छत्रपती संभाजीनगर : अमूर्तशैली, भित्तिचित्र ते अजिंठा लेणीचे चित्रकार असा चित्रमय प्रवास थांबला. येथील प्रसिद्ध अजिंठा चित्रकार विजय विष्णुपंत कुलकर्णी (वय ७३, रा. पैठण गेट) यांचे सोमवारी मध्यरात्री पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. अजिंठा चित्रशैलीकार अनेक आहेत. पण त्या चित्रांना विजय कुलकर्णी यांनी दिलेला आदर आणि समर्पण आज दिसत नाही, अशी खंत कलाविश्वातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.
मूळचे वेरूळचे रहिवासी असलेले कुलकर्णी यांनी सत्तरच्या दशकात मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले. भित्तिचित्रणमध्ये (म्यूरल पेंटिंग) त्यांचा विशेष हातखंडा होता. म्यूरल पेंटिंग, अमूर्त चित्रशैली आणि अजिंठा चित्रासाठी ते प्रख्यात होते. सईद हैदर रझा, एस. व्ही. वासुदेव, चार्ल्स कोरिया, ज्ञानेश्वर नाडकर्णी, सारा अब्राहम आदी दिग्गजांनीही कुलकर्णी यांचे कौतुक केले होते.
मुंबईहून संभाजीनगर येथे स्थायिक झाल्यावर त्यांनी १९८२ मध्ये वेरूळ येथे ‘रॉक आर्ट गॅलरी’ सुरू केली व अजिंठा चित्रासाठी आयुष्य वाहून घेतले. विजय कुलकर्णी यांच्यावर मंगळवारी पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी सुलभा, विक्रांत आणि विराज ही दोन मुले, सुना, नात आणि वहिनी असा परिवार आहे.
प्रसिद्धीपासून दूर
जे. जे. स्कूल, ललित कला अकादमी, एअर इंडिया, मंत्रालय, विधान भवन, राष्ट्रपती भवन, परराष्ट्र मंत्रालयासह विविध पंचतारांकित हॉटेल्समध्ये विजय कुलकर्णी यांची चित्रे लक्ष वेधून घेतात. भारताबाहेरही अनेक देशांत त्यांची चित्रे गेली आहेत. आपल्या अबोल स्वभावामुळे कायम प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या विजय कुलकर्णी यांनी अखेरपर्यंत कुंचल्याची साथ मात्र सोडली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.