Manudevi yatra : आषाढात भरते घनदाट जंगलात मनुदेवीची यात्रा

तालुक्यातील घाटनांद्रा-जळगाव जिल्ह्यातील पाचोरा रस्त्यावर असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी, निसर्गाच्या सान्निध्यात जगदंबा मनुदेवीमातेचे सुंदर व आकर्षक मंदिर आहे.
Manudevi yatra
Manudevi yatra
Updated on

सिल्लोड (जि. छत्रपती संभाजीनगर): तालुक्यातील घाटनांद्रा-जळगाव जिल्ह्यातील पाचोरा रस्त्यावर असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी, निसर्गाच्या सान्निध्यात जगदंबा मनुदेवीमातेचे सुंदर व आकर्षक मंदिर आहे. जागृत व भाविकांच्या नवसाला पावणारी देवी म्हणून ती ओळखली जाते. नवरात्रोत्सव काळात याठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते, तर आषाढ मासात येथे मोठी यात्रा भरते.

श्रीराम जोशी, घाटनांद्रा

घा टनांद्रा-पाचोरा रस्त्यावर डोंगराच्या पायथ्याशी मनुमाता देवीचे भव्य मंदिर उभारलेले आहे. गाभाऱ्यात मनुमाता देवीची भव्य मूर्ती आहे. ही देवी भाविकांच्या नवसाला पावणारी व सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. दरवर्षी नवरात्रात देवीच्या दर्शनासाठी खानदेश, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणांहून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. देवीविषयीची आख्यायिका अशी, की निजामकाळात या ठिकाणाहून जवळच असलेल्या कन्नड तालुक्यातील लोहगाव येथील एका गरीब घरच्या मनू नावाच्या मुलीने तिच्या लग्नाला विरोध केला. त्यानंतर ती घाटनांद्रा डोंगराच्या दिशेने निघून गेली. ग्रामस्थांनी तिचा शोध घेण्यासाठी तिच्यामागे धाव घेतली असता, तिने उंच टेकडीवरून उडी मारली आणि खोल दरीत डोंगराच्या पायथ्याशी देवीच्या रूपात प्रकट झाली, तीच ही मनुदेवीमाता. त्यानंतर मनुदेवीच्या रूपात तिची भाविक पूजा करू लागल्याचे सांगितले जाते.

दुपारी बाराला सूर्यदर्शन

पूर्वी या ठिकाणी देवीचे जुने मंदिर होते. प्रचिती आलेल्या काही भक्तांनी, काही दानशूरांनी केलेल्या मदतीतून व लोकवर्गणीतून आज या ठिकाणी देवीचे भव्य मंदिर उभे राहिले आहे. खानदेशात जाताना लागणाऱ्या नागमोडी डोंगराच्या पायथ्यापासून काही अंतरावर हे मंदिर आहे. मनुदेवीचा परिसर निसर्गरम्य असून, हा परिसर इंग्रजीतील व्ही आकारासारखा दिसतो. मंदिर परिसरात फक्त तीन तासच सूर्य दिसतो. दुपारी बाराला या ठिकाणी सूर्य दिसतो, तर दुपारी तीनला मावळतो. तीनला सूर्य मावळताना इथून पाहणे एक चांगला अनुभव असतो.

तीर्थस्थळाचा दर्जा देऊन विकासाची गरज

देवीचे मंदिर हे घनदाट जंगलात असून हिंस्र पशू वाघ, तडस, लांडगे यांचा याठिकाणी वावर आहे. मंदिराजवळ ३०० फूट उंचावरून कोसळणारा आकर्षक धबधबा डोळ्यांचे पारणे फेडतो. पावसाळ्यात परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे हा धबधबा खास आकर्षण ठरतो. हा परिसर निसर्गरम्य आहे. परंतु, या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता नाही व रस्त्यात एक नदी लागत असल्याने भाविकांना मोठी कसरत करत घनदाट झाडीतून वाट काढत देवीच्या मंदिरापर्यंत जावे लागते. काही दिवसांपूर्वी स्थानिक लोकांनी श्रमदानातून हा रस्ता सुरळीत केला होता. परंतु, पावसामुळे हा तयार केलेला रस्ता वाहून जातो. शासन, लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन दर्जेदार रस्ता करावा, या स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा, अशी मागणी सरपंच सदाशिव राठोड, प्रकाश बाविस्कर, साहेबराव चव्हाण, अजमल राठोड, हरी कोलते, विजय चौरंगे, अशोक मोरे, शिवाजी मोरे, संतोष बिसेन आदींनी केली आहे.

आषाढात यात्रोत्सव

मनुदेवी ही खानदेशासह मराठवाड्याची कुलस्वामिनी असल्याने देवीच्या दर्शनासाठी दूरवरून भाविक मोठी गर्दी करतात. आषाढ महिना सुरू झाला, की या देवीचा यात्रोत्सव असतो. आषाढातील शेवटच्या मंगळवारी इथे यात्रोत्सव केला जातो. भंडारा ठेवून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. या यात्रेसाठी खानदेश भागासह दूरवरून भाविक यात्रेसाठी हजेरी लावतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.