छत्रपती संभाजीनगर : उद्योगांसाठी महावितरणकडून विनाअडथळा वीजपुरवठा व्हावा, त्यांच्या समस्या सोडवाव्या, या मागणीसाठी मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरच्या (मसिआ) चिकलठाणा येथील कार्यालयात महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता,
मुख्य अभियंता भुजंग खंदारे आणि महावितरणचे सर्व अधिकारी यांच्यासोबत शुक्रवारी (ता. २१) उद्योजकांनी चर्चा केली. महावितरणने कामात सुधारणा केली नाही तर १ ऑगस्टपासून उपोषण करू, असा इशारा उद्योजकांनी यावेळी दिला.
बैठकीला मसिआचे अध्यक्ष चेतन राऊत आणि उपस्थित असणाऱ्या मसिआच्या पदाधिकारी तसेच सदस्यांनी सविस्तर समस्या मांडल्या. वाळूज, चिकलठाणा आणि शेंद्रा औद्योगिक क्षेत्रातील तातडीने दुरुस्तीसाठी लाइन स्टाफ व कर्मचारी अपुरे पडत आहेत.
त्यामुळे अखंडित वीजपुरवठा मिळत नाही आणि वीजपुरवठा खंडित झाल्यावर त्याचे कारण शोधण्यातही वेळ जात आहे. त्यामुळे या औद्योगिक क्षेत्रात लाइन स्टाफ व कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी. गट नंबरमधील उद्योगांनाही सातत्याने वीजपुरवठा खंडित होतो.
त्यामुळे उत्पादनाचे नुकसान होत आहे. चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील जुने झालेले इन्फ्रास्ट्रक्चर बदलावे, चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील अत्यंत दुरवस्थेतील मिनी पिलर, आरएमयूसारखी उपकरणे बदलावीत आणि त्यांची उंची वाढविणे, शेंद्रा औद्योगिक क्षेत्रातदेखील सातत्याने वीजपुरवठा खंडित होतो; त्यामुळे उत्पादनाचे नुकसान होत आहे.
शेंद्र्यामधील ए सेक्टर येथे फिडर ओव्हरलोड झाला आहे. त्यावरील लोड डिव्हाइड करावा. औद्योगिक क्षेत्रातील भूमिगत केबल ज्या ठिकाणी आहेत त्यावर साइन बोर्ड लावा, वाळूज औद्योगिक क्षेत्रातील जे ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड झाले आहेत त्यांची क्षमता वाढविणे आणि लोड डिव्हाइड करावा, सर्व औद्योगिक क्षेत्रांसाठी स्वतंत्र मोबाइल व्हॅन उपलब्ध करावी.
औद्योगिक क्षेत्रात नियमित देखभाल व दुरुस्तीची कामे वेळेत व्हावीत, महावितरण आणि एमआयडीसी यांच्या सहकार्याने नोटीफाइड एरिया जाहीर करून तिथे महावितरणने आवश्यक सोयी-सुविधा पुरवाव्यात. प्री मॉन्सूनची आवश्यकता असलेल्या कामाचा सर्व्हे करण्यात आला.
पण, त्यावर पुढील कारवाई नाही झाली. त्यामुळे लवकरात लवकर कामे पूर्ण करावी आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीस मसिआचे उपाध्यक्ष अर्जुन गायकवाड, मनीष अग्रवाल, सचिव राजेंद्र चौधरी, राजेश मानधणी,
सहसचिव सचिन गायके, कोषाध्यक्ष विरेन पाटील, प्रसिद्धिप्रमुख सुरेश खिल्लारे, रोहण येवले, माजी अध्यक्ष केशव पारटकर, अभय हंचनाळ, अनिल पाटील, कार्यकारिणी सदस्य राहुल मोगले, कुंदन रेड्डी, अभिषेक मोदानी, राजेश विधाते, मिलिंद कुलकर्णी, दिलीप शिंदे, एन.लड्डा, ज्ञानेश्वर काबरा आदी उद्योजक उपस्थित होते.
औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर उपाययोजना होऊन अखंडित वीजपुरवठा मिळेल, अशी आशा आहे. ३१ जुलैपर्यंत महावितरण ज्या सुविधा देत आहे त्यात सुधारणा झाली नाही तर १ ऑगस्टला उद्योजक उपोषणाला बसणार आहेत.
— अर्जुन गायकवाड, उपाध्यक्ष, मसिआ.
औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात. उद्योगांंना अखंडित वीजपुरवठा मिळावा. कारण उद्योगांना अखंडित वीजपुरवठा मिळणे हा अधिकार आहे आणि ही महावितरणची जबाबदारी आहे.
— चेतन राऊत, अध्यक्ष, मसिआ.
आवश्यक असणारी उपकरणे व स्पेअर पार्ट महावितरण तर्फे लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येतील. लाइन स्टाफ वाढवण्यासाठी आणखी ठोस पावले उचलण्यात येतील आणि ज्या खासगी एजन्सीला काम देण्यात आले आहे त्यावर लक्ष देण्यात येईल. कामात दिरंगाई दिसल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.
— राहुल गुप्ता, सहव्यवस्थापकीय संचालक महावितरण.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.