Chhatrapati Sambhajinagar : शंभर रुपये द्या; काहीही करा! कॅफेत सुरू असलेल्या स्वैराचाराला इतके दिवस अभय कुणाचे?

Illegal activities: छत्रपती संभाजीनगरातील कॅफेमध्ये सुरू असलेल्या अनैतिक कृत्यांवर महापालिका आणि पोलिसांनी कारवाई केली. यामुळे इतके दिवस पोलिसांनी दुर्लक्ष का केले, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे.
Illegal activities Chhatrapati Sambhajinagar cafe
illegal activities sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहरात बेबंदपणे फोफावलेल्या कॅफेमध्ये चालणारे उद्योग शनिवारच्या कारवाईमुळे समोर आले. बिअरबारपेक्षाही डार्क लाइट, शेजारच्या कपार्टमेंटमध्ये काय सुरू आहे हे लक्षात येऊ नये म्हणून केलेली व्यवस्था, अवघ्या शंभर रुपयांत एका तासाची सोय या कॅफेमध्ये दिसून आली.

खुलेआम सुरू असलेला हा स्वैराचार इतके दिवस पोलिसांच्या लक्षात का आला नाही, हा प्रश्न आता विचारला जात आहे. महापालिका आणि पोलिसांच्या पथकांनी शनिवारी शहरातील गजबजलेल्या भागात असलेल्या २९ कॅफेंवर धडक कारवाई केली. या कॅफेमध्ये अनेक धंदे राजरोस सुरू असल्याच्या तक्रारी आल्यानंतर पोलिसांच्या पथकांनी अनेक कॅफेची रेकी केली. नंतर कारवाईचा निर्णय घेण्यात आला.

यात कॅफेचे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी महापालिकेची पथके दिमतीला होती. पोलिस आयुक्त आणि महापालिका प्रशासक यांनी गो अहेड दिल्यानंतर ही कारवाई झाली. गुन्हे शाखा, एनडीपीएस पथकाचे कर्मचारी या मोहिमेसाठी सोबत घेण्यात आले होते. क्रांतीचौक येथे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आनंद वाहूळ यांनी पोलिसांना काय कारवाई करायची याबाबत माहिती दिली. यानंतर एकूण आठ पथके या कारवाईसाठी रवाना करण्यात आली.

अंधारे कपार्टमेंट

महापालिका आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईत विचार करायला लावणारे दृश्य समोर आले. कॅफेच्या नावाखाली या मंडळींनी अश्लील कृत्यांना थारा दिल्याचे या मोहिमेत पथकांना आढळून आले. जाणीवपूर्वक केलेला अंधार, पलीकडचे दिसू नये म्हणून करण्यात आलेले खास उंच कपार्टमेंट, आलिशान सोफ्यांची व्यवस्था या कॅफेमध्ये करण्यात आली होती. एका तासासाठी किमान १०० रुपये आकारण्यात येत होते. दर अर्ध्या तासाला दोन ऑर्डर आणि ऑर्डर दिली नाही तर दर तासाला १०० रुपये दर आकारण्यात येत असल्याचे दिसून आले.

पथकांना काय दिसले?

पथकांनी कॅफेवर कारवाई केली असता त्यांना धक्कादायक दृश्य बघावे लागले. अनेक कॅफेमध्ये तरुण-तरुणीच मोठ्या प्रमाणात आढळून आले. अनेक ठिकाणी आक्षेपार्ह अवस्थेतही काही ठिकाणी तरुण-तरुणी पथकांना आढळले. अंधाऱ्या जागेत खुलेआम हा स्वैराचार सुरू होता.

पोलिसांचे सर्रास दुर्लक्ष

गुन्हे शाखेच्या वतीने काही महिन्यांपूर्वी कॅफेवर कारवाई करण्यात आली होती. मात्र, केवळ एकदा कारवाई केली. नंतर दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे कॅफेच्या नावाखाली सर्रासपणे स्वैराचाराला मुभा मिळाली होती.

आशीर्वाद कुणाचा?

ज्या भागातील कॅफेवर ही कारवाई झाली त्या भागांची नावे पाहता सारेच कॅफे चांगल्या व गजबजलेल्या वसाहतीतील आहेत. पॉश सजावट आणि जोडप्यांना हवा असणारा एकांत अशी बहुतेक सर्वच कॅफेची रचना आहे. खुलेआम हा प्रकार सुरू असताना आतापर्यंत का कारवाई झाली नाही असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

कारवाईनंतर शुकशुकाट

कारवाईनंतर रविवारी शहरातील कॅफेवर तुरळकच गर्दी दिसून आली. आजही कारवाई होऊ शकते या भीतीने रविवारी काही कॅफे बंद ठेवण्यात आल्याचे चित्र बघायला मिळाले.

उर्वरित कॅफेवर कारवाई कधी?

महापालिकेकडे १२९ कॅफेचालकांनी नोंद केल्याची माहिती सूत्रांनी दिली. शनिवारच्या कारवाईत केवळ २९ कॅफेवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे शहरातील इतर कॅफेचालकांचे धाबे दणाणले आहेत. उर्वरित अशा कॅफेंवर कारवाईचा बडगा कधी उगारणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

शनिवारी महापालिकेच्या मदतीने कॅफेवर कारवाई करण्यात आली. यामध्ये अनधिकृत बांधकाम मनपाच्या पथकांनी उद्ध्वस्त केले. यापुढेदेखील पोलिस प्रशासनाच्या वतीने अशा पद्धतींच्या कॅफेवर कारवाईची मोहीम सातत्याने राबवण्यात येणार आहे.

- प्रशांत स्वामी,पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.