Mount Everest : ट्राय अगेन ट्राय अगेन बी सक्सेस! खडतर परिस्थितीत मनीषा वाघमारेंनी सर केला एव्हरेस्ट

एव्हरेस्ट. माणसाला पिढ्यानपिढ्या भुरळ घालत आलेला विशाल हिमपर्वत. एव्हरेस्ट सर करणे सोपे नाही.
mount everest climbed by manisha waghmare chhatrapati sambhaji nagar marathi news
mount everest climbed by manisha waghmare chhatrapati sambhaji nagar marathi newsSakal
Updated on

- पृथा वीर

छत्रपती संभाजीनगर : एव्हरेस्ट. माणसाला पिढ्यानपिढ्या भुरळ घालत आलेला विशाल हिमपर्वत. एव्हरेस्ट सर करणे सोपे नाही. त्यामुळेच की काय कुठल्याही अवघड यशाला एव्हरेस्टची उपमा दिली जाते. प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते की आयुष्यात एकदा तरी एव्हरेस्ट सर करावा.

पण, कठोर मेहनत घेऊनही सर्वांचीच ही मनीषा पूर्ण होते असे नाही. कुणाला एव्हरेस्ट टोकाजवळ जाऊन परतावे लागते. कुणी कुणी तर परतच नाही. एवढी ही चढाई खडतर आहे. पण, एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न शहरातील मनीषा वाघमारे यांनी बघितले. सुरुवातीला त्यात त्यांना अपयश आले. पण, ‘ट्राय अगेन ट्राय अगेन बी सक्सेस’ म्हणत त्यांनी एव्हरेस्ट सर करून आपली ‘मनीषा’ पूर्ण केलीच.

गिर्यारोहक मनीषा वाघमारे यांनी २०१८ मध्ये एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केले. या पर्वतावर पाऊल ठेवणाऱ्या मनीषा या मराठवाड्यातील पहिल्याच महिला गिर्यारोहक ठरल्या. २०१७ मध्ये मनीषा यांना खराब हवामानामुळे अवघ्या १७० मीटर अंतरावरून माघारी परतावे लागले होते. मात्र, त्यांनी हार मानली नाही.

दुसऱ्याच वर्षी एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्या मूळच्या परभणी येथील रहिवासी. शहरातील इंदिराबाई पाठक महिला महाविद्यालयात क्रीडा विभाग प्रमुख म्हणून सध्या कार्यरत आहेत. क्रीडा विभाग प्रमुख असताना एव्हरेस्ट शिखर मोहीम फत्ते करणाऱ्या भारतातील पहिल्याच क्रीडा विभाग प्रमुख आहेत.

खेळ मुलगा-मुलगी असा भेद करत नाही. पण, खेळ पाहणारे व निर्णय प्रक्रियेतली माणसे भेद करतात. गिर्यारोहणातली मजा काही औरच. त्या उंच शिखरावर तुम्ही पोचता तेव्हा निसर्गाला हरवून शिखर गाठले असते.

पायातल्या मोजांसोबत नखेही तुटून पडतात. पण, शिखरावर देशाचा झेंडा रोवताना तुमची वाट अडवणाऱ्या प्रत्येकाला ओरडून सांगावे वाटते, हे पाहा मी जिंकले. याच जिद्दीवर मनीषा यांनी ऑस्ट्रेलियातील ऑसी टेन या १० पर्वतरांगा दोन दिवसांत सर केल्या होत्या.

मनीषा यांनी पुण्याच्या बालेवाडीतल्या स्पोटर्स अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतले. बारावीपर्यंतचे शिक्षणही तिथेच घेतले. बीपीएड, एमपीएडसह सेट व नेट दोन्ही परीक्षाही त्या उत्तीर्ण झाल्या. व्हॉलीबॉलमध्ये मनीषा यांनी सात वेळा राष्ट्रीय स्तरावर मजल मारली.

याच दरम्यान इंडियन कॅडेड फोर्सतर्फे (आयसीएफ) आयोजित एक गिर्यारोहण मोहीम त्यांनी पूर्ण केली. गोगाबाबा, दौलताबाद ही २४ किमी मोहीम पूर्ण केल्यानंतर लगेचच त्यांच्या चमूला आयसीएफतर्फेच गढवाल हिमालयातील २२ हजार २५० फूट उंच केदार डोमचा कँपला जाण्याची संधी मिळाली.

गिर्यारोहणाचे शास्‍त्रशुद्ध ज्ञान नसूनही फिटनेसच्या जोरावर मनीषा यांनी ही मोहीम यशस्वी केली. बारा जणांच्या या मोहिमेत केवळ दोन मुली होत्या. तीस दिवसांच्या या मोहिमेत उत्तर काशी-गंगोत्री-तपोवन-खडा पत्‍थर असे करत शेवटचे केदार डोमचे शिखर होते.

शून्याहून कमी तापमानात गिर्यारोहकाला २० ते ४५ किलोमीटरपर्यंत १७ तास चालावे लागते. प्रत्येक गिर्यारोहकाच्या पाठीवर किमान २३ किलोचे ओझे, पायातला वजनदार शूज घेऊन रोज किमान ४० किलोमीटरची चढाई कोणत्याही मुलीसाठी एक आव्हानच असते. विशिष्ट तापमानात एक महिना काढायचा म्हणजे नुसते शरीरच नव्हे तर मनही पक्‍के असावे लागते.

या खडतर आव्हानांचा सामना करत मनीषा यांनी २००८ इंडियन माउटेअरिंग फाउंडेशनच्या वेस्टर्न हिमालया माउंटेअरिंग संस्थेत प्रवेश घेत गिर्यारोहणाचे सर्व तांत्रिक ज्ञान घेतले. इथेही मनीषा यांना ए ग्रेड मिळाला. तिथून परतल्यावर मनीषा यांनी लहान मुलांसाठी अॅडव्हेंचर कँप घेतले. २००९ मध्ये अॅडव्हान्स कँपही पूर्ण केला.

२०१७ मध्ये तयारीनिशी एव्हरेस्ट मोहीम सुरू केली. त्यावेळी माउंट एव्हरेस्ट अवघ्या १७० मीटरवर राहिले. शिखराचा माथा मला सारखा खुणावत होता. पण, निसर्गाची साथ नव्हती. नाइलाजाने मी परत आले.

मात्र, पुढचे ३६५ दिवसातल्या प्रत्येक रात्री मला ते १७० मीटर दिसायचे. अखेर वर्षभराने मी ते शिखर गाठले आणि जगातले सर्वांत उंच शिखर सर केले असे मनीषा सांगतात. गिर्यारोहणाच्या या कामगिरीची दखल घेत राज्य शासनाने मनीषा यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन गौरवले आहे.

गिर्यारोहणातील सातत्य

ऑस्ट्रेलियातील सर्वोच्‍च ७००० फूट उंचावरचा पर्वत कोजेएस्‍को व त्याला जोडून असलेल्या दहा पर्वत रांगांना ‘ऑसीटेन’ संबोधले जाते. संपूर्ण पर्वतरांग ग्लेशियरने जोडली आहेत. प्रत्येक पर्वत चढायचा, उतरायचा व एका दिवशी पाच पर्वत सर करायचे होते. ही शिखरे केवळ दोन दिवसांत सर करून मनीषा यांनी जागतिक विक्रम केला.

याशिवाय त्यांनी स्कुबा डाय‌व्हिंग, पॅरासीलिंग, पॅराग्लाईडिंगचे प्रशिक्षण घेतले. जगातील सात खंडातील सर्वोच्च शिखरांपैकी पाच शिखरांवर त्यांनी चढाई केली आहे. जगातील तांत्रिकदृष्ट्या अवघड असणारे एव्हरेस्टरिजनमधील सात हजार मीटर उंचीचे ‘अमादबलम’ शिखर हिवाळ्यात सर करून दुसरी भारतीय होण्याचा मान त्यांना मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.