छत्रपती संभाजीनगर : ट्रान्सफॉर्मर जुने झाले, नादुरुस्त झाले तर त्यात बिघाड होतो. यामुळे पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही. परिणामी, उत्पन्नावर परिणाम होतो. यामुळे शेतकऱ्यांसह सर्व ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी राज्यातील नादुरुस्त व १५ वर्षांपेक्षा जास्त जुने झालेले ३४ हजार ६५३ ट्रान्सफॉर्मर तीन वर्षांत बदलण्यात येणार आहेत. ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी व ऑइलसाठी राज्य सरकारकडून एक हजार ५०० कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.
महावितरणकडून राज्यातील दोन कोटी ९७ लाख ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येतो. यामध्ये ४५ लाख कृषिपंपधारक असून, त्यात दरवर्षी एक लाख कृषिपंप ग्राहकांची वाढ होत आहेत. ट्रान्सफॉर्मरमध्ये सतत बिघाड होण्यामुळे शेती आणि बिगरशेती ग्राहकांना वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते.
वीज नसल्याने पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नसल्याची अनेक उदाहरणे ऐकण्यात येतात. यासाठी यांना नियमित व दर्जेदार वीजपुरवठा होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलण्यासाठी निरंतर वीज योजनेला मान्यता मिळाली आहे.
योजनेअंतर्गत एक हजार १६० कोटी रुपयांच्या खर्चाला सरकारला मंजुरी दिली आहे. तीन वर्षांत हा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. पहिल्या वर्षी २०० कोटी रुपये, दुसऱ्या वर्षी ४८० कोटी आणि तिसऱ्या वर्षी ४८० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या याबाबतच्या शासन आदेशात म्हटले आहे.
तीन वर्षांमध्ये ३४ हजार ६५३ ट्रान्सफॉर्मर बदलण्यात येतील. यासाठी एक हजार १६३ कोटी खर्चाची तरतूद आहे. तीन वर्षांसाठी ६३ हजार १०० आणि २०० केव्हीच्या ट्रान्सफॉर्मरसाठी २४ हजार २८१ किलोलीटर इंधन लागणार आहे. यासाठी ३४० कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.
ट्रान्सफॉर्मरचे इंधन बदलण्यासाठी आणि त्याच्या क्षमतेएवढी पातळी करण्यासाठी या योजनेअंतर्गत ३४० कोटीच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. यावर्षी १०० कोटी आणि पुढील दोन वर्षे प्रत्येकी १२० कोटी असा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.