- ९९२२९९४३१४
शहर व जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत जिथे पर्यटक जाऊ शकतात. मात्र, तिथे पर्यटन विभाग, पुरातत्त्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने ही पर्यटनस्थळे, वारसास्थळे पर्यटकांच्या नजरेआड आहेत. या नजरेआड असलेल्या या वारसास्थळांचे मार्केटिंग केले तर पर्यटनवाढीसाठी निश्चितच आणखी चालना मिळेल यात शंका नाही.
शहरानजीकचे बुद्ध लेणीसमूह
छत्रपती संभाजीनगर शहरात उत्तरेला सोनेरी महालापासून जवळच आहेत बौद्धकालीन लेण्या. या लेण्यांचा सातव्या शतकाच्या मध्यकाळातील कालखंड तर काही संशोधकांच्या मते पाचवे शतकाचा उत्तरार्ध ते सहाव्या शतकाची सुरुवात सांगितला जातो. संशोधकांची कालखंडविषयक वेगवेगळी मते आहेत.
बदामी चालुक्यांचा काळात अर्थात सहाव्या शतकात ही लेणी खोदली असावी. या लेण्यांमध्ये थेरवादी, महायानी आणि वज्रयाणी अशा बुद्धधम्मातील तीनही विचारधारांचे प्रतिबिंब इथल्या लेण्यांमध्ये आहे. महाविहाराकडील बाजूने आणि हनुमान टेकडीकडील बाजूने असे दोन लेणीसमूह इथे आहेत.
सोनेरी महाल
औरंगजेब बादशहासोबत आलेल्या बुंदेलखंडातील सरदार पहाडसिंगाने बांधलेला सोनेरी महाल. सोनेरी महालाची वास्तू दोन मजली आहे. वरती जाण्यासाठी दक्षिणोत्तर भागात जिने आहेत. सर्वांत वर गच्चीवर टेहळणी मनोरा आहे. इमारतीस भव्य संतुलित नक्षीदार कमानी, कमानीतून उत्तम प्रकारची प्रकाशयोजना व मध्यभागी मुख्य वास्तू अशी रचना केली आहे. सोनेरी महाल हे राजपूत व मुघल यांच्या संमिश्र स्थापत्य शैलीचे उत्कृष्ट असे उदाहरण आहे.
महालाच्या दरबार सभागृहामध्ये सोनेरी रंगाच्या ठिकाणी खऱ्या सोन्याचे पाणी वापरून नक्षी काढण्यात आली. त्यामुळे सोनेरी महल असे म्हटले जाते. काळाच्या ओघात येथील चित्रे अंशत: नष्ट झाली. वास्तूच्या पहिल्या मजल्यावर असलेले प्रादेशिक वस्तुसंग्रहालय १९७९ मध्ये स्थापन करण्यात आले. यात पुरातन कलावस्तूंचा संग्रह विविध दालनांमध्ये प्रदर्शित केला.
यात प्राचीन मूर्ती, चित्रे, दागिने, मातीची भांडी, शस्त्रे यासारख्या वस्तूंचा समावेश असून, पैठण व तेर उत्खननात प्राप्त भाजलेल्या मातीच्या कलावस्तू, लाकडी फळीवर व काचेवर रेखाटलेली चित्रे, मराठवाड्याच्या विविध भागांतून मिळालेली दगडी शिल्पे विशेष उल्लेखनीय आहेत. हे संग्रहालय सोमवार वगळता आठवड्याच्या अन्य दिवशी सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाचपर्यंत प्रेक्षकांसाठी खुले असते.
लाला हरदौल चबुतरा
सोनेरी महालाच्या समोरच लाला हरदौल यांची समाधी आहे. हे पहाडसिंग यांचे भाऊ होते. लाला हरदौल बुंदेल खंडातील महान सेनानी व कुशल योद्धा म्हणून परिचित आहेत. त्यांची समाधी चौरस आकाराची आहे. या समाधी परिसरात एक पायऱ्यांची विहीर आहे. बुंदेलखंडाच्या इतिहासात त्यांच्या पराक्रमामुळे वेगळे स्थान आहे. आजही त्यांच्या शौर्याच्या कथा बुंदेलखंडात व इतरत्र प्रसिद्ध आहेत.
लाला हरदौल यांचे वाढते सामर्थ्य सहन न होऊन त्यांचे भाऊ झुंजारसिंह यांनी त्यांना विजयादशमीच्या दिवशी वर्ष १६३१ मध्ये विषप्रयोग करविला. त्यात त्यांचा मृत्यू झाला असा उल्लेख मिळतो. लाला हरदौल यांची स्मृती म्हणून त्यांच्या स्मरणार्थ बांधलेली ही नामसमाधी हरदौल चबुतरा म्हणून ओळखला जातो. या चबुतऱ्यावर देवनागरी व उर्दू लिपीत एक लेख कोरलेला असून, त्यात हरदौल असा उल्लेख आहे.
निपट निरंजन
निपट निरंजन बाबा मूळचे बुंदेलखंडचे. १६७३ मध्ये बाबा छत्रपती संभाजीनगरात आले. तपस्येनंतर ते गुरूच्या शोधात सूलिभंजनच्या डोंगरावर नाथपंथी संतांचा मेळा जमलेला होता, तिथे ते गेले. गोरक्षनाथांचे शिष्य चर्पटनाथ तिथं होते. गुरुपौर्णिमेनिमित्त एका कढईत प्रसाद शिजवणं सुरू होते. प्रसाद होता, कढईत टाकलेल्या गोम, विंचू, साप, सरडे, खेकडे, पालींचा. चर्पटनाथांनी शाबरी कवच म्हटले.
शिजवलेल्या या प्रसादावर जलसिंचन केले आणि संतांची पंगत बसली. प्रसाद वाटला जात होता. पण, हा असला विषारी प्रसाद खायचा तरी कसा? बाबांच्या मनात संशय आला. त्यांनी प्रसाद खाल्ला नाही. सगळे साधू प्रसाद खाऊन झाल्यावर महायोगी चर्पटनाथांनी निपटबाबांचं मन जाणलं. ‘तेरे हिस्से का जो बचा है, उसे निपट ले!’ गुरू आदेश झाला. मग बाबांनी कढईच्या तळाशी उरलेसुरलं निपटून खाल्लं आणि भावसमाधीत लीन झाले.
चर्पटनाथांच्या ‘निपट ले’ या आज्ञेचं या शिष्यानं पालन केलं आणि बाबांचं नाव ‘निपट महाराज’ पडलं. बाबा सिद्ध पुरुष झाले. औरंगजेब बादशहा खुलताबाद, दौलताबाद आणि छत्रपती संभाजीनगर भागातील सुफी संत आणि सिद्ध पुरुषांच्या खास भेटी घेत असे.
पहाडसिंगपुऱ्यात राहणाऱ्या निपट बाबांची महती त्याच्या कानावर गेली. बादशहानं या साधूची भेट घेतल्याचे उल्लेख आढळतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील लेण्यांच्या पायथ्याशी त्यांची समाधी आहे.
पर्यटनासाठी योग्य, मात्र दुर्लक्षित पर्यटनस्थळे
शुलभंजन पर्वतावरील दत्त देवस्थान, संजीवन शिळा
शुलभंजन जवळील परियों का तालाब
मराठवाड्याचे महाबळेश्वर म्हैसमाळ
छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्वज
मालोजीराजे भोसले यांची वेरूळ येथील गढी
मलिक अंबरकालीन नहरींचे व्यवस्थापन
पितळखोरा येथील लेण्या
जंजाळा येथील घटोत्कच लेणी
बेगमपुऱ्यातील थत्ते हौद
घाटनांद्रा येथील जोगेश्वरी
संत ज्ञानेश्वर माउलींचे जन्मस्थान आपेगाव
अंभई (ता. सिल्लोड) येथील वडेश्वर मंदिर
वेताळवाडी (ता. सिल्लोड) किल्ला
अंतूर किल्ला (ता. कन्नड)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.