Ghati Hospital : रुग्णाला झोपेचे इंजेक्शन द्या म्हणत डॉक्टरला मारहाण;संशयिताला अटक,डॉक्टरांचे आंदोलन मागे

घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाला झोपेचे इंजेक्शन द्या, अशी मागणी करीत रुग्णाच्या मित्राने निवासी डॉक्टरला बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी (ता. १७) घडली.
Ghati Hospital
Ghati Hospitalsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाला झोपेचे इंजेक्शन द्या, अशी मागणी करीत रुग्णाच्या मित्राने निवासी डॉक्टरला बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी (ता. १७) घडली. या प्रकारानंतर मार्डच्या निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले. दरम्यान, मारहाण करणाऱ्याला अटक केल्यानंतरच डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतले.

एका अपघातात जखमी झालेला रुग्ण घाटी रुग्णालयातील सर्जरीच्या वॉर्डात उपचार घेत आहे. या रुग्णाला भेटण्यासाठी सोमवारी (ता. १७) सकाळी त्याचे मित्र व नातेवाईक आले. यावेळी एकाने निवासी डॉक्टरकडे आमच्या रुग्णाला झोपेचे इंजेक्शन द्या, अशी मागणी केली. पण, संबंधित डॉक्टरने तसे करण्यास नकार दिला. त्यानंतरही रुग्णाच्या मित्राचा तगादा सुरूच होता. डॉक्टर ऐकत नसल्याचे पाहून त्याने शिवीगाळ सुरू केली.

त्यानंतर डॉक्टरांच्या अंगावर तो धावून गेला व मारहाण करण्यास सुरवात केली. त्यानंतर वॉर्डात एकच गोंधळ उडाला. परिचारिका, सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी करीत डॉक्टरची सुटका केली. या घटनेनंतर संतप्त निवासी डॉक्टरांनी अत्यावश्यक सेवा वगळता काम बंद आंदोलन सुरू केले. अपघात विभागासमोर एकत्रित येत जोरदार घोषणाबाजी केली. डॉक्टरांच्या सुरक्षेचे काय? असा जाब प्रशासनाला विचारला.

तब्बल दोन तास हे आंदोलन सुरू होते. दरम्यान, मारहाण करणारा संशयित अरबाज खान अय्याज खान यास पोलिसांनी अटक केली. त्यानंतर डॉक्टरांनी काम बंद आंदोलन मागे घेतले. सोमवारी ईदची सुटी असल्याने बाह्यरुग्ण विभाग बंद होता. त्यामुळे निवासी डॉक्टरांच्या संपाचा परिणाम जाण‌वला नाही. दरम्यान, निवासी डॉक्टरांचे अध्यक्ष डॉ. रोहन गायकवाड यांच्या नेतृत्वात काम बंद आंदोलन सुरू असताना अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक सुरेश हरबडे यांनी धाव घेत निवासी डॉक्टरांची समजूत काढली.

‘तो’ म्हणाला चहा पिऊन येतो

डॉक्टरला मारहाण करणाऱ्यास परिचारिका, सुरक्षारक्षकांनी पकडले. त्यानंतर त्याला सर्जरी विभागातून खाली आणले. त्याला पोलिसांच्या ताब्यात देणे अपेक्षित असताना सुरक्षारक्षकांनी त्याला सोडून दिले. या प्रकारानंतर अधिष्ठातांनी सुरक्षारक्षकाला निलंबित केले. सुरक्षारक्षकाला जाब विचारला असता, त्याने संशयित चहा पिऊन येतो, असे म्हणाला. त्यामुळे सोडले असे उत्तर सुरक्षारक्षकाने दिले, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.