औरंगाबाद : मराठवाड्यातील नगरपंचायत निवडणुकीच्या निकालात राज्यातील बदललेल्या राजकीय सत्तांतराचे चित्र उमटले आहे. मराठवाड्यातील एकूण २३ पैकी प्रत्येकी सहा नगरपंचायती जिंकत भाजप व राष्ट्रवादी कॉँग्रसमध्ये चुरस निर्माण झाली आहे. तर कॉँग्रेस व राष्ट्रवादी या महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनीही प्रत्येकी चार नगरपंचायती जिंकत दुसरा क्रमांक मिळविला आहे. तीन नगर पंचायतीत त्रिशंकू स्थिती असून तिथे अपक्ष किंवा इतर छोट्या पक्षांच्या भूमिकेवर सत्तेचा लंबक अवलंबून असेल.(Marathwada Nagar Panchayat Election)
आघाडीतील मंत्री सर्वश्री अशोक चव्हाण, अमित देशमुख, राजेश टोपे, अब्दुल सत्तार यांनी आपापल्या पंचायती राखल्या आहेत. तर बीड जिल्ह्यातील भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आष्टी, पाटोदा शिरूरचा गड सुरेश धसांमुळे राखला आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना मात्र आपापल्या जिल्ह्यात काही पंचायती राखण्यात अपयश आले आहे.
गेल्या वेळेप्रमाणे यंदाही या प्रमुख राजकीय पक्षांनी बहुतेक करून स्वतंत्र निवडणुका लढविल्या होत्या. ग्रामीण भागातील राजकीय वर्चस्वाची परीक्षा समजल्या जाणाऱ्या या निमशहरी व निमग्रामीण भागातील मतदारांनी आपला संमिश्र कौल दिला. केंद्रातील भाजप व राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांत विविध मुद्द्यांवरून दररोज आरोपांची राळ उठलेली दिसत असतानाच सर्वसामान्य मतदार मात्र कोविड, महागाई, मराठा-ओबीसी आरक्षण, एसटीचे आंदोलन, स्पर्धा परीक्षांर्थींच्या आत्महत्या, शेतकरी आंदोलन आदींनी त्रस्त झालेला आहे. त्याच गदारोळात या निवडणुका पार पडल्या.
दिग्गज नेत्यांनी राखले गड
नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांनी माहूर, नायगाव व अर्धापूर या नगरपंचायती पुन्हा मोठ्या मताधिक्क्याने राखल्या. नायगावात तर कॉँग्रेसने सर्वच्या सर्व जागा जिंकल्या. बीड जिल्ह्यातील पाचपैकी तीन पंचायती जिंकत पंकजा मुंडे यांनी बाजी मारली. जालना जिल्ह्यात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पाचपैकी घनसावंगी, तीर्थपुरी या पंचायती जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले. लातूर जिल्ह्यात मात्र भाजपला यश राखता आले नाही. गेल्यावेळी चारही पंचायतीत वर्चस्व राखलेल्या भाजपला केवळ शिरूर अनंतपाळ ही पंचायत निर्विवाद मिळाली. देवणीत भाजपचा सफाया झाला.
तीन ठिकाणी त्रिशंकू स्थिती
औरंगाबादमधील सोयगाव ही एकमेव नगरपंचायत शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपकडून खेचून घेतली आहे. जाफाराबाद, केज आणि चाकूरमध्ये त्रिशंकू अवस्था आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.