Health Nurse Recruitment : लग्नाचा दाखला, गॅझेटच हवे;आरोग्यसेविका भरती परीक्षेला अनेक उमेदवार मुकले

जिल्हा परिषदेतील आरोग्यसेविका (एएनएम) या पदासाठी रविवारी (ता. १६) आयऑन डिजिटल सेंटर येथे ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. यासाठी आलेल्या उमेदवारांकडे लग्नाचा दाखला व गॅझेट हे ओळखपत्र नसल्या कारणाने शेकडो उमेदवार परीक्षेपासून वंचित राहिल्या.
Health Nurse Recruitment
Health Nurse Recruitmentsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेतील आरोग्यसेविका (एएनएम) या पदासाठी रविवारी (ता. १६) आयऑन डिजिटल सेंटर येथे ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. यासाठी आलेल्या उमेदवारांकडे लग्नाचा दाखला व गॅझेट हे ओळखपत्र नसल्या कारणाने शेकडो उमेदवार परीक्षेपासून वंचित राहिल्या. काही उमेदवारांची ही शेवटची परीक्षा असल्याने त्यांना या परीक्षेस मुकावे लागले. यामुळे परत एकदा आम्हाला संधी द्यावी, अशी मागणी या महिला उमेदवारांनी केली आहे.

जिल्हा परिषदेतील आरोग्यसेविका या पदासाठी १३ ते २१ जूनदरम्यान विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा होत आहे. रविवारी चिकलठाणा येथील आयऑन डिजिटल सेंटर येथे परीक्षा पार पडली. यावेळी ओळखपत्रावरून उमेदवारांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. परीक्षेला सोडण्याअगोदर केंद्रावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून आलेल्या सर्व उमेदवारांचे ओळखपत्र तपासण्यात येत होते.

यात उमेदवारांकडे आधार, पॅन कार्ड, वाहन परवान्याचे ओळखपत्र असतानाही या उमेदवारांना परीक्षेला बसू देण्यात आले नाही. त्यांच्याकडून लग्नाचा दाखला व गॅझेटची मागणी करण्यात आली. यामुळे काही काळ उमेदवारांमध्ये गोंधळ निर्माण झाला. परीक्षेला बसू न दिल्याने या उमेदवारांनी थेट एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले. मात्र, पोलिसांनीही त्यांची तक्रार स्वीकारली नाही. त्यांनी जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटून परीक्षा देण्याची मागणी करावी, असा सल्ला दिला. यातील अनेक उमेदवार हे वयातून बाद होत असल्याकारणाने त्यांची शेवटची परीक्षा होती. यामुळे हताश झालेले उमेदवार तसेच परीक्षा न देता घरी परतले. यात अनेक उमेदवार जालना, बीड, बुलडाणा या ठिकाणांहून आले होते.

परीक्षा केंद्रावर आलेल्या परीक्षार्थींकडे कागदपत्रे अपूर्ण असल्याकारणाने त्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. यावरून थोडासा गोंधळ त्या ठिकाणी निर्माण झाला. परीक्षार्थी पोलिस ठाण्यात आले होते. मात्र, हा प्रकार जिल्हा परिषदेशी संबंधित असल्याने या परीक्षार्थींची समजूत काढून त्यांना संबंधित विभागाकडे दाद मागण्याबाबत सांगण्यात आले.

- अतुल येरमे, प्रभारी पोलिस निरीक्षक, सिडको एमआयडीसी पोलिस ठाणे

आधार, पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना, मतदान कार्ड यासह इतर ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल अशा सूचना असतानाही केवळ लग्नाचा दाखला व गॅझेटचा हट्ट करून आम्हाला परीक्षेला बसू दिले नाही. गेल्या पाच वर्षांपासून या परीक्षेची तयारी करीत होते. पुढच्या वर्षी मी वयातून बाद होणार आहे. यामुळे आम्हाला परीक्षेची परत एक संधी द्यावी.

- प्रमिला रगडे, फुलंब्री, उमेदवार

हॉलतिकिटावर कसल्या सूचना नसताना ऐन वेळेवर परीक्षा केंद्रावर आल्यानंतर लग्नाचे प्रमाणपत्र, गॅझेट मागण्यात आले. आमच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड सर्व दिल्यानंतरही त्यांनी तो पुरावा ग्राह्य धरला नाही. मी बुलडाण्याहून इथे परीक्षा देण्यासाठी आले असता, मी इतक्या दुरून कसे काय पुरावे आणणार? अनेक वर्षांपासून या परीक्षेच्या अभ्यासाची तयारी करीत होते. केवळ ओळखपत्र नसल्याकारणाने मला परीक्षेला बसू दिले नाही. त्यामुळे आम्हाला एक परीक्षेची संधी द्यावी.

- वर्षा हिवाळे, बुलडाणा, उमेदवार

पाच वर्षांनंतर भरती

जिल्हा परिषदेतील आरोग्यसेविकेची भरती पाच वर्षांपासून रखडलेली होती. मात्र, यावर्षी या भरतीचा मार्ग मोकळा होत परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात आले होते. यात हजारोच्या संख्येने उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यासाठी ऑनलाइन अर्ज करताना सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यांना त्यानुसार परीक्षेचे हॉलतिकीट प्राप्त झाले होते. मात्र, नोकरीला लागण्याअगोदर ज्याप्रमाणे कागदपत्रे तपासतात, त्याप्रमाणे परीक्षेआधीच ही कागदपत्रे तपासत असल्याकारणाने अनेक उमेदवार हे गोंधळात पडले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.