महापालिकेतील निवृत्त कामगारावर भरदुपारी दोघांनी गावठी कट्ट्यातून गोळीबार केला.
Crime News : निवृत्त कामगारावर भरदुपारी घरात गोळीबार! ज्येष्ठ नागरिक बालंबाल बचावले
firing at municipal retired worker in house Senior citizens escaped crime pjp78
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर - महापालिकेतील निवृत्त कामगारावर भरदुपारी दोघांनी गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. सुदैवाने यात ते खाली वाकल्याने गोळी भिंतीवर लागली आणि वृद्ध बालंबाल बचावले. विशेष म्हणजे, गोळीबार करुन दोन्ही आरोपी बिनदिक्कत तिथून निघून गेले. ही खळबळजनक घटना ३१ जुलैरोजी दुपारी साडेचारदरम्यान हनुमाननगर, गल्ली क्र. पाचमध्ये घडली.
याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात ठार मारण्याचा प्रयत्न केल्यासह भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. प्रभु आनंदा आहिरे (वय ८०, रा. नारळीबाग, औरंगपुरा भाजीमंडई, सध्या रा. हनुमाननगर) असे बचावलेल्या वृद्धाचे नाव आहे. घटनेतील गोळीबारीचे कारण अद्याप समोर आले नाही.
आहिरे यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना दोन मुले, दोन मुली आहेत. एक मुलगा वेगळा राहतो तर ते दुसरा मुलगा, पत्नी यांच्यासह मागील दीड महिन्यांपासून हनुमाननगरातील गल्ली क्र. पाचमध्ये पहिल्या मजल्यावर राहतात. ३१ जुलैच्या दुपारी पत्नी स्वयंपाक करत होती, तर समोरच्या खोलीत प्रभु हे घरगुती काम करीत होते.
दरम्यान, दोघेजण गल्लीतून अहिरे यांच्या घराकडे आले. दोघांपैकी विनाचप्पल, जाडजूड असलेल्या एकाने तोंडाला रुमाल बांधलेला होता, तर दुसरा सडपातळ होता. त्याने डोक्यात टोपी घातलेली होती. त्यामुळे चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. एक बाहेर थांबला तर दुसऱ्याने आहिरेंच्या घराचा अर्धा दरवाजा पूर्ण ढकलला आणि काहीच न बोलता थेट गावठी कट्टा रोखून गोळी झाडली.
त्याचवेळी आहिरे खाली वाकल्याने गोळी त्यांच्याजवळून जात मागील भिंतीवर आदळली. भिंतीला छिद्र पडले. आरोपीने दुसरी गोळी झाडण्याचा प्रयत्न केला, तो अयशस्वी ठरला. त्यावेळी मात्र आरोपी कोणालाही काही न बोलता निघून गेले. आहिरेंनी आरडाओरड केल्याने आजूबाजूचे नागरिक धावले, तोपर्यंत पोलिसांना माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच गुन्हे शाखा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपींचा शोध सुरु केला. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांत कलम ३०७, आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
लग्नात विघ्न आणले...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभू आहिरे यांचा कोणासोबतही वाद झालेला नाही, त्यांना कोणावर संशयही नाही. त्यामुळे या ठिकाणी दीड महिन्यांपूर्वी राहत असलेल्या भाडेकरूचा पुंडलिकनगर पोलिसांनी शोध घेतला. त्यांना ठाण्यात बोलावले. त्यांची चौकशी केल्यावर त्यांच्याच एका नातेवाईकावर त्यांनी संशय व्यक्त केला. त्याने मुलाच्या लग्नात विघ्न आणले होते व तो आम्हाला धमक्या देत होता, असे त्यांनी पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी लगेचच संबंधित नातेवाईकाचा शोध घेऊन चौकशी केली. मात्र, तो दिवसभर एका हॉस्पिटलमध्ये कामाला असल्याचे समोर आले. त्याच्या मोबाइलचा तपास पोलिस करणार आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.