनी दारुड्यांना ताब्यात घेतले. तोपर्यंत बिअर शॉपीचा चालक फरार झाला.
दोघांवर गुन्हा दाखल
पथकाने वर्षम बिअर शॉपी गाठत जयराजसिंग गोपालसिंग झाला (वय ३१, रा. धावणी मोहल्ला) आणि अजय दुबिले पाटील (वय ३१, रा. नागेश्वरवाडी) यांना ताब्यात घेतले. शॉपीचालक गौरव धनराज राठोड (वय २३, रा. जाधववाडी) हा पसार झाला. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक संतोष सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून गौरव राठोडसह झाला आणि दुबिलेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
नागरी वसाहतीत त्रास असल्याबद्दल नोटीस
उपायुक्त बगाटे यांनी कठोर भूमिका घेत शॉपीचालक गौरव राठोड याला बिअर शॉपी नागरी वस्तीच्या ठिकाणी असून, रात्री ग्राहकांची जास्त गर्दी होऊन परिसरातील नागरिकांना त्रास होतो. तसेच नियमापेक्षा जास्त वेळ बिअर शॉपी चालू ठेवत असल्याचे आढळून आल्याने महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार नोटीस बजावण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार पीएसआय मयूर निकम यांनी ही नोटीस बजावली आहे.
रात्री नागेश्वरवाडी परिसरातून जात असताना रस्त्याला लागून असलेल्या बिअर शॉपीबाहेर मद्यपींची शिवीगाळ, गोंधळ सुरू होता. त्यांना पोलिसांच्या स्टाईलमध्ये समज देण्यात आली. तसेच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, बिअर शॉपीचालकाला नोटीस बजावण्यात आली आहे.
- नितीन बगाटे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ १
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.