छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर व फुलंब्री बाजार समितीवर एकहाती सत्ता आणत आमदार हरिभाऊ बागडेंनी पुन्हा वर्चस्व सिध्द केले आहे. त्यांचे पारंपरिक विरोधक माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांना मात देत ही किमया त्यांनी साधली आहे.
यंदाच्या बाजार समितीच्या निवडणुकीत बागडे यांनी विरोधकांबरोबरच पक्षातील विरोधकांवरही नेम साधत त्यांनाही शांत केले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील पक्षातील इच्छुकांना या बाजार समितीच्या निवडणुकीत उभे करत त्यांचा विधानसभेतील पत्ता कट केला आहे. म्हणजेच ‘‘बागडे है तोही मुमकिन है’ असा संदेश देत एका दगडात दोन पक्षी मारले आहेत!
आमदार बागडे यांनी आमदारकी न लढविण्याची जाहिर घोषणा सहा ते सात महिन्यांपूर्वी केली. त्यानंतर फुलंब्री मतदारसंघातून अनेक इच्छुकांनी तयारी सुरु केली. यासाठी काहींनी वरिष्ठ पातळीवर हालाचाली सुरु केल्या आहेत.
२०१४ ते २०२३ या काळात आमदार बागडे यांनी मतदारसंघावर मजबूत पकड बनवली. वयाचे कारण देत श्री. बागडे यांनी हा निर्णय घेतला होता. त्यांच्यानंतर फुलंब्री मतदारसंघातून जिल्हा परिषदेच्या माजी बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा चव्हाण, फुलंब्रीचे नगराध्यक्ष सुहास शिरसाट, गाडेकर, प्रदीप आबा शिरसाट, किशोर शितोळे यांच्यासह अनेक जण इच्छुक होते.
त्यातील अनेकांनी उमेदवारी मिळेल, या आशेपोटी कामेही सुरु केली होती. असे असले तरी आमदार बागडे यांना २०२४ ची निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. ती इच्छा प्रत्यक्षात बोलून दाखविण्यापेक्षा आमदार बागडे यांनी त्यांच्या कार्यातून दाखवून देत आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी अनुराधा चव्हाण, सुहास शिरसाट, राधाकिसन पठाडे इच्छुक होते.
त्यांना बाजार समितीच्या निवडणुकीला उभे करुन विधानसभा निवडणुकीतील त्यांच्या समोरील पक्षातील एक-एक उमेदवार कमी केले आहेत. फुलंब्रीच्या बाजार समितीच्या सभापतीपदी अनुराधा चव्हाण यांची निवड करीत त्यांची विधानसभेच्या उमेदवारीची दारे एकप्रकारे बंद केली.
विधानसभेत काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार कल्याण काळे यांना मात देऊ शकणारा तगडा उमेदवार फुलंब्री मतदारसंघात नसल्याचेही आमदार बागडे यांनी बाजार समितीच्या निवडणुकीतून दाखवून दिले.
त्यातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपणच सक्षम असल्याचे चित्र सध्यातरी त्यांनी उभे केले आहे. बागडे यांना मंत्रीपदाची आशा आहे. जर आगामी मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळल्यास फुलंब्री मतदारसंघातून पुन्हा बागडे यांना पुन्हा संधी मिळू शकते.
बाजार समितीच्या सभापतीपदासाठी अभिजित देशमुख इच्छुक असल्यामुळे बागडे यांनी सावध भूमिका घेत, त्यांना भाजपात येण्याची गळ घातली. देशमुखांनी नाही म्हटल्यामुळे दगाफटका होण्याची भिती होती. त्यामुळे १२ संचालकांना गुजरात सहलीवर पाठवले.
रोज संपर्क ठेवत, नाराजांची समजूत काढत, पठाडेंचा मार्ग मोकळा केला. यासह अभिजित देमशुख यांची समजूत काढल्यामुळे मोठा अडथळा दूर झाला. फुलंब्रीतही अनुराधा चव्हाण यांच्यासाठी बागडेंनी विशेष पुढाकर घेतला. यामुळे दोन्ही बाजार समित्यांवर हवा असलेला उमेदवार देत सर्वांवर वर्चस्व प्रस्थापित केले.
बाजार समितीत पठाडे राहणार १२ वे सभापती
छत्रपती संभाजीनगरात कृषी उत्पन्न बाजार समितीचे पहिले सभापती व्यकंटराव नरसिंगराव जाधव हे तब्बल २५ वर्षे पदावर होते. त्यानंतर शब्बीर खा हुसेनखॉ पटेल हे नऊ वर्षे सभापती होते. यासह वैजिनाथ काळे, एस.के. जगताप, गंगाधर तांदळे, पंकज फुलपगर, संजय औताडे, राजू शिंदे, पठाडे असे ११ सभापती झालेले आहेत. राधाकिसन पठाडे हे १२ वे सभापती आहेत.
बाजार समितीत युतीला यश मिळाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून जो विकास थांबला होता, त्याला गती दिली जाईल. पिसादेवी रोडवरील गाळ्यांचे थांबलेले काम पूर्ण केले जात मोठे मार्केट तिथे उभे करणार आहे. शेतकरी, ग्राहक, व्यापारी यांना लागणाऱ्या सर्व सुविधा पुरवित आदर्श बाजार समिती करण्याचा प्रयत्न करू.
- हरिभाऊ बागडे, आमदार
चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत विरोधकांनी चुकीचे आरोप केले. मात्र मतदारांनी विश्वास दाखवत पुन्हा संधी दिली. सर्वांच्या एकजुटीमुळे विरोधकांचा पराभव झाला. आता अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करणार.
- राधाकिसन पठाडे, नवनिर्वाचित सभापती.
ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांच्या विरोधात न्यायालयात केस सुरु आहे, अशा व्यक्तीला सभापती केले. त्याऐवजी आमदार बागडे यांनी स्वच्छ प्रतिमेच्या संचालकाला सभापती केले असते तर बागडे यांची प्रतिमा उंचावली असती, चांगली संदेश जनमानसात गेला असता. ही निवडणूक जिंकल्यानंतरही भाजपचे संचालक आनंदी नव्हते, हे प्रकर्षाने जाणवले.
-जगन्नाथ काळे, संचालक, बाजार समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.