औरंगाबाद - छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांना विद्यापीठाने दिलेले तात्पुरते संशोधन मान्यता पत्र सारथीने ग्राह्य धरले नाही, त्यामुळे त्या पात्रताधारक विद्यार्थ्यांना तत्काळ कायम नोंदणीपत्र देण्यात यावे, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी प्रगर्वातील उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मेहनती व गुणवत्ताधारक एम.फील. व पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना सारथी संस्थेच्यावतीने छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती देण्यात येते. सारथीच्या वतीने छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत २३ फेब्रुवारीला संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागवले होते. त्यानुसार पीएच.डी. साठी पात्र विद्यार्थ्यांनी विद्यापीठाने दिलेले तात्पुरते संशोधन मान्यता पत्र जोडून अर्ज भरले. मात्र, सारथीने १३ मे रोजी संकेतस्थळाव्दारे घोषणा पत्राच्या माध्यमातून आपल्या विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटी पूर्ततेकरिता वगळले. या त्रुटी पूर्ततेकरिता तात्पुरते संशोधन मान्यता पत्रा ऐवजी कायम नोंदणीपत्र आवश्यक केले असून ते जमा करण्याची अंतिम मुदत २७ मेपर्यंत आहे. विद्यापीठातर्फे जानेवारी- फेब्रुवारीमध्ये पेट परीक्षा घेण्यात आली. मात्र, विद्यापीठाच्या संथ गतीने सुरू असलेल्या पीएच.डी. प्रक्रियेमुळे अद्याप एकाही पात्रताधारक विद्यार्थ्याला कायम नोंदणीपत्र देण्यात आलेले नाही. परिणामी, सारथीच्या वतीने देण्यात येणाऱ्या छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीपासून हे विद्यार्थी वंचित राहणार असल्याचे आ. चव्हाण यांनी कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिले. तसेच सदरील प्रश्नाचा विचार करून विद्यार्थ्यांना तात्पुरते संशोधन मान्यतापत्र दिले होते, त्या विद्यार्थ्यांना तत्काळ कायम नोंदणीपत्र देण्यात यावे, अशी मागणी आ. चव्हाण यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.