Sambhaji Nagar News : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक गुरूदत्त मंदिर

निजाम काळात होती बंदी : तरीही मुस्लिम सरदाराने आणला होता दत्त मूर्तीसह कळस
sambhaji nagar
sambhaji nagarsakal
Updated on

कन्नड : येथील पवार वाड्यातील गुरुदत्त मंदिर हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. या मंदिराचा कळस आणि मूर्ती निजाम काळात एका मुस्लिम सरदाराने आणून त्याची प्राणप्रतिष्ठापना केली असून कन्नड शहरातील सर्वांत प्राचीन दत्त मंदिर म्हणून पवार वाड्यातील दत्त मंदिराची नोंद आहे. या वाड्यात सध्या दरवर्षीप्रमाणे दत्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. याबाबत सामाजिक कार्यकर्ते मनोज पवार, बाळासाहेब पवार (वय ८४) यांनी सांगितले की, जवळपास १९२० पासून या ठिकाणी दत्त मंदिर आहे.

तेव्हापासून दत्त जयंतीचा कार्यक्रम घेण्यात येतो. या मंदिरात १९२४ ची नोंद असलेले श्री दत्तांचे चित्र आहे. तेव्हा कन्नड शहरावर निजामाची सत्ता होती. त्यामुळे हिंदूंच्या मंदिरास, आरती भजनास, मूर्ती पूजेला विरोध होता. मात्र, येथील मुस्लिम सरदार वजीर खॉं साब यांचे पवार परिवाराशी जिव्हाळ्याचे संबंध होते. ते स्वतः पायपेटू वाजवून येथील आरती, भजनात साथसंगत करत होते. एकदा या ठिकाणी आरती सुरू असताना एका सोळा वर्षांच्या मुलाने आपल्याला दत्तांचा साक्षात्कार झाला आहे व या मंदिरावर कळस ठेवा अशी दत्त माऊलीची इच्छा असल्याचे सांगितले. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला.

sambhaji nagar
Sambhaji Nagar News : ‘स्मार्ट’ रस्ते गुणवत्तेत नापास!

निजाम सरकारच्या नियमानुसार येथे कळस व दत्त मूर्ती बसवणे अशक्य होते. पवार वाड्यातील एक सदस्य साहेबराव पवार मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथे सिंदिया राज घराण्याचे मोटारचे ड्रायव्हर होते व एक सदस्य मन्सबराव पवार फौजदार होते. पवार कुटुंबाचे तत्कालीन प्रमुख आतेजी पवार यांनी तत्कालीन सरदार वजीर खां यांच्याशी चर्चा केली. आणि कळस आणि दत्त मुर्ती ग्वाल्हेर येथे बनवण्याचा निर्णय झाला. हा कळस आणि दत्त मूर्ती झाकून निजामाच्या हद्दीपर्यंत आणली. परंतु ती भांबरवाडी निजाम चौकीवर अडविण्यात आली. तेव्हा स्वतः वजीर खां हे तेथे गेले आणि हे माझे व्यक्तिगत सामान आहे असे म्हणून ताब्यात घेतले व पवार वाड्यात सुरक्षित, गुप्तपणे आणले. १९४७ ला या ठिकाणी दत्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली.

येथे दर गुरुवारी आरती होते. कळस लोखंडी पत्र्याचा असून तो गुरुवारी व दत्त जयंतीला हा कळस मंदिरावर ठेवण्यात येत होता. यानंतर तो झाकून ठेवण्यात येत होता. याबाबत शेख निरोद्दीन शेख यांनी सांगितले की, निजाम राजवटीच्या विरोधात भारत सरकारने पोलिस अॕक्शनची कारवाई केली. पवार वाड्यासमोर रणगाडा उभा राहिला. या वाड्याच्या दगडावर उर्दूत शिलालेख होता.

मिलिटरीतील मेजरने सांगितले, हा वाडा तोफेने उडवा. परंतु एका शिख सैनाधिकार्याचे लक्ष आंब्याच्या तोरणाकडे गेले. आणि त्याने ऑर्डर मागे घेतली. आतेजीराव पवार बाहेर आले व सांगितले हा हिंदूचा वाडा आहे. ते ऐकून मिलिटरी निघून गेली. वास्तविक याच वाड्यात पवार परिवाराने आम्हाला आश्रय दिला होता. आम्हाला जीवदान दिले होते. हे ऋणानुबंध आम्ही कदापी विसरणार नाही, अशी प्रतिक्रिया शेख यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.