वाळूज : गटारांसह अनेक भागातील रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वाळूज परिसरातून वाहणाऱ्या खाम नदीत मासे येणे बंद झाले आहे. त्याचा विपरित परिणाम मासेमारीवर झाल्याने येथील ५०वर आदिवासी बांधवांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. नदीमध्ये पूर्वी दिसणारे रेशमी जाळे घेऊन पाण्यात तासन््तास थांबणारे मत्स्य व्यावसायिक आता दिसेनासे झाले आहेत. शिवाय या पाण्यात पाय टाकल्यास खाज सुटते. या पार्श्वभूमीवर नदी स्वच्छता अभियान राबवून पुनर्विकास करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
शहरालगतच्या ओहर-जटवाडा भागातून खाम नदीचा उगम होतो. विविध भागांतून ती वाळूजला येऊन पुढे मार्गक्रमण करते. पूर्वी पावसाळा चांगला राहात असल्याने खाम नदी कायम वाहत असे. अगदी दुथडी भरून पूर येत असे. नदीकाठच्या गावातील तरुण नदीत पाण्यात तासनतास पोहण्याचा आनंद लुटत.
येथील ‘मावल्या आईचा डोह’ पोहण्यासाठी प्रसिद्ध होता. सुरवातीला वाळूज गावात नळयोजना नसल्याने वाळूजकर खामनदीत झरे करून ते पाणी पिण्यासाठी वापरत, एवढे नदीतील पाणी स्वच्छ होते. या नदीतील पाण्यात आम्ही मासेमारी करीत होतो. या पाण्यात तासन् तास उभे राहून जाळे टाकत मासे पकडायचो. परंतु, आता दूषित पाण्यामुळे मासेच राहिले नाहीत. त्यामुळे मासेमारी थांबली आहे. परिणामी आर्थिक घडी विस्कटून कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे.
— रामदास कुंजारे, कहारवाडा, हनुमंतगाव, वाळूज.
नदीची दुरवस्था पाहणे कठीण जात आहे. पूर्वीची नदी डोळ्यांसमोरून जात नाही. आज आम्ही नदीच्या पात्रात जावे म्हटले तरी पाण्याच्या
दुर्गंधीमुळे जाता येत नाही. नदीतील पाणी स्वच्छ होणे गरजेचे आहे.
— सोनाजी कुंजारे, वाळूज.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.