मूलत : मानवी उत्क्रांतीचे गमक काय असेल आणि त्यात तत्कालीन स्त्रीची भूमिका काय असेल (?) याचा सद्सद्विवेक बुद्धीने विचार केला असता मानवी उत्क्रांतीच्या केंद्रस्थानी स्त्रीच होती! याचे कारणही तसे मजेशीर आहे
आणि ते म्हणजे पुरुषाचे पौरुषत्व कितीही बलशाली असले तरी स्त्रीच्या मातृत्व-वात्सल्याशिवाय गत्यंतर नाही हे वैश्विक सत्य स्विकारावेच लागेल! अगदी ह्याच क्रांतिकारक विचारांची खुणगाठ मनासी बांधून समाजपरिवर्तन करण्यासाठी एक तरुण घराबाहेर पडला, ते म्हणजे महात्मा ज्योतीराव फुले!
अत्यंत कठीण काळात ज्योतीराव धर्मबेडीत आणि वर्णव्यवस्थेच्या विषारी विळख्यात अडकलेल्या एकोणिसाव्या शतकातील समाजाला बाहेर काढण्यासाठी पुण्यासारख्या शहरात पाय रोवून उभे राहिले.
त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची त्यांची तयारी होती. या कार्यात त्यांना खंबीर आणि कृतीशील विचाराने साथ दिली ती त्यांच्या अर्धांगिनी सावित्रीबाई फुलेंनी! आपल्या दारातील पाणवठा सर्वांसाठी खुला करून ज्योतीराव अगोदरच घरातून बहिष्कृत झाले होते,
आणि त्यात कळस म्हणजे त्यांनी स्वतःची पत्नी साक्षर करून पुण्यातील मुलींना शिकवण्यास तयार केल्यामुळे तत्कालीन रूढी-परंपरांनी बरबटलेल्या समाजातील तथाकथित सुधारणावाद्यांचा तिळपापड झाला!
सामाजिक परंपरेच्या सर्वच्यासर्व चौकटी भेदून ज्योतीरावांनी प्रथम अशिक्षित असलेल्या आपल्या पत्नीला साक्षर केले. चांगल्या कामाची सुरुवात आपल्या घरातूनच झाली पाहिजे या न्यायाने सावित्रीबाईंना शिकवून तयार केले.
लोक काय म्हणतील? याचा तिळभरही विचार केला नाही आणि कुणाची भीतीही बाळगली नाही, याचे कारण म्हणजे स्वतः ज्योतीराव लहूजी वस्ताद साळवे यांच्याकडे कुस्तीचे धडे घायचे! ज्योतीरावांची बलदंड शरीरयष्टी आणि परखड विचार विरोधकांच्या काळजात धडकी भरवायचे! ब्राह्मणांचे कसब,
शेतकऱ्यांचा आसूड सारख्या ग्रंथातून त्यांनी इथल्या व्यवस्थेवर घणाघात केले होते. स्वतःच्या घरातून परागंदा झालेले ज्योतीराव खरे धर्म चिकित्सक झाले! सत्यशोधक समाजाच्या "सार्वजनिक सत्यधर्म" हा ग्रंथ प्रमाण मानून ज्ञानोबा-तुकोबांच्या अभंगांसारखे त्यांनी अखंड लिहून इथल्या थोतांड, कर्मकांडांनी त्रस्त झालेल्या व्यवस्थेला सडेतोड प्रश्न विचारून अनेकवेळा निरुत्तर केले. याचा दूरगामी प्रभाव सावित्रीबाईवर झाला नसेल तर नवल!
सावित्रीबाई फक्त साक्षर होऊन थांबल्या नाहीत, तर वयाच्या सतराव्या वर्षी पुण्यासारख्या प्रस्थापित विचारांच्या आणि प्रतिगामी विचाराने बरबटलेल्या लोकांमध्ये शिक्षिका म्हणून भिडे वाड्यात मुलीना शिक्षण द्यायला लागल्या!
ही अलौकिक घटना भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखी असून इथून पुढे भारताच्या संपूर्ण इतिहासानेच अक्षरशः कूस बदलली! एक स्त्री असून प्रस्थापित व्यवस्थेच्या छाताडावर पाय देऊन आपले ज्ञानदानाचे महान कार्य करतांना पाहून प्रस्थापितांचे डोळे दिपल्याशिवाय राहिले नाहीत!
धर्ममार्तंडांनी धर्म बुडाला, कलीचा प्रभाव सुरु झाला, आता संपूर्ण देश अधोगतीला जाणार, जगबुडी होणार! अशा वावड्या उठवून फुले दांपत्यास शिव्यांची लाखोली वाहिली! प्रस्थापित लोकांच्या जगण्याचा अक्षरशः तिळपापड झाला! एवढ्यावरच हे द्वेष्टे थांबले नाहीत.
त्यांनी ज्ञानदानास जाणाऱ्या सावित्रीबाईंना अर्वाच्य शिव्या द्यायला प्रारंभ केला! तरीही थांबत नाहीत हे पाहून अंगावर शेण, चिखल, सडके टमाटे, अंडे मारले! तरीही सावित्रीबाई थांबल्या नाहीत, तेंव्हा त्यांनी अक्षरशः त्यांना दगड मारले!
सावित्रीबाईंच्या डोक्याला जखमा झाल्या, लुगडे रक्तबंबाळ झाले, मात्र आपले ज्ञानदानाचे महत्कार्य त्यांनी थांबवले नाही! एवढं सगळं सोसून सावित्रीबाई ज्योतीरावांच्या "विद्येविना मती गेली" या काव्याने प्रभावित होऊन काव्यफुले,
सुबोधरत्नाकर, बावनकशी हे ग्रंथ लिहून तत्कालीन समाजाचे मूलगामी प्रबोधन करण्याचे महत्कार्य केले! आपल्या काव्यफुले या काव्य संग्रहात त्या संबंध मानवांना प्रश्न विचारतात. ज्ञान नाही विद्या नाही, ते घेणेची गोडी नाही
बुद्धी असुनि चालत नाही, तयास मानव म्हणावे का?
हे शब्द वाचल्यानंतर आपली सर्वांचीच जबाबदारी किती मोठी आहे? हे लक्षांत येते. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाईंची प्रतिभा आणि काव्य सृष्टीचा शोध घेतला असता अनेक महत्वपूर्ण प्रश्न त्यांनी तेंव्हा उपस्थित केले असले तरी आजही ते बऱ्याच अर्थाने लागू होतात यात शंका नाही. आपल्या कवितेतून त्या बाईल काम करत राही, ऐतोबा हा खात राही
पशु-पक्षांत ऐसे नाही, तयास मानव म्हणावे का?
असे सडेतोड लिहून समाजातील ऐतखावू पुरुषांना काम करायला प्रवृत्त केले! त्यांना लाजेने मान खाली घालून आपले कार्य करण्यास प्रवृत्त केले!
आद्यशिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे आज जयंतीदिनी स्मरण करतांना आपण मूलगामी विचार करणे गरजेचे आहे!
स्त्री म्हणून कोणतेही संरक्षण नसतांना सावित्रीबाईंनी आपल्या जीवाची परवा न करता स्त्री शिक्षणासाठी अहोरात्र प्रयत्न केले. आज एकविसाव्या शतकात बऱ्याच स्तरावर स्त्रीने क्रांतिकारी पाउल उचलण्याची आवश्यकता आहे.
आजही स्त्रीचा दुय्यम दर्जा कमी झाला नाही. विवाहासाठी मुलगी पाहणे आणि पुरुषी अहंकाराचे प्रदर्शन अजून थांबले नाही. विवाहासाठी मुलगी आपले माहेर आणि सर्वस्व सोडून पतीच्या घरी नांदायला जात असतांना हुंडा पद्धती बंद झाली नाही!
उच्च शिक्षित मुलगा-मुलगी असतांना वरपक्षाकडील लोकांना लाखात हुंडा मागायला जराशीही लाज कशी वाटत नाही? कमावती मुलगी असतांना आणखी वर हुंडा मागतात! हा समाजाला लागलेला कलंक पुसून टाकायचा असेल तर सावित्रीच्या लेकींनी हुंडा घेणाऱ्या दलालासोबत लग्न करण्यास जाहीर नकार द्यायला हवा!
समाजातील शिकलेल्या लोकांनी संपूर्ण नैतिक मर्यादांचे उल्लंघन केले असून मुलीच्या बापाला आणि मुलांना दुय्यम समजून त्यांची शिकले सवरले लोकच अवहेलना करत आहेत! हा समाजाला लागलेला मोठा कलंक असून यासाठी सावित्रीबाईंचा वसा-वारसा घेऊन हुंडा घेणाऱ्या मुलांचे प्रस्ताव धुडकावून लावावे लागतील! तेंव्हाच मुलांच्या बापाचे डोळे खाडकन उघडतील!
हुंडा मागण्यात स्त्रियाच अग्रेसर असतात हा स्त्री जातीला लागलेला कलंक स्वतः स्त्रीनेच पुसून टाकायला हवा आणि आपण सावित्री-जिजाऊ यांच्या वारस आहोत हे सिद्ध करावे लागेल! असे झाल्यास अपोआप स्त्री-पुरुष हा भेद मावळून जाईल!
कोणत्याही आईच्या गर्भात स्त्रीचे भ्रूण मारले जाणार नाही. त्यासाठी मी देशातील तमाम मातृशक्ती-स्त्रीशक्ती यांच्या चरणावर मस्तक ठेवून कळकळीचे आवाहन करतो की; कृपया स्त्रीला दुय्यम मानू नका! तीचा सन्मान करा! तीच आपल्या घरातील लक्ष्मी आहे! तिच आपले पालन-पोषण करणारी अनंतकाळची माता आहे!
तिच्या गर्भात आपले भविष्य वाढणार आहे! असे झाल्यास खऱ्या अर्थाने आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केल्याचे समाधान वाटेल! तसेच मुलगा-मुलगी भेद संपवून समाजात स्त्री-पुरुष समानतेचे विचार प्रसारित करावे लागतील. काही माणसे बोलतांना सहजच "त्यांना मुलगा नाही" असे बोलून जातात, हे भयंकर आहे!
हे कुठेतरी थांबले पाहिजे! आज संपूर्ण जग मंगळावर जाण्याच्या तयारीत असतांना आपण जर स्त्री-पुरुष, पत्रिका, शकून-अपशकून यात अडकून बसलो तर आपला देश आणखी मागे जाईल! तेंव्हा, चला बंधू-भगिनींनो, आज स्त्री-पुरुष समानतेचा मुलभूत विचार गाठीशी बांधू आणि सावित्रीबाई फुलेंच्या कार्याला, स्मृतीना सन्मानाने विनम्र अभिवादन करूया! जय ज्योती! जय सावित्री! जय क्रांती!
प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.