Aurangabad : कृती छोटी, पण डोंगराएवढी

दलित महिला तयार करतात महालक्ष्मींचा महानैवेद्य
gauri ganpati festival
gauri ganpati festivale sakal
Updated on

औरंगाबाद : महालक्ष्मींना महानैवेद्याचे भोजन दिले जाते, हा महानैवद्याचा स्वयंपाक कोणी, कसा करावा याविषयीच्या प्रथा,परंपरा आहेत. मात्र,समाजातील काही पुढारलेल्या व्यक्तींनी या परंपरांना बाजूला सारून सामाजिक समतेच्या दिशेने पावले टाकली आहेत.अरविंद केंद्रे यांच्या घरी दलित समाजातील महिलांच्या हातून महालक्ष्मीच्या महानैवद्याचा आणि ४० जणांसाठीचा स्वयंपाक तयार केला जातो. केवळ याच वर्षी नव्हे तर तीन वर्षांपासून या महिला हा महानैवद्य मनोभावे तयार करतात.सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून हा स्तुत्य उपक्रम सुरू आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचलित लहुजी साळवे आरोग्य केंद्राची स्थापना १९८९ मध्ये झाली. अतिशय छोट्या किरायाच्या खोलीतून आरोग्य सेवेचे काम सुरू झाले. आरोग्य सेवा देतानाच लोकांना साक्षर करणे, साक्षर झालेल्यांच्या हाताला काम आणि त्यासाठी काहीतरी कौशल्य हवे म्हणून १९९४ मध्ये सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ या नवीन संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यामार्फत विविध अभ्यासक्रम शिकविले जातात. महिला सक्षमीकरण, प्रशिक्षित महिलांना रोजगार मिळून देणे आदी उपक्रम हाती घेतले आहेत, त्यापैकीच ‘अन्नपूर्णा’ हा एक प्रकल्प आहे.

फुलेनगर, कबीरनगर, मुरलीधरनगर आदी वस्तीतील महिलांचे सर्वेक्षण करून (त्यांचे पती, सासुबाईचे समुपदेशन करून) त्यांना लहुजी साळवे आरोग्य केंद्रात येण्यास प्रोत्साहित केले. महिलांना तीन महिने प्रशिक्षण दिले जाते. यात वेगवेगळ्या १०० पदार्थांच्या रेसिपी शिकवल्या जातात. स्वच्छता कशी राखावी याचेही प्रशिक्षण दिले जाते. प्रात्यक्षिक करतानाचे सर्व साहित्य संस्था उपलब्ध करून देते. याचे वेगळे शुल्क घेतले जात नाही. त्यांना प्रमाणपत्र दिले जाते, मोठा व्यवसाय करायचा तर त्यांना कर्ज काढून दिले जाते. आतापर्यंत सुमारे १२०० च्या जवळपास महिलांनी प्रशिक्षण घेतले आहे.

महिलांना ‘ऑर्डर’ मिळवून दिल्या जातात.अन्नपूर्णा प्रकल्पात महिलांना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण देऊन त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पदार्थ बनवायला पाठवले जाते. यापैकीच एक आहेत, मुरलीधरनगरात राहणाऱ्या निर्मला उमप. त्या म्हणाल्या,घरात कमावणारं कुणी नाही. पतीला पॅरॅलीसीस असल्यामुळे घरात कुणाचा आधार नाही. आता अन्नपूर्णा प्रकल्पाकडून ऑर्डर आणि पाठबळ मिळत आहे. गयाबाई तुपे म्हणाल्या,आजपर्यंत अनेक ऑर्डर पूर्ण केल्या. नवऱ्याला नोकरी नव्हती,रेल्वेमध्ये माल उतरून घेण्याचे काम करत होते. कोरोनामुळे त्यांचे काम गेले. आता आधार आहे तो अन्नपूर्णाचा. या दोघींना यंदा अरविंद केंद्रे यांनी महालक्ष्मीचे जेवण बनवण्यासाठी स्वतःच्या घरी बोलावून घेतले आणि या महिलांनाही महालक्ष्मींसाठीचा नैवद्य बनवून ४० जणांचा स्वयंपाकही केला.

प्रत्यक्ष कृतीचे महत्त्व

सामाजिक समता हा विषय बोलायला सोपा,भाषणाला सुलभ आहे. प्रत्यक्ष कृती करायची म्हटली की,कारणे सांगून टाळाटाळ केली जाते. त्यात देवदेवता, धार्मिक प्रथा-परंपरांचा विषय आला, की ही बाब ठळकपणे दिसते. म्हणूनच महालक्ष्मीचा महानैवेद्य दलित महिलांनी तयार केल्याचा हा विषय वाचायला, ऐकायला छोटा वाटत असला तरी, त्याचे सामाजिक महत्त्व डोंगराएवढे आहे. सर्वधर्मीय संतांची मानवतेची शिकवण, समाजसुधारकांच्या कार्याचे हे दृश्‍य रूप आहे. तसेच सामाजिक समतेसाठी प्रत्यक्ष कृती करीत असलेल्या संस्था-संघटनांसाठी हा उपक्रम ऊर्जा वाढविणारा आहे.

मी सामाजिक क्षेत्रात काम करत असल्याने आम्ही जात-पात मानत नाही. सोवळे वगैरे काही नाही. जशा आल्या तशा त्यांनी नैवद्याचा स्वयंपाक केला. पुरणपोळीचा स्वयंपाक अतिशय रूचकर केला होता. त्यांनी केलेलाच नैवेद्य महालक्ष्मींना अर्पण केला.

- अरविंद केंद्रे

समाजातील पुढारलेले काही जण जुन्या संकल्पनांना सोडून देत आहेत. तसेच झोपडपट्टी भागातील महिला कौशल्य शिक्षण घेवून त्यांच्यातील गुणवत्ता दाखवून देत आहेत. पुढारलेला समाज घटक आता सोवळ्या-ओवळ्याच्या संकल्पना सोडायला तयार होऊन सामाजिक समतेच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत आहे. अशा घटना कमी जरी असल्या तरी अशा उदाहरणांमधून आदर्श घेतला गेला पाहिजे.

- डॉ. दिवाकर कुलकर्णी,अध्यक्ष, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ

सर्वांभूती देव वसे, नीचा ठायी काय नसे?

योगीराज महाराज गोसावी (संत एकनाथ महाराज यांचे १४ वे वंशज) ः चारशे वर्षांपूर्वी शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांनी तहानलेल्या गाढवाला तीर्थजल पाजले, अस्पृश्याच्या घरी आनंदाने भोजन केले. एका अभंगात ‘जया म्हणती नीच वर्ण, स्री शुद्रादी हीन जन, सर्वांभूती देव वसे, नीचा ठायी काय नसे? असा प्रश्‍न नाथ महाराज करतात. वर्णव्यवस्थेतील उच्चवर्णीय ज्या पंचमहाभतांपासून निर्माण झालेले आहेत त्याच पंचमहाभूतांपासून शूद्र आणि स्‍त्री निर्माण झालेले आहेत, असा नाथ महाराजांनी विचार दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.