छत्रपती संभाजीनगर - बीड जिल्ह्यातील स्त्रीभ्रूण हत्येच्या प्रकारानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली व बेकायदा सोनोग्राफी सेंटरवर छापे टाकण्यात आले. त्याचा परिणाम म्हणजे मुलींचा जन्मदर वाढला. मात्र, मुलगाच हवा, ही मानसिकता कायम असल्याने पुन्हा एकदा मुलींचा जन्मदर चिंताजनक पद्धतीने घटताना दिसत आहे. अजूनही ‘ती’ नकोशीच आहे.
यावर्षी छत्रपती संभाजीनगरात ऑक्टोबरपर्यंतची आकडेवारी पाहता जन्मदर शंभर मुलांमागे ८७ मुली असा आढळून आला आहे. म्हणजेच शहरात दर हजारी हे प्रमाण ८७०वर आले आहे. एकीकडे मुलींचा जन्मदर घटत असताना दुसरीकडे स्त्रीभ्रूण हत्येचे प्रकार रोखण्यासाठी असलेल्या समितीच्या कारवाया ठप्प आहेत.
स्त्रीभ्रूण हत्येचा विषय राज्यात २०१२ मध्ये गाजला. बीड जिल्ह्यातील परळीमध्ये डॉ. सुदाम मुंडे व डॉ. सरस्वती मुंडे या दाम्पत्याने शेकडो स्त्रीभ्रूणहत्या केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर शासनाने पावले उचलत राज्यभरात सोनोग्राफी सेंटर सील करण्याची मोहीम राबवली. छत्रपती संभाजीनगर शहरात १९२ सोनोग्राफी सेंटर होते. त्यातील ३० पेक्षा जास्त सोनोग्राफी सेंटरवर कारवाई केली होती.
त्यानंतर शहरात २०१३ मध्ये मुलींच्या जन्मदरात सकारात्मक परिणाम दिसून आला. जन्मदरात नऊ टक्क्यांनी वाढ होऊन ८४ वरून तो ९३ टक्क्यांवर पोचला. महापालिकेकडून प्राप्त आकडेवारीनुसार, शहरात २०१५ मध्ये मुलींचा जन्मदर ९१.२६ टक्के होता. म्हणजे त्यानंतर पुन्हा एकदा मुलींचा जन्मदर ८८ टक्क्यांपर्यंत आला. २०२० मध्ये जन्मदर ९१.५२ टक्के एवढा झाला.
२०२३ मध्ये ऑक्टोबरपर्यंत मुलींच्या जन्मदराचे प्रमाण ८७.५८ टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. महापालिकेच्या अहवालानुसार, २०२२ मध्ये शहरात ३२,३७३ बालकांचा जन्म झाला. यात १६,९६५ मुले तर १५,४०८ मुली आहेत.
समितीच्या घटल्या कारवाया
स्त्रीभ्रूण हत्येचे प्रकार रोखण्यासाठी शहर व जिल्हास्तरावर समित्या कार्यरत आहेत. पण या समित्या कागदावरच असून, गेल्या काही वर्षात समितीने कुठलीही तपासणी अथवा कारवाई केलेली नाही. त्यामुळे मुलींच्या जन्मदरात पुन्हा एकदा घट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुलगी नको मुलगाच हवा, ही समाजाची मानसिकता अद्याप बदलली नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.
राज्यभरातही हेच वास्तव
रेणुका कड (समन्वयक, विकास अध्ययन केंद्र) - शहरात मुलींचा जन्मदर कमी झाला, ही बाब खरोखरच चिंताजनक आहे. मात्र, ही परिस्थिती एकट्या छत्रपती संभाजीनगरची नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आहे. पण हे वास्तव स्वीकारले जात नाही. मुलगी नको, मुलगा हवा म्हणून बाईवर वारंवार बाळंतपण लादले जाते.
मुलगा हवा, वंशाला दिवा हवा, बहिणींना भाऊ हवा, हा अट्टाहास महिलांच्या जीवावर बेततो. मिळालेली आकडेवारी डॉक्टरांकडे आलेल्या नोंदणीनुसार आहे. मात्र, घरी होणारे बाळंतपण किंवा गर्भपात यांचा विचार होत नाही. मुलींना लग्नात हुंडा द्यावा लागतो, मुली जास्त शिकल्या की त्यांच्या अपेक्षा वाढतात, अशी कारणे देत मुलींना नाकारले जाते.
गरीब कुटुंब नव्हे, तर चांगली शिकलेली माणसेही मुलगाच हवा हा अट्टाहास ठेवतात. मालिकांमध्ये मुलगा हवा हा संदेश ठासून पेरला जात आहे. आजच्या काळातील मालिकांनी तरी आपण समाजाला काय देतोय याचे भान ठेवले पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.