छत्रपती संभाजीनगर : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या मराठवाड्यातील वसतिगृहाचे तीन तेरा झाल्याची अवस्था आहे. एकीकडे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा तर दुसरीकडे वसतिगृहांच्या दयनीय परिस्थितीवर संबंधित यंत्रणांचे नाकर्तेपण विद्यार्थ्यांच्या मुळावर येत आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील चार जिल्ह्यातील वसतिगृहांत राहणाऱ्या पाच हजार ४६८ मुला-मुलींची ही अवस्था आहे.
विभागांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुलांचे दहा तर मुलींचे नऊ अशी एकूण १९ शासकीय वसतिगृहे आहेत. या वसतिगृहात कधी वेळेवर पाणी मिळत नाही तर पावसाळ्यात वीजेची अपुरी व्यवस्था असते. तक्रार करा तर कोणाकडे करा अशी अवस्था झाल्याने या विद्यार्थ्यांना कोणी वाली आहे का? असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड या चार जिल्ह्यातील मुला-मुलींच्या ५१ वसतिगृहात २०२२ - २०२३ मध्ये एकूण साडेपाच हजारांवर प्रवेश झाले आहेत. परंतू, सुविधाच नसल्याने राहताही येईना आणि जाताही येईना अशी अवस्था झाल्याचे दुःख विद्यार्थी बोलून दाखवितात. नाव न छापण्याच्या अटीवर अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले, की तक्रार केली की शिक्षा मिळते. मग ती शिक्षा कधी वेळेवर पाणी, वीज न देण्याचीही असते. ५१ वसतिगृहांमध्ये दोन हजार ९४३ मुले तर दोन हजार ५२५ मुली अशा एकूण पाच हजार ४६८ विद्यार्थी संख्या आहे.
अन् विद्यार्थी वाचला!
शहरातील किलेअर्क भागातील समाजकल्याण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांच्या वसतिगृहात नऊशेवर विद्यार्थी संख्या आहे. युनिट दोनच्या दुसऱ्या मजल्यावरील २१ क्रमांकाच्या खोलीत विद्यार्थी अभ्यास करत असताना छताचा भाग अचानक कोसळल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेत एक विद्यार्थी जखमी झाला.
विशेष म्हणजे महिनाभरात चार ते पाच वेळेस अशी घटना घडल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. जखमी विद्यार्थी हा वनरक्षक पदभरतीची तयारी करत असून त्याला लेखी परीक्षेत ९० गुण मिळाले होते, आता तो मागील काही महिन्यांपासून मैदानी सराव करत होता, मात्र पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला आता तत्काळ सरावासाठी बाहेर पडता येणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे विद्यार्थी म्हणाला. महत्त्वाचे म्हणजे शिक्षण बाजूला ठेऊन यासारख्या पायाभूत सुविधांसाठी विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करावे लागले, इतके होऊनही अद्याप ढासळलेला भाग दुरुस्त केले नसल्याचे चित्र आहे.
कुठे किती वसतिगृहे
शहर मुलांचे मुलींचे एकूण
वसतिगृह वसतिगृह वसतिगहे
छ. संभाजीनगर १० ०९ १९
जालना ०६ ०४ १०
परभणी ०४ ०५ ०९
बीड ०६ ०७ १३
एकूण २६ २५ ५१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.