छत्रपती संभाजीनगर : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची उडालेली दोन शकले, काँग्रेसमध्ये पडलेली फुट, भाजप-शिवसेनेतील रस्सीखेच तसेच मराठा आरक्षण आंदोलनानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. महायुती, महाआघाडी, एमआयएम, मनसे, बसप, बीआरएस, जय बाबाजी भक्त परिवार, ‘वंचित’सह अपक्ष मराठा उमेदवारांमुळे यंदा छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात बहुरंगी रणसंग्राम होऊ शकतो.
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात या पक्षातील फुटीमुळे पाच आमदार शिंदे गटात; तर राष्ट्रवादीतील फुटीमुळे कार्यकर्ते विखुरले आहेत. अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे स्थानिक काँग्रेसमध्येही दुही निर्माण झाली. तर दुसरीकडे मराठा समाजाला दिलेले दहा टक्के आरक्षण, सगेसोयरे मागणीच्या अंमलबजावणीसाठी सुरू असलेले आंदोलन, जय बाबाजी भक्त परिवार (शांतीगिरी महाराज), मराठा समाजातील काही जणांनी केलेली निवडणूक लढण्याची घोषणा, भाजपमधील इच्छुकांच्या उड्या यामुळे लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे.
भाजपची गाडी सुसाट
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुट, शांत शिंदे गटाचा फायदा घेत छत्रपती लोकसभा मतदारसंघात भाजपची गाडी सध्या सुसाट आहे. ही जागा आपल्याच सुटणार, हे गृहीत धरून पक्ष कामाला लागला आहे. त्यामुळे अमित शाह यांची तीन जिल्ह्यांची सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे. पक्ष निरीक्षकांकडून बैठका सुरू आहेत. इच्छुकांची संख्या मात्र वाढली आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, विजया राहटकर यांची नावे सध्या तरी चर्चेत आहे. त्यात अतुल चव्हाण यांच्या नावाचीही भर पडली आहे.
महाविकास आघाडीत ठाकरे गटाची तयारी
महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटणार, हे निश्चित असून चंद्रकांत खैरे हेच पुन्हा मैदानात राहतील, अशी शक्यता आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे दोन्ही पक्ष सहकाऱ्याच्या भूमिकेत दिसतील. त्यांच्याकडे ठाकरे गटाला साथ देण्याशिवाय पर्याय नाही. काँग्रेसचा एक गट जागा आपल्याकडे घ्यावी, या मताचा आहे. त्यासाठी डॉ. कल्याण काळे यांचे नाव पुढे केले जात आहे. मात्र, जालन्याची जागा पक्षाला सुटल्यास डॉ. काळे यांच्याकडे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे.
शिंदे गटात मात्र शांतता
मागील निवडणुकीत ही जागा शिवसेनेची होती. मात्र, चंद्रकांत खैरेंना पराभवाचा सामना करावा लागल्याने आता भाजप या जागेवर आक्रमकपणे दावा करत आहे. अगोदर ही जागा आम्हीच लढणार, असे आक्रमकपणे सांगणाऱ्या शिंदे गटातून मागील काही दिवसांपासून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. त्यांच्याकडे पालकमंत्री संदीपान भुमरे, आमदार संजय शिरसाट यांची नावे पुढे केली जात होती.
मतविभाजनाचा एमआयएमला लाभ
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मतांची फाटाफूट झाल्याने ‘एमआयएम’चे इम्तियाज जलील विजयी झाले होते. या निवडणुकीत महाविकास आघाडी, महायुती, बीआरएस, बसप, मनसे, जय बाबाजी भक्त परिवार, मराठा समाजातील अपक्ष उमेदवार मैदानात राहिल्यास या मतविभाजनाचा लाभ पुन्हा एमआयएमला होऊ शकतो. बहुरंगी लढतीचा फटका महाविकास आघाडी, महायुती आणि ‘वंचित’चा उमेदवार मैदानात राहिल्यास एमआयएमलाही बसेल. यावेळीही इम्तियाज जलील हेच उमेदवार राहण्याची शक्यता आहे.
मराठा फॅक्टर महत्त्वाचा
छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात मराठा फॅक्टर महत्त्वाचा आहे. मागील निवडणुकीत अपक्ष हर्षवर्धन जाधव यांनी दोन लाख ८३ हजार मते घेतल्याने शिवसेनेचे चंद्रकांत खैरे पराभूत झाले. सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले, आंदोलनाची धार कमी झाली तरी प्रभाव मात्र कायम आहे. जिल्ह्यात मराठा मतदार ज्या पक्ष, उमेदवाराच्या बाजूने जातात, तो विजयाजवळ जातो, असे गणित आहे. त्यातच मराठा आरक्षणासाठी याचिका करणारे विनोद पाटील यांनीही निवडणूक लढण्याची घोषणा केली. ते कुणाकडे जातात, याकडे अनेकांचे लक्ष आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.