वडिलोपार्जित चालत असलेला सोनारांचा व्यवसाय हा आजघडीला मोठे भांडवलदार आणि मशीनच्या साह्याने तयार होणारे दागिने यामुळे अडचणीत आला. परिणामी, शासनाने ज्याप्रमाणे हॉलमार्कचा सक्तीचा कायदा केला, त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यात हॉलमार्कचे सेंटर उभारावे; तसेच सोन्यातील मोडच्या व्यवहारात दहा हजारांची मर्यादा वाढवत ती दोन लाखांपर्यंत करावी. सोबतच सोनार समाजाच्या मुलांच्या भवितव्यासाठी एक स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करावे, दर महिन्याला व वर्षाला भरण्यात येणारे टीडीएस, टीसीएस, वार्षिक लेखाजोखा या कागदी कामांतून सोनारांची सुटका करावी, अशी अपेक्षा सराफा व्यावसायाकांनी व्यक्त केली.
‘सकाळ संवाद’ उपक्रमात मंगळवारी (ता. २१) सराफा असोसिएशन व ऑल इंडिया सोनार फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक, ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे अध्यक्ष मोहन हिवरकर, कोषाध्यक्ष आतिष सवाईवाला, सदस्य किशोर पडवले, मनोज वर्मा, अशोक अधिकार व विकास अधिकार उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सोनार समाज व सराफा व्यवसायासंदर्भात चर्चा केली. यावेळी मंडलिक म्हणाले, ‘‘गेल्या अनेक पिढ्यांपासून सोने-चांदीचा पारंपरिक व्यवसाय आम्ही करीत आहोत. या व्यवसायात आता इतर मोठे भांडवलदार व व्यावसायिकांनी शिरकाव केला. त्यामुळे पारंपरिक व्यावसायिक, कारागीर यांच्यावर उपासमारीची वेळ आली.’’ आतिष सवाईवाला म्हणाले, ‘‘शासनाने इतर लघू उद्योगांप्रमाणे सोनार व्यावसायिकांनाही सवलती; तसेच जीएसटी, टॅक्स या करासंदर्भात सवलत द्यावी. केवळ सोन्याचा भाव वाढला म्हणून सोनाराचा व्यवसाय वाढतो असे नाही.
त्या प्रमाणात त्याला इतर करही द्यावे लागतात. सोनाराच्या व्यवसायाव्यतिरिक्त अधिक रक्कम ही कराच्या माध्यमातून शासनाला द्यावी लागते. त्यामुळे शासनाने सोन्याची मोड करण्यासाठीच्या रकमेत दहा हजारांपर्यंत मर्यादा ठेवली आहे, ती वाढवून दोन लाखांपर्यंत करावी; कारण सोन्याची मोड करण्यासाठी आलेला ग्राहक हा अत्यंत गरीब व मध्यमवर्गीय असतो. त्याला रुग्णालय व घरगुती कामासाठी तो पैसा हवा असतो. मात्र, केवळ त्याला दहा हजारांपुरती रक्कम मिळत असल्याने त्याचे नुकसान होते. यामुळे शासनाने मोड व्यवहाराच्या रकमेत वाढ करावी.’’
सोन्या-चांदीचा हा पारंपरिक व्यवसाय आहे. तो अनेक पिढ्यांपासून पुढच्या पिढीपर्यंत तसाच सुरू आहे. यात अनेक सोनार व कारागीर स्वतःच्या हस्तकलेतून दागिने घडवितात. त्याला एक सुंदर असे रूप देण्याचे काम कारागीर करतात.
मात्र, आता अनेक मोठे व्यावसायिक व भांडवलदारांनी सोन्याच्या व्यवसायात प्रवेश केला. त्यामुळे मशीनच्या साह्याने सोने घडवायला सुरवात झाली. परिणामी, जिल्हा व तालुक्यात असणाऱ्या कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
कारागिरांच्या हाताला काम नसल्याकारणाने वडिलोपार्जित चालत आलेली हस्तकला आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शासनाने छोटे व्यापारी आणि कारागिरांसाठी नवीन व्यवसायाच्या संधी निर्माण करून द्याव्यात, असे मोहन हिवरकड म्हणाले.
सराफा व्यवसाय हा श्रीमंत आणि प्रतिष्ठित समजला जातो. मात्र, सोनार व्यावसायिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मिळकतीपेक्षा इतर कर भरण्यातच अर्धी कमाई जाते; तसेच सराफा दुकानांसमोर हातगाड्या उभ्या करून अनेकजण व्यवसाय करतात. त्यांच्या व्यवसायाला आमचा विरोध नाही.
परंतु, काही हातगाडीवाले हे आमच्या दुकानाची रेकी करतात. यामुळे त्यांच्यापासून आम्हाला धोका आहे. त्यामुळे पोलिस व महापालिकेने अशांवर वचक घालावा. शिवाय सण आणि उत्सवाच्या काळात पोलिसांनी सराफा दुकान परिसरात गस्त घालावी.
सोन्याचा व्यवसाय जगभरात पोचल्यामुळे शासनाने हॉलमार्क कायदा केला. मात्र, इतर ठिकाणांहून आलेल्या सोन्याची मोड व डाग करण्यात येते. मात्र, त्या कारागीर व सोनाराचे कुठेच नाव होत नाही. त्यामुळे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हॉलमार्क सेंटर उभारले, तर तेथील स्थानिक कारागिरांची ओळख ही जगाच्या पाठीवर होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.