Sambhaji Nagar : उद्योगांना विस्तारासाठी मिळेना जागा! ; गट नंबरमधील शेती विकत घेण्याची उद्योजकांवर वेळ

ज्या उद्योगांमुळे छत्रपती संभाजीनगरचा वेगाने विकास झाला, तेथीलच वाळूज एमआयडीसीत उद्योजकांना प्रकल्प विस्तारासाठी जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे गट नंबरमधील शेती विकत घेत उद्योग वाढवावा लागत आहे
Sambhaji Nagar
Sambhaji Nagar sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : ज्या उद्योगांमुळे छत्रपती संभाजीनगरचा वेगाने विकास झाला, तेथीलच वाळूज एमआयडीसीत उद्योजकांना प्रकल्प विस्तारासाठी जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे गट नंबरमधील शेती विकत घेत उद्योग वाढवावा लागत आहे. पुण्यात चाकण एमआयडीसी वेगाने विस्तारली. चाकण-५चे कामही सुरू आहे. तेथील प्रशासन, राजकीय नेत्यांनी प्राधान्याने लक्ष दिल्याने चाकण उद्योगनगरी बहरली. वाळूजबाबत मात्र सर्व उलट दिसत असून वाळूज फेज-२ सुद्धा झालेले नाही. छत्रपती संभाजीनगरच्या प्रशासनाची, राजकीय नेत्यांची तशी मानसिकताही नसल्याने उद्योगांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना उद्योजकांनी व्यक्त केली आहे.

बजाज कंपनी आल्यानंतर वाळूज एमआयडीसीचा विकास झाला. बजाजमुळे तीन ते चार हजार व्हेंडर तयार झाले. येथील उद्योगांमध्ये क्षमता असल्याचे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे. आता मात्र जागा उपलब्ध होत नसल्याने उद्योगांचा विस्तार रखडला आहे. काही उद्योजकांनी जास्तीचे पैसे खर्च करून गट नंबरमध्ये जागा घेतल्या. तिथे पायाभूत सुविधा नसल्याने अडचणी आहेत. आजघडीला वाळूज फेज-२ साठी १२०० ते १३०० हेक्टर जागा दिली तरी ती कमी पडेल, एवढी मागणी आहे. काही वर्षांपासून औद्योगिकीकरणाकडे लक्ष देण्यासाठी कोणालाच वेळ नसल्याने हे होत असल्याचा आरोप काही उद्योजकांनी केला आहे.

Sambhaji Nagar
Sambhaji Nagar Crime : सिडकोत बंगला फोडून साडेपाच लाख लंपास

पायाभूत सुविधांची गरज

वाळूज एमआयडीसीतील काही उद्योजकांनी शेतजमीन खरेदी करीत करोडी, ढोरेगाव आणि नगर रोड या भागात विस्तार केला आहे. शेंद्रा एमआयडीसीत जागा कमी पडत असल्याने अतिरिक्त शेंद्रा होत आहे. यासाठीच्या भूखंडाची मोजणीही एमआयडीसीकडून केली जात आहे. दुसरीकडे ऑरिक शेंद्रा आणि ऑरिक बिडकीन विकसित केले जात आहे. काही वर्षांनी तिकडे जागा कमी पडेल. दुसरीकडे वाळूज परिसरात इको सिस्टीम तयार आहे. त्यामुळे येथे फेज-दोन राबवत उद्योजकासाठी आवश्‍यक पायाभूत सुविधा द्याव्यात, अशी मागणी मसिआ व सीएमआयएने केली आहे.

वाळूजची क्षमता असताना फेज-२ होणे गरजेचे आहे. देश पाच ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यात मराठवाड्यातील उद्योजक हातभार लावण्यास तयार आहेत. यासाठी कोट्यवधींची मशिनरी आणण्याची आमची तयारी आहे. वाळूजला इको सिस्टीम तयार आहे, कृषी उद्योग आहेत. यामुळे वाळूज फेज दोनसाठी वाढीव एक हजार एकर जागेची आवश्‍यकता आहे.

— दुष्यंत पाटील,

अध्यक्ष, सीएमआयए

उद्योगांना जागा कमी पडत असल्याने एमआयडीसी वाळूज फेज-२ व्हावा, अशी मागणी आम्ही उद्योग विभागाकडे लावून धरली आहे. पुणे महामार्गावर गंगापूर तालुक्यात शेती महामंडळाची बाराशे एकर जमीन आहे. ती मिळावी, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. ही जागा मिळाल्यास फायदा होईल.

ज्या उद्योगांवर शहराचे अर्थकारण अवलंबून आहे, त्याकडे लक्ष देण्यासाठी कोणाकडेच वेळ नाही. आज चाकणमध्ये फेज-५चे काम सुरू आहे. आपल्याकडे उद्योजक जागेची मागणी करीत असताना मिळत नाही. समस्यांवर मात करीत उद्योजकांनी गट नंबरमध्ये उद्योगांचा विस्तार केला. आणखी बाराशे ते तेराशे हेक्टर जागा दिली तरी तीपण कमी पडेल.

— किरण जगताप,

माजी अध्यक्ष, मसिआ

पुण्याचा औद्योगिक विकास झाला. कारण त्यांचे लोकेशन हे मुंबई एक्स्प्रेस वेवर आहे. शिक्षण आणि राहण्यासाठी छत्रपती संभाजीनगर हे शहरसुद्धा चांगले आहे. समृद्धीलगत वाळूज फेज-२ सुरू केल्यास हजारहून अधिक उद्योग इथे येतील. ज्यांचे उद्योग सध्या सुरू आहेत त्यांच्यासाठी जागा राखीव ठेवाव्यात. तक्रारी सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी दोन दिवस येथे यावे.

— मुकुंद कुलकर्णी,

उद्योजक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.