Chhatrapati Sambhaji Nagar : पोलिस यंत्रणा आता अलर्ट मोडवर....दीड हजार गुन्हेगारांची कुंडली तयार

Chhatrapati Sambhaji Nagar : आचारसंहितेच्या लागू झाल्यानंतर पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे, ज्यात दीड हजार गुन्हेगारांची कुंडली तयार करण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात सामाजिक तेढ टाळण्यासाठी पोलिस दल सज्ज आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar
Chhatrapati Sambhaji Nagarsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच शहर पोलिस आयुक्तालयाअंतर्गत तीन विधानसभा मतदारसंघ; तसेच फुलंब्री मतदारसंघात प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी पोलिस दल तयारीला लागले आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने दीड हजार समाजकंटकांची कुंडली तयार करण्यात आली आहे; तसेच अवैध धंद्यांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे.

शहर पोलिसांनी सावधगिरी बाळगत सतरा पोलिस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांची कुंडली तयार केली आहे. यामध्ये सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर प्रामुख्याने लक्ष आहे. जे सराईत गुन्हेगार सक्रिय आहेत, त्यांचे सध्याचे लोकेशन, कारागृहात आहेत का बाहेर पडलेले आहेत, याची माहिती घेण्यात येत आहे.

पोलिस ठाणेनिहाय गुन्हेगारांची माहिती मागविण्यात येत असून, त्या गुन्हेगारांची पार्श्वभूमी पाहून त्यांच्यावर हद्दपारी किंवा स्थानबद्धतेची कारवाई करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात पोलिस दलाने १४५७ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. यंदा हा आकडा वाढण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली.

सोशल मीडियावर ‘सायबर’ची नजर

सध्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर राजकीय मंडळी किंवा त्यांच्या समर्थकांकडून पोस्ट अपलोड केल्या जातात. अनेकवेळा या पोस्टवरून वाद होऊन दोन समाजांत तेढ निर्माण होण्याची शक्यता असते. सायबर पोलिस ठाण्याच्या वतीने सोशल मीडियाच्या या सर्व प्लॅटफॉर्मवर नजर ठेवण्यात येणार असून, आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

शस्त्रे करावी लागणार जमा

निवडणूक काळात पोलिस सर्वांची शस्त्रे जमा करून घेतात. यात काहींना सुरक्षेच्या कारणास्तव सूटही दिली जाते. दरम्यान, पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी शस्त्र परवान्यांचा आढावा घेतला. पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत १ हजार १४६ शस्त्र परवानाधारक आहेत. त्यातील अनेकांनी २०१२ पासून परवान्याचे नूतनीकरण केलेले नसल्याचे आढळले. अशा ९७ जणांना पवार यांनी नोटिसा बजावल्या आहेत. आचारसंहिता जारी झाल्यामुळे आता या शस्त्र परवानाधारकांना शस्त्रे जमा करावी लागणार आहेत.

पावणेचार हजार पोलिस तैनात

शहर पोलिस दलात सर्व अधिकारी-कर्मचारी, अंमलदार मिळून ३ हजार ८५१ पोलिस कर्मचारी आहेत; तसेच वाहतूक शाखेत २१० कर्मचारी आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण पोलिस दल कर्तव्यासाठी तैनात करण्यात आले आहे. मतदान आणि मतमोजणीच्या काळात बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे.

निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही बंदोबस्तासाठी सज्ज आहोत. लोकसभा निवडणुकीचा अनुभव बघता विधानसभा निवडणुकीचीदेखील आमची तयारी झालेली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती पोलिस ठाणेनिहाय मागविण्यात येत आहे. यानंतर गरजेनुसार या गुन्हेगारांवर हद्दपार किंवा स्थानबद्धतेची कारवाई करण्यात येणार आहे.

— नितीन बगाटे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ-१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.