Crop Damage : आभाळ फाटले...कन्नड, सोयगाव तालुक्यातील भागात ढगफुटीसदृश पाऊसाने नदीला पूर; पिकांचे नुकसान

Heavy rainfall : कन्नड, सोयगाव तालुक्यातील भागात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने नदीला पूर आला आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती गंभीर बनली आहे.
Crop Damage
Crop Damagesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : कन्नड, सोयगाव तालुक्यातील काही भागात रविवारी (ता. १३) रात्री साडेदहानंतर ढगफुटीसदृश पाऊस झाला. कन्नड, चापानेरस जरंडी, बनोटी मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. अंजना नदीला आलेल्या पुरात सारोळा येथे साळूबा गाडेकर वाहून गेले, तर हतनूर येथे कोल्हापरी बंधाऱ्यात तरुण बुडाला असून त्यांना शोधण्याची मोहीम हाती घेतली.

कन्नड : कन्नड तालुक्यात रविवारी (ता. १३) रात्री साडेदहा ते साडेअकरादरम्यान सायगव्हाणसह लगतच्या गावांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला. कन्नड, चापानेर मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली असून, अंजना नदीला आलेल्या पुरामध्ये सोमaवारी (ता. १४) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास सारोळा येथे साळूबा सांडू गाडेकर (वय ५५) हे वाहून गेले, तर हतनूर-तीसगाव रस्त्यावरील गांधारी नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यामध्ये सागर संजय गायकवाड (वय २२, रा. घुसूर) हा युवक पाण्यात बुडाला, अशी माहिती तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी दिली.

अंजना नदीच्या पुरात वाहून गेलेल्या सारोळा येथील साळूबा गाडेकर यांचा शोध छत्रपती संभाजीनगर येथील अग्निशमन दलाचे पथक घेत आहे, तर हतनूर येथे गांधारी नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या पाण्यात बुडालेल्या सागर गायकवाडचा शोध कन्नड नगर परिषदेचे अग्निशमन पथक घेत आहे. या ठिकाणी महसूल विभागाचे आपत्ती व्यवस्थापन पथक दाखल झाले असून दिनेश राजपूत, तलाठी नीलेश चव्हाण, गणेश मोहिते अपघातस्थळी मदतकार्यात सहभागी झाले आहेत.

सायगव्हाणसह परिसरात रविवारी (ता. १३) रात्री साडेदहा ते अकरादरम्यान ढगफुटीसदृश पाऊस झाला. पहाटे चारपर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता. या पावसाने जनजीवन विस्कळित झाले. शेतात समोर पडलेली मका, ज्वारी पाण्यात बुडाली. सोंगणीला आलेली मका आता काळी पडली, तर कपाशीच्या वाती झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, अशी माहिती शेतकरी गंगाधर पाटील यांनी दिली. बेलदरी शिवतांड, हसनाबाद, सायगव्हाण या गावांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, असे सुभाष निकम पाटील यांनी सांगितले. शेतातील घरामध्ये पाणी जाऊन संसारोपयोगी साहित्य पाण्यात बुडाले आहे.

दिवसभर प्रशासकीय यंत्रणा फिरकलीच नाही

तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, विद्युत मंडळ कर्मचाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यालयी थांबणे आवश्यक असते. मात्र, अतिवृष्टीग्रस्त भागात प्रशासकीय यंत्रणा सोमवारी (ता. १४) फिरकलीच नाही.

मंडळनिहाय पाऊस (मि.मी. मध्ये)

कन्नड ७१, चापानेर ७१, देवगाव ३८, चिकलठाण ३४, पिशोर ४८, नाचनवेल ४०, करंजखेड ३७, चिंचोली ३७, नागापूर ५० मि.मी. असा तालुक्यात एकूण ८९७.३८ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

गडदगड नदीला आला पूर

मुसळधार पावसामुळे गडदगड नदीला पूर आला आहे. मागीलवर्षी या नदीवरील पूल अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता, अशी माहिती ऋग्वेद पाटील यांनी दिली.

परतीच्या पावसाने पिकाचे मातेरे

अंधारी : सिल्लोड तालुक्यातील अंधारी परिसरात चार-पाच दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे हातातोंडाशी आलेली मका, सोयाबीनची पिके पुन्हा पाण्याखाली गेली. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. याशिवाय दुसरीकडे मजुरी वाढल्याने शेतकऱ्यांची अजून डोकेदुखी वाढली. अंधारीसह लोणवाडी, म्हसला टाकळी परिसरात सोंगून शेतात पडलेल्या पिकांना आता कोंबे फुटू लागल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शासनाने पंचनामे करून सरसकट मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

  • कन्नड, चापानेर, जरंडी, बनोटी मंडळांत अतिवृष्टी

  • अंजना-पळशी नदीपात्रात एक जण गेला वाहून

  • हतनूर येथे कोल्हापरी बंधाऱ्यामध्ये तरुण बुडाला

मका, कापूस, सोयाबीन पाण्यात

माणिकनगर : सिल्लोड परिसरातील माणिकनगर (भवन) येथे सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास अतिवृष्टीसदृश पावसाने नदी-नाल्यांना चांगलेच पाणी आले. माणिकनगर परिसरातील भवन, केऱ्हाळा, बोरगाव कासारी, वरूड पिंपरी, पिंपळगाव पेठ, तांडाबाजार, गव्हाली, तलवाडा, बनकिन्होळा, वरखेडी, गेवराई सेमी, भायगाव गावांना जोरदार पावसाने झोडपले. या पावसाने कपाशीच्या वाती झाल्या असून, शेतात काढून ठेवलेली मका, सोयाबीन भिजल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.

छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गाच्या बाजूला असलेल्या गट नं. ७० या शेताजवळ नालीचे काम अपूर्ण असल्याने सोमिनाथ सांडू कळम यांच्या शेतात इतर शेतांतील वाहून आलेले पाणी शिरले. त्यामुळे कळम यांनी जमा करून ठेवलेली सोयाबीनची गंजी भिजून नुकसान झाले; तसेच माणिकनगर येथील बडोदा बँकेसमोर बसथांबा असलेल्या रोडच्या एका बाजूचे नालीचे काम रखडल्याने बडोदा बँकेसमोर पाण्याचे तळे निर्माण झाले होते. त्यामुळे बँकेत जाण्या-येण्यासाठी नागरिकांना अडचण निर्माण झाली होती; तसेच येथील काही दुकानांत पाणी शिरल्याने साहित्याचे नुकसान झाले. संबंधित कंत्राटदारांनी नालीचे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.