Marathwada Muktisangram 2023 : मराठवाडा आणि बांधकाम व्यवसाय

मराठवाड्याच्या विकासात बांधकाम व्यवसायाचा मोलाचा वाटा आहे
बांधकाम
बांधकाम sakal media
Updated on

‘‘इतर विभागाच्या तुलनेत मराठवाडा हा मागासलेला भाग म्हणून ओळखला जातो. गेल्या काही दशकांपासून झालेल्या विकासामुळे मागासलेपणाचा डाग मिटत चालला आहे. मराठवाड्याचा सर्वच क्षेत्रांत झपाट्याने विकास या ७५ वर्षांत झाला आहे.

मराठवाड्याच्या विकासात बांधकाम व्यवसायाचा मोलाचा वाटा आहे. अगदी साध्या घरांपासून ते फ्लॅटपासून-रो-हाऊस ते गगनचुंबी इमारती उभारल्या जात आहेत. यामुळे हे केवळ छत्रपती संभाजीनगरलाच (औरंगाबाद) होत नाही, तर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांतील बांधकाम व्यवसायाच्या बदलामुळे शहरे आणखीनच आकर्षक झाली आहेत.

अन्न-वस्त्र-निवारा या गरजेतील तिसरी मूलभूत गरज आता पहिल्या स्थानी आली आहे. त्यामुळे प्रत्येकजण चांगल्या घरासाठी प्रयत्न करीत आहे. मराठवाड्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने मराठवाड्यातील बांधकाम व्यवसायाने कात टाकत नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवीन प्रकल्प उभारत मराठवाड्यातील शहरांना मेट्रो शहराकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहेत.’’

विकास चौधरी

मराठवाड्याच्या ७५ वर्षांचा आढावा घेताना मराठवाड्यातील बांधकाम क्षेत्रात झपाट्याने बदल झाल्याचे दिसून येते. सुरुवातीला झाडाझुडपांपासून घरे बनवली जात होती. त्यानंतर पांढऱ्या मातीपासून घरे बनविण्यात आली. त्यानंतर माडी (ढाब्याचे घरे) बनवण्यात आली. हळूहळू काळ पुढे घेण्यानंतर प्रगती होत असल्यामुळे त्याप्रमाणे बदल होत गेला. १९६०च्या दशकानंतर देशात हरित क्रांती झाली.

त्‍यानंतर रोजगारासाठी लोकांचे ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर झाले. यामुळे शहरीकरणाला वेग आला. यामुळे नोकरदार वर्गाची घराची मागणी वाढली. त्यानंतर शेतात प्लॉट पाडून घरे बांधण्यात येत आहे. हे करताना त्यावेळी उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीतून ही उभारणी करण्यात आली. यातून शहराचाही विस्तार झाला. कामगार, नोकरदार वर्ग वाढत गेल्यामुळे सर्वच शहरे विशेष करून छत्रपती संभाजीनगर वाढले.

सर्वांत वेगाने वाढते शहर

राज्यातील मोठी शहरे विकसित होत असताना सर्वच ठिकाणी पायाभूत सुविधा वाढल्या. शैक्षणिक संस्था वाढल्या, मोठमोठे रुग्णालय मराठवाड्यात झाले. औद्योगिक वसाहत वाढल्या. देशात १९६० ते १९७०च्या दशकात औद्यागिक क्रांती झाली. १९७०-७५ मध्ये मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरला (औरंगाबाद) औद्योगिक क्रांतीचे एक विकासस्थान मानले गेले. त्यावेळी चिकलठाणा औद्योगिक वसाहत उदयाला आली. १९७५-८० मध्ये वाळूज औद्योगिक वसाहत विकसित झाली.

शहराच्या दृष्टीने खरा ब्रेक हा १९८० मध्ये बजाज कंपनी आल्यानंतर मिळाला. ही मोठी कंपनी आल्यानंतर असंख्य रोजगार उपलब्ध झाला, बजाजला लागणारे साहित्य पुरविण्यासाठी पाच ते सहा हजार छोटे मोठे वेंडर तयार झाले. त्यानंतर मल्टिनॅशनल कंपन्याही वाळूजला आल्या. औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या आल्या.

त्यानंतर क्लस्टर तयार झाले. जायकवाडी जलाशयाचे पाणी शुद्ध असल्यामुळे या ठिकाणी मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्या आल्या. यामुळे १९८०-९० च्या काळात आपल्या भागातील औद्योगिक क्रांती झाली. त्यानंतर इंडस्ट्रिअल ग्रोथ झपाट्याने झाली. यामुळे आशिया खंडात सर्वाधिक वेगाने, औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने वाढणाऱ्या शहरात छत्रपती संभाजीनगरचा पहिला क्रमांक होता.

या औद्योगिकीकरणात लोकांचे होणारे स्थलांतर वाढले. त्यानंतर सोसायटी प्लॉट्स वाढले. त्यानंतर बांधकाम व्यावसायिकही विविध प्रकल्प विकसित करू लागले. सुरुवातीला १२ व १८ फ्लॅटच्या छोट्या-छोट्या स्कीम बनत होत्या. या विविध प्रकल्पाच्या वतीने शहरात लोकांना बांधकाम व्यावसायिकांच्या माध्यमातून मिळू लागली. १९९० नंतर विद्यापीठात विविध कोर्सेस विकसित झाले. शैक्षणिक गरजेसाठी मराठवाड्यातून छत्रपती संभाजीनगरला येऊ लागले. जागतिक वारसास्थळे इथे आहेत.

देश-विदेशातून पर्यटक वाढू लागल्यानंतर रामा, ॲम्बेसेडरसारख्या हॉटेल्स इथे उभ्या राहिल्या. यामुळे शैक्षणिक, राजकीय, आरोग्यविषयक सर्वच बाजूने छत्रपती संभाजीनगर महत्त्वाचे सेंटर बनले. १९९५ ते २००० दरम्यान शेंद्रा औद्योगिक वसाहतीचा विकास झाला. चोहोबाजूने विकास झाल्यामुळे घरांची मागणी वाढली. तेव्हा बांधकाम व्यावसायिकांच्या संघटना पुढे येऊ लागल्या. याच काळात बांधकाम व्यवसायाला मोठी चालना मिळाली. साधारणतः २००० पासून शहरीकरण खूप वाढले. २००७-०८ मध्ये रिअल इस्टेटने भरारी घेतली.

आता छत्रपती संभाजीनगरला यूडीसीपीआरचा नवीन नियम आला आहे. त्यामुळे गगनचुंबी इमारती इथे पाहायला मिळतील. २२ ते ३६ मजल्यांपर्यंत इमारती येथे होणार आहेत. या सर्व गोष्टी घडत गेल्या. आर्थिक स्रोत वाढत गेला. त्यामुळे मोठ्या टाइपच्या घरांची मागणी वाढू लागली. कामगार वर्ग, अत्यल्प उत्पन्नगटातील लोकांसाठी अगदी दहा लाखांपासून बांधकाम व्यावसायिक घरे देत आहोत. २०१६ मध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २ लाख ७० हजार रुपयांपर्यंत सबसिडी लोकांना मिळाल्याने अनेकांची घरे झाली.

यासह बांधकाम व्यवसायालाही चालना मिळाली. २०२२ मध्ये ही सबसिडी बंद केली; पण आम्ही पुन्हा क्रेडाई या बांधकाम व्यावसायिक संघटनेच्या वतीने ही योजना सुरू करण्यासंदर्भात मागणी करीत आहोत. तीन वर्षे ही सबसिडी सुरू ठेवणे गरजेचे आहे. याप्रमाणे विकास होत गेला. शहरात मोठमोठे मॉल बांधले गेले, सिनेमागृह, मल्टिप्लेक्स थिएटर आली. हॉस्पिटल बांधले गेले. शैक्षणिक संस्था आल्या. शहराचा सर्वांगीण विकास होत गेला.

बांधकाम
Chhatrapati Sambhaji Nagar : फुलंब्रीत पहिल्या महिला सभापतीपदी अनुराधा चव्हाण विराजमान

मोठी क्षमता

औद्योगिकीकरणानंतर नव्वदच्या दशकातच शहरातील तापडियासारख्या विकासकांनी काही प्रकल्प सुरू केले. चार ते पाच जणांना लागणारा फ्लॅट तयार केला. त्यावेळी फ्लॅट छोटे होते; पण कुटुंबाला पुरसे होते. त्यानंतर आर्थिक स्रोतानुसार लोक मोठ्या फ्लॅट रो-हाउस बंगलोकडे वळले गेले. २००६-०७ नंतर शहरात (ग्रुप हाउसिंग) मोठे प्रकल्प सुरू झाले. आज तर मोठ्याप्रमाणात चारही दिशेने वाढत आहे. आतापर्यंत दहा ते १२ मजल्याच्या इमारती बनल्या आहेत. त्यामुळे सरासरी आठ ते दहा मजल्यांची इमारती आहेत.

बांधकाम
Sambhaji Chhatrapati : राज्यातील पक्षांसमोर नवं आव्हान ; स्वराज्य संघटनेचा सर्व निवडणुका लढवण्याचा ठराव मंजूर!

मराठवाड्याच्या विकासात क्रेडाई संघटनेचा मोठा वाटा आहे. बांधकाम व्यावसायिकांना मार्गदर्शन करीत चांगले काम करण्याचे शब्द घेत, ग्राहकांसोबतच्या व्यवहारात पारदर्शकता आणण्याचे काम करीत आहे. हे सर्व क्रेडाईचे सदस्य बनल्यानंतर त्यांच्याकडून सर्व नियम पाळले जातील याची हमी घेत असतो. क्रेडाई बिझनेससोबत सामाजिक कामही करतो. एक ते सात मे दरम्यान कृतज्ञता सप्ताह साजरा केला.

डीएमआयसीसारखा दहा हजार एकर जमीन असलेल्या भाग आहे. याठिकाणी मोठी क्षमता येथे आहे. मोठ्या कंपन्या आणल्या गेल्या तर बजाज कंपनी आल्यानंतर जशी क्रांती झाली होती. तशीच क्रांती पुन्हा होत मराठवाड्याची भरभराट होईल.

(लेखक ‘क्रेडाई’ छत्रपती संभाजीनगरचेअध्यक्ष आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.