Chhatrapati Sambhajinagar News : शहरवासीयांना दिलासा! हर्सूल तलावातून उपसणार जास्त पाणी

अनेक वर्षांपासून पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या शहरवासीयांना २०२४ मध्ये काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
harsul lake
harsul lakesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - अनेक वर्षांपासून पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या शहरवासीयांना २०२४ मध्ये काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंतच्या १९३ कोटींच्या पुनरुज्जीवन योजनेचे काम प्रगतिपथावर असतानाच हर्सूल तलावातून पाण्याच्या उपशामध्ये जानेवारी महिन्यात वाढ होणार आहे. सुमारे साडेसात एमएलडी जास्तीचे पाणी रोज या तलावातून मिळेल, त्यामुळे जुन्या शहराला दिलासा मिळणार आहे.

शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळित आहे. जुन्या दोन्ही पाणी योजनांचे आयुष्य संपल्यामुळे वारंवार तांत्रिक बिघाड निर्माण होत आहे. त्यामुळे २,७४० कोटी रुपयांची योजना शासनाने मंजूर केली असली तरी या योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी डिसेंबर २०२४ उजाडणार आहे.

शहराला तातडीने दिलासा मिळावा यासाठी जुनी ७०० मिलिमीटर व्यासाची पाइपलाइन बदलून त्याठिकाणी नवी ९०० मिलिमीटर व्यासाची पाइपलाइन टाकण्यासाठी राज्य शासनाने १९३ कोटींचा निधी मंजूर केला आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी नऊ महिन्यांचा वेळ देण्यात आला.

त्यानुसार काम प्रगतिपथावर असून, पुढील वर्षात म्हणजे फेब्रुवारीपासून या योजनेतून अतिरिक्त पाणी शहराला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यासोबतच आता हर्सूल तलावातूनदेखील वाढीव पाणी मिळणार आहे.

हर्सूल तलावातून सध्या जुन्या शहरातील १६ वॉर्डांना पाणीपुरवठा केला जातो. या तलावातून रोज साडेसात एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जात होता. पण, शहराची पाण्याची गरज लक्षात घेत जास्तीचे पाणी उपसण्यासाठी नवीन यंत्रणा उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. सध्याच्या जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता कमी असल्याने त्याशेजारीच नवीन जलशुद्धीकरण केंद्र तयार केले जात आहे. हे काम दिवाळीनंतर पूर्ण होण्याची शक्यता होती.

पण, आता डिसेंबरअखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल, असे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता के. एम. फालक यांनी सांगितले. त्यामुळे जानेवारीपासून हर्सूल तलावातून जास्तीचे पाणी उचलले जाईल, असे त्यांनी नमूद केले. जुन्या शहरासाठी हर्सूल तलाव मोठा आहे. या निर्णयामुळे काही अंशी नागरिकांची गैरसोय टळणार आहे.

उपसा जाणार १५ एमएलडीपर्यंत

तलावातून सध्या साडेसात एमएलडीपर्यंत पाणी उपसले जाते. नवीन जलशुद्धीकरण केंद्राचे काम झाल्यावर त्यात साडेसात एमएलडी पाणी शुद्धीकरण केले जाईल. त्यामुळे १४ ते १५ एमएलडी पाणी हर्सूल तलावातून प्राप्त होईल, त्यामुळे जुन्या शहराला दिलासा मिळणार आहे. साडेसात एमएलडी म्हणजे ७५ लाख लीटर. या तलावात सध्या १५ फूट पाणीसाठा आहे. या तलावाची क्षमता २७ फूट आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.