छत्रपती संभाजीनगर : हाय फाय लग्नात वऱ्हाडी असल्याचे भासवत लाखोंचे दागिने, पैसे चोरी करणाऱ्या परप्रांतीय महिलेसह दोघांना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे गुन्हेगारांमध्ये या महिलेसह तिचा मुलगा आणि नातूच आहेत. गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांनी ‘सकाळ’शी बोलताना ही माहिती दिली.
आरोपी मुलगा पळून जाण्यात यशस्वी झाला तर अटकेतील संशयितांपैकी एकजण विधीसंघर्ष बालक असल्याचेही त्यांनी सांगितले. या महिलेने शहरातील मोठमोठ्या लॉन्स, हॉटेल्सची रेकी करून लाखो रुपयांचे दागिने, पैसे चोरले असून या घटना आता समोर येतील अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
याप्रकरणी गुरमे यांनी दिलेल्या माहितीनुसार सोनू रम्मो सिसोदिया (२५), आशिष बलराम सिसोदिया, रामबाई हरगोविंदसिंग सिसोदिया (६३) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. उपनिरीक्षक संदीप सोळुंके, नवनाथ खांडेकर, अमोल शिंदे, सुनील बेलकर, नितीन देशमुख, मनोहर गिते, शाम आढे,
अनिता त्रिभुवन यांच्या पथकाने बीड हायवेवरील दाभरूळ फाट्यावर जेवणासाठी थांबले असताना आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून रोकडसह महागडी कारसह नऊ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. दरम्यान, आरोपी महिला रामबाई हिचा मुलगा गौतम सिसोदिया हा फरार होण्यात यशस्वी झाला.
आरोपी आशिष हा आरोपी रामबाई हिचा पुतण्या आहे. सोनू आणि आशिष हे चुलत मेव्हणे आहेत. तर फरार गौतम हा रामबाईचा मुलगा आणि विधिसंघर्ष बालक हा तिचा नातू आहे. तीन पिढ्या सोबतच चोरी करत असल्याचे समोर आले आहे. मध्यप्रदेशातील ज्या गावात हे आरोपी राहतात ते अख्ये गावच या प्रकारच्या चोऱ्या करत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
घटना एक - नातेवाईक असलेले सर्व आरोपी मध्यप्रदेशातून तीन डिसेंबरच्या भल्या पहाटे थेट शहरात पोहोचले. शहरात आल्या आल्या सर्व लॉन्स, मोठमोठे हॉटेल्सची रेकी केली आणि अवघ्या
तीन तासात म्हणजे सकाळी दहा वाजेदरम्यान हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे लग्न समारंभातून तीन लाख ५० हजार रुपयांचे दागिने, रोकड असलेली पर्स चोरी केली. या प्रकरणी रंजितसिंह कदमबांडे यांच्या फिर्यादीवरून सिडको ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.
घटना दोन- हॉटेल रामा इंटरनॅशनलमधील लग्नात चोरी करून आरोपींनी त्याचदिवशी रात्री सात वाजेदरम्यान मुकुंदवाडीतील जिमखाना क्लबमध्ये सुरू असलेले लग्न ‘टार्गेट’ केले. लग्नाच्या रिसेप्शनदरम्यान फिर्यादी सुनील
जैस्वाल यांच्या पत्नीने खुर्चीवर ठेवलेली रोकडसह दागिने असलेली पाच लाख २५ हजार रुपयांची पर्स याच चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आरोपी हे चोऱ्या केल्यानंतर काही अंतरावर उभ्या केलेल्या कारमध्ये बसून वाटण्या करत असत.
आरोपी सोनू सिसोदिया याला पोलिसांनी सीसीटीव्हीमध्ये पाहिले होते. दरम्यान, लग्नात चोऱ्याकरून फरार झालेली टोळी बीडकडे जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला रविवारी (ता.१०) मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. दरम्यान, बीड रस्त्यावर दाभरूळ फाट्यावर आरोपी हे एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले असता,
पोलिसांनी आरोपींना पकडले. त्याचवेळी आरोपी रामबाई हिचा मुलगा गौतम हा फरार होण्यात यशस्वी झाला. एका विधीसंघर्ष बालकासह इतर तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याच आरोपींनी शहरात चोरी करून संध्याकाळी लातूर गाठले होते. तिथेही एका लग्नात चोरी करून सोलापूरला गेले. तिथून पुन्हा शहरात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यात आरोपींनी उत्तरप्रदेशच्या नातेवाईकाची महागडी कार वापरल्याचेही समोर आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.