Chhatrapati Sambhajinagar News : रिकाम्या गाळ्यांमध्ये मद्यपींच्या पिण्यासाठी सोय

विविध वाइन शॉपचालकांनी दारू दुकानाच्या आजूबाजूलाच मद्यपींच्या पिण्यासाठी सोय करून ठेवली आहे. ‘सकाळ’ने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये हे वास्तव समोर आले.
alcoholics
alcoholicssakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - गारखेडा हा संमिश्र तसेच उच्चभ्रू नागरी वसाहत आणि बाजारपेठेचा मोठा परिसर आहे. मात्र, येथील विविध वाइन शॉपचालकांनी दारू दुकानाच्या आजूबाजूलाच मद्यपींच्या पिण्यासाठी सोय करून ठेवली आहे. ‘सकाळ’ने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये हे वास्तव समोर आले.

मद्यपींसाठी चायनीज सेंटर तसेच रिकाम्या गाळ्यांमध्येही सोय करून ठेवण्यात आली आहे. नागरिक, महिला व तरुणांना या गोष्टींचा प्रचंड त्रास होत आहे. पोलिस कारवाई करीत असताना राज्य उत्पादन शुल्क विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.

गारखेडा परिसरात काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती तसेच बाजारपेठदेखील वाढली आहे. लोकवस्ती वाढल्यानंतर या भागातील वाइन शॉप तसेच दारूच्या दुकानांची संख्यादेखील वाढली. याचा त्रास सर्वसामान्यांना होत आहे. मात्र, मद्यपींच्या धाकामुळे कोणीही नादी लागत नसल्याचे चित्र आहे.

कुठे काय आढळले?

मंदिर चौक ते पुंडलिकनगर रोड - रस्त्यावर पाणी, ग्लास, चखणाही

या रस्त्यावर एका शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये पहिल्या मजल्यावर देशी-विदेशी दारूचे दुकान आहे. या दुकानाच्या आजूबाजूला इतर व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. रात्री आठ वाजेनंतर शेजारील दुकाने बंद झाल्यावर या वाइन शॉपच्या बाजूलाच इतर दुकानांसमोर मद्यपी बिनधास्त रस्त्यावर रिचवत बसलेले दिसून आले. दुकानाच्या एका बाजूला गाळ्यामध्ये तसेच चायनीज सेंटरमध्ये मद्यपींसाठी पिण्याची सोय करण्यात आली आहे. येथे पाण्याचे जार, डिस्पोजल ग्लास व वेफर्स आदी उपलब्ध आहे.

जवाहरनगर पोलिस ठाणे चौक - टेबल, खुर्ची टाकून सोय

जवाहरनगर पोलीस ठाण्यासमोरील चौकात वाहतूक सिग्नल आहे. या चौकातच एका इमारतीच्या तळमजल्यावर देशी-विदेशी दारूचे दुकान आहे. भरचौकात असलेल्या या दुकानात सायंकाळनंतर मद्यपींची जत्राच भरते. या दुकानातून दारू विकत घेतल्यास मद्यपीला पिण्यासाठी जास्त अडचण येऊ नये म्हणून या शॉपचालकाने पूर्ण काळजी घेतली आहे. दुकानाच्या मागेच मद्यपींसाठी मोकळा गाळा आहे.

या ठिकाणी भेट दिल्यानंतर विदारक दृश्य दिसून आले. सर्वत्र गलिच्छ वातावरण, दारूचा किळसवाणा दर्प, तेथील एका टेबलापाशी उभे राहून दारू पिणारे मद्यपी, जमिनीवर रिकाम्या बाटल्या, डिस्पोजल ग्लास, नशेत धुंद झालेले मद्यपी त्या वातावरणात आढळले. तसेच या वाइन शॉपच्या मागच्या बाजूला असलेल्या एका आॅम्लेट सेंटरमध्येदेखील मद्यपींची टेबल, खुर्ची टाकून बसण्याची सोय करण्यात आलेली होती.

दुकानाच्या एका बाजूला पाण्याच्या बाटल्या, डिस्पोजल ग्लास, चखणा विकणाऱ्याने टेबल मांडले होते. दुकानातून दारू घेतल्यानंतर मद्यपी येथून गरजेचे साहित्य विकत घेत होते. विशेष म्हणजे, या ठिकाणी मद्यपींच्या सोयीसाठी बिल देण्यासाठी या दुकानदाराने फोन पे स्कॅनरदेखील ठेवल्याचे दिसून आले!

‘वरकमाई’मुळे अधिकाऱ्यांची डोळेझाक

राज्य उत्पादन शुल्क विभागाने असे प्रकार रोखण्यासाठी विभागनिहाय निरीक्षकांची नेमणूक केलेली आहे. मात्र, या विभागातील कनिष्ठांपासून ते वरिष्ठांपर्यंत प्रत्येक अधिकारी या अवैध प्रकाराला पाठीशी घालत असल्याचे दिसते. देशी-विदेशी दारू दुकानदारांकडून मिळणाऱ्या ‘वरकमाई’मुळे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वाइन शॉप, बिअर शॉपीच्या आजूबाजूलाच दारू पिण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. येथे सर्रास लहान मुलांना दारू विकत देण्यात येते. उघड्यावर ही दारू पिली जात असल्यामुळे लहान मुलांवर याचे परिणाम होतात. नशेमुळे गारखेडा भागात गुन्हेगारी वाढत आहे. अशा सोयी उपलब्ध करून देणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.

- राजेंद्र जंजाळ, माजी उपमहापौर

गजानन महाराज मंदिराजवळील मार्केटमध्ये खरेदीसाठी गेल्यावर रात्री तेथून परतत असताना भरबाजारात या मद्यपींचा धुमाकूळ सुरू असतो. त्यामुळे महिलांची कुचंबना होते. सोबत लहान मुले असल्यावर ती घाबरून जातात. यामुळे या भागातून जाण्या-येण्यासदेखील भीती वाटते.

- शुभांगी वैद्य, नागरिक

ग्राहकांना बिअर पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या बिअर शॉपीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये उस्मानपुरा येथील कोल्ड रॉक, सनी सेंटर येथील पूनम, हर्सूल येथील श्रेयस, नागेश्वरवाडी येथील ॲडव्हेंचर आणि मुकुंदवाडी येथील शिवा बिअर शॉपीवर कारवाई करण्यात आली आहे.

- आनंद चौधरी, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.