दोन महिन्यापूर्वी आंब्या बहाराच्या फळास २५ ते ३० हजाराचा, तर मृग बहारास ३० ते ३५ हजार रुपये प्रति टनाला भाव मिळाला.
पाचोड : परदेशात गरुडझेप घेणाऱ्या मोसंबीला (Mosambi Fruit) प्रथमच यंदाच्या दुष्काळी हंगामात स्थानिक बाजारपेठेत तीस हजार रुपये प्रति टनाचा भाव मिळून मोसंबीची गोडी वाढली असली, तरी उत्पादनाअभावी पाचोड (ता. पैठण) येथील मोसंबीच्या बाजारपेठेत शुकशुकाट पाहवयास मिळत आहे. दररोज तीनशे टनाची होणारी आवक कमालीची घटून दोन-पाच टनावर आल्याचे चित्र पाहवयास मिळते.
गत दहा वर्षांपूर्वी पाचोड (Pachod) येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Krushi Utpanna Bazar Samiti) माध्यमातून मोसंबी उत्पादकांना हक्काची स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात आली. शेतकरी (Farmer) उत्पादित मोसंबी विक्रीसाठी थेट येथील बाजारात आणत असल्याने हमाल-मापाडी, आडतदार व पोट व्यापारी उदयाला येऊन शेकडो जणांना रोजगार उपलब्ध झाला. पाचोडसह पैठण तालुक्यात घराला घरपण व चार चौघात मोठेपण मिळवून देणारे पीक म्हणून मोसंबीकडे पाहिले जाते.
मोसंबीच्या बाजारपेठेअभावी उत्पादक पूर्णतः कोमेजला गेला होता. त्यातच पाच - सहा वर्षापासून मोसंबीचे भाव कमालीचे घसरून मोसंबी उत्पादक नागवला गेला. उत्पादकासाठी मोसंबी आंबट तर ग्राहकांसाठी गोड झाली होती. मोसंबी उत्पादकांवर रस्त्या-रस्त्यावर स्टॉल लावून ज्यूस व फळे विकण्याचा दुर्दैवीप्रसंग ओढवला गेला होता. त्यामुळे परराज्यासह परदेशात पसंती मिळविणारी मोसंबी कोमेजली गेली. गत दहा वर्षांपूर्वी धुळे-सोलापूर महामार्गावर बाजार समितीच्या रिकाम्या जागेतील उपबाजारपेठेत मोसंबीचा बाजार सुरु करण्यात आला. त्या बाजारपेठेमुळे मोसंबी उत्पादकाला दिलासा मिळून त्यांची फरफट थांबली. लहान-मोठे बागायतदार त्याच्याकडील आंब्या, मृग व हस्त बहाराची फळे विक्रीसाठी येथे आणत असल्याने मोसंबीची आवक दिवसाकाठी २५० ते ३०० टनावर गेली होती.
दोन महिन्यापूर्वी आंब्या बहाराच्या फळास २५ ते ३० हजाराचा, तर मृग बहारास ३० ते ३५ हजार रुपये प्रति टनाला भाव मिळाला. गत चार वर्षांपूर्वीचा एक अपवाद वगळल्यास पंचवीस - तीस वर्षानंतर यंदा सरल्या हंगामात हस्त बहराला प्रथमच 'अच्छे दिन' येऊन चांगला भाव मिळत असल्याने मोसंबी गोड झाल्याची अनुभूती पाहवयास मिळत आहे. मात्र, पाणी टंचाईमुळे अर्धेनिम्मे मोसंबीचे झाडे चुलीचे सरपण होऊन मोसंबीची आवक कमालीची घटली. अन् मृग बहारासह आंबा बहाराची आवकही तुर्तास बंद आहे. या बाजार मैदानात पन्नास वर नोंदणीकृत अडत्याचे दुकाने असून दररोज सकाळी दहा ते बारा वाजेच्या दरम्यान शेतकऱ्यांनी आणलेल्या मोसंबीची बोली (बीट) होऊन त्याची खरेदी केली जाते. मात्र, दुष्काळा पाठोपाठ हंगाम संपल्याने आंब्या व मृग बहाराचे फळे आटोपली असून क्वचित अपवादात्मक शेतकऱ्याकडे "हस्त" बहाराचे फळे आहेत.
यास तीस ते पस्तीस रुपये टनाचा भाव मिळत असून बाजारात मोसंबीच मिळेनाशी झाली असून बहुतांश व्यापारी हिरवीगार कच्ची फळे तोडून ते कृत्रिमरित्या पिकवून परराज्यात पाठवत आहे. प्रथमतःच मृग व आंबा बहाराचे उत्पादनच नसल्याने व्यापाऱ्यांना मोसंबीची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय उरला नाही. येथील बाजारपेठेत दिवसाकाठी दोन-पाच टन सुध्दा मोसंबी येत नसल्याने सर्वत्र शुकशुकाट जाणवत आहे. दुष्काळातून तग धरलेल्या बागास यंदाचा 'हस्त' बहार पर्वणी काळ असला तरी उत्पादन मात्र नगण्य आहे.
यासंबंधी शिवाजी भालसिंगे (व्यापारी) म्हणाले, "तुर्तास मोसंबी उत्पादकाकडे मृग व आंबा बहराचे उत्पादन नसल्याने बाजारपेठ बंद पडली. दोन - तीन महिन्याने आंब्या व मृग बहराची थोडीफार आवक सुरू होऊन बाजारपेठेतला हरवलेला गोडवा परत येईल. तुर्तास 'हस्त ' बहारास तीस - पस्तीस हजाराचा दर मिळत असला तरी आवक मात्र नगण्य आहे". ताहेरखॉ पठाण (मोसंबी उत्पादक) म्हणाले, 'जेव्हा मोसंबीची आवक असते तेव्हा व्यापारीवर्ग संगनमत करून दिल्ली येथील सुरु असलेल्या भावापेक्षा अर्ध्या भावात बागा खरेदी करतात. अन् जेव्हा माल (फळं) संपतात तेव्हा भाववाढ होते. आता भाव दुप्पट असले तरी बोटावर मोजण्याइतक्याच लोकांकडे हस्त'बहाराची फळे आहेत.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.