मोफत बस प्रवासासाठी बनावट कार्डांचा ‘आधार’; अनेक प्रवाशांकडे दोन ते चार आधार कार्ड

मोफत प्रवास करण्यासाठी बहुसंख्य प्रवाशांनी आधार कार्डवरील जन्मतारीख एडिट करून अशा प्रकारचे दोन ते चार आधार कार्ड बनवून त्याद्वारे मोफत प्रवास करण्याचा फंडा सर्रासपणे सुरू केला आहे.
fake aadhar card free bus service msrtc women st scheme
fake aadhar card free bus service msrtc women st scheme Sakal
Updated on

सिल्लोड : शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून महिला प्रवाशांसाठी निम्मे भाडे, तर ७५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी मोफत एसटी प्रवास योजना सुरू केली आहे. यामुळे एसटीचा प्रवासी वाढला खरा,

परंतु मोफत प्रवास करण्यासाठी बहुसंख्य प्रवाशांनी आधार कार्डवरील जन्मतारीख एडिट करून अशा प्रकारचे दोन ते चार आधार कार्ड बनवून त्याद्वारे मोफत प्रवास करण्याचा फंडा सर्रासपणे सुरू केला आहे.

एसटी महामंडळाकडे आधार कार्ड तपासण्यासाठी यंत्रेच उपलब्ध नसल्याने, प्रवासी जे कार्ड दाखवतील, त्यानुसार तिकीट देण्याखेरीज वाहकाकडे दुसरा पर्याय नाही. अशा पद्धतीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने एसटीमध्ये ठरवून दिलेल्या प्रवासी क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी प्रवास करीत असल्याने याचा फटका बसगाड्यांना बसत आहे. चाळिशीत असलेले प्रवासी पंच्याहत्तर वर्षांपेक्षा जास्त वयाचे आधार कार्ड सोबत घेऊन मोफत प्रवास करीत आहेत.

हे सर्व वाहकास उमजत असतानाही त्यावर मात्र काहीही कार्यवाही करता येत नसल्याने समोर फसवणूक होत आहे. परंतु, त्यामध्ये निमूटपणे भागीदार होण्याखेरीज वाहकांकडे दुसरा पर्यायच उरत नाही, याचा फटका एसटीच्या उत्पन्नास मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्यामुळे आता एसटी प्रशासनाने तिकिटांच्या डिजिटल मशीनमध्येच अशा पद्धतीच्या आधार कार्डची तपासणी करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक असून, यामुळे एसटीला चुना लावण्याचा प्रकारदेखील नियंत्रणात येऊ शकतो.

प्रवासी एक अन् आधार कार्ड चार

‘एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास’ अशी सर्वच प्रवाशांची धारणा आहे. त्यामुळे एसटीचा प्रवासीवर्ग टिकून आहे. परंतु, त्याला आता मोफत प्रवासाचे ग्रहण लागले आहे. अशा पद्धतीने मोफत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशात जन्मतारीख बदललेले दोन ते चार आधार कार्ड बघावयास मिळतात.

हे वाहकासदेखील कळते, परंतु प्रवाशांशी वाहक हुज्जत घालू शकत नाही, तर उलट असे प्रवासीच वाहकांच्या तक्रारी महामंडळाकडे करीत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे दिसेल ते बघावे व पुढे चालावे, अशी गत एसटीच्या वाहकांची झाली आहे.

आधार कार्डमध्ये जन्मतारीख खरी आहे की खोटी, हे तपासण्यासाठी आवश्यक यंत्रे उपलब्ध नाही. त्यामुळे लाइनवर तपासणी करत असताना अधिकारी फक्त आधार कार्ड बघतात. फसवेगिरी करून प्रवासी प्रवास करीत असल्यास त्यावर कारवाई करण्यात येते.

बनवाबनवी करून आधार कार्ड केल्याची घटना समोर आल्यास त्याला वाहकास जबाबदार धरण्यात येत नाही. त्यांच्यावर कारवाई करताना आम्हीदेखील योग्य ती काळजी घेतो. परंतु, सध्यातरी अशा पद्धतीने जन्मतारीख तपासण्यासाठी यंत्रे उपलब्ध नाही.

— पंडित चव्हाण, विभागीय वाहतूक अधिकारी, छत्रपती संभाजीनगर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.