छत्रपती संभाजीनगर : शहरातील नालेसफाईचे ९७ टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी केला असला तरी अद्याप अनेक नाल्यांमध्ये गाळ दिसून येत असल्याने महापालिकेच्या नालेसफाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. काही नाल्यांमध्ये प्लॅस्टिकचा कचरा देखील काढण्यात आलेला नाही. त्यामुळे पावसाळ्यात नाले तुंबण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महापालिकेतर्फे दरवर्षी मॉन्सूनपूर्व तयारी म्हणून महापालिकेतर्फे नाले सफाई केली जाते. अनेक वर्षे महापालिकेतर्फे नालेसफाईची निविदा काढली जात होती. मात्र, कंत्राटदारांनी केलेल्या कामांवर माजी नगरसेवकांसह नागरिक नाराजी व्यक्त करीत होते.
या कामावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत होता. त्यामुळे खर्चात बचत व नालेसफाईची कामे चांगल्या प्रकारे व्हावीत, यासाठी महापालिकेने स्वतःच्या यंत्रणेमार्फत नालेसफाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभागाला जेसीबी, पोकलेन, टिप्पर, ट्रॅक्टर्स अशी वाहने देण्यात आली आहेत. मोठ्या नाल्यांमध्ये जेसीबी, पोकलेनचा वापर करून, तर छोट्या नाल्यांची मजुरांमार्फत सफाई केली जात आहे. महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी नालेसफाईच्या कामाचा नुकताच आढावा घेतला.
त्यानंतर त्यांनी नालेसफाईचे ९७ टक्के काम पूर्ण झाल्याच दावा केला. उर्वरित कामे ३ जूनपर्यंत पूर्ण होतील, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, सोमवारी शहरातील किलेअर्क, बारुदगरनाला, गांधीनगर, चुनाभट्टी, औरंगपुरा, समर्थनगरसह अनेक ठिकाणी नाल्यातील कचरा काढण्यात आला नसल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, महापालिकेच्या नालेसफाई संदर्भात नागरिकांच्या काही तक्रारी असतील तर नागरिकांना थेट तक्रारी करता याव्यात यासाठी नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. नियंत्रण कक्षात संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
पावसाळा आला तोंडावर
पावसाळा तोंडावर आला असून, मॉन्सून काही दिवसांत महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे लवकरात लवकर नालेसफाईची कामे महापालिकेला पूर्ण करावी लागणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.