महामार्गाची दिशा दाखवणारा वाळूज ते जिकठाण फाटादरम्यानचा औरंगाबाद- नगर महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनू पाहत आहे
वाळूज (औरंगाबाद): औद्योगिक वसाहतीत प्रवेश करणारा, महामार्गाची दिशा दाखवणारा वाळूज ते जिकठाण फाटादरम्यानचा औरंगाबाद- नगर महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनू पाहत आहे. या सात किलोमीटरच्या मार्गावर दोन्ही बाजुने जड वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. तर इतर वाहनांच्या चालकांना कसरत करीत वाहने पुढे न्यावी लागत आहेत. या नेहमी होणाऱ्या त्रासाला वाहनचालक कंटाळले आहेत. अशा परिस्थितीत मोठ्या अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वाळूज औद्योगिक वसाहतीमुळे लिंबेजळगाव, जिकठाण व वाळूज परिसराला मोठे वैभव प्राप्त झाले आहे. परिसरातून विविध मोठ्या शहरात जाण्यासाठी नगर रोडच्या याच मार्गाचा वापर केला जातो. मात्र, वाळूज ते दहेगाव बंगला (ता.गंगापूर) या १० किलोमीटरवर विविध ठिकाणी हॉटेलवर चहा, जेवण, नाष्टा व इतर साहित्यांची दुकाने आहेत. अशा दुकानांवर ग्राहक आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करतात. त्यातून पाठीमागून येणाऱ्या वाहनधारकांची मोठी दिशाभूल होऊन अपघाताच्या किरकोळ घटना दररोज घडतात. त्याचबरोबर आपले साहित्य वेळेत पोचावे, यासाठी खेड्यापाड्यातून आलेली वाहने महामार्गाने वेगात औद्योगिक वसाहतीकडे निघण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्यांची महामार्गावरील उभ्या अस्ताव्यस्त वाहनांमुळे गैरसोय होते. त्यातून ही वाहने पादचाऱ्यांवर धडकण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे, असे प्रकार टाळण्यासाठी महामार्गावर अनधिकृतपणे उभ्या असणाऱ्या वाहनांवर कारवाईची मागणी केली जात आहे.
बससाठी करावी लागते धावपळ-
गेल्या काही महिन्यात पोलिसांच्या वाढत्या आदेशवजा नोटीसांचा वाहनचालकांनी धसका घेतला होता. त्यामुळे, महामार्गावर वाहने उभी करण्याचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, त्यानंतरचा काही काळ गेल्यानंतर आता पुन्हा वाहने उभी करण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. महामार्गाच्या कडेला रस्त्याला अडथळा करीत उभ्या असलेल्या या वाहनांमुळे रहदारीची वारंवार कोंडी होत आहे. वाहनाच्या भाऊगर्दीत प्रत्येक ठिकाणचा बसथांबाही दिसेनासा झाला आहे. त्यामुळे, महामंडळाच्या बसेस मागेपुढे कुठेही थांबत आहेत. तर बस पकडण्यासाठी प्रवाशांना मोठी धावपळ करावी लागत आहे.
सूचना फलकांची गरज-
या मार्गावरील अवैध थांबे बंद करण्यासाठी ठिकठिकाणी नो पार्किंग झोनचे सूचना फलक लावण्याची गरज आहे. प्रामुख्याने हे फलक शिवराई फाटा, लिंबेजळगाव, जिकठाण फाटा, दहेगाव बंगला, ईसारवाडी या ठिकाणी लावण्याची आवश्यकता आहे. कारण या भागात ढाबे व हॉटेलची रेलचेल असल्याने अशा ठिकाणी वाहने मोठ्या प्रमाणावर उभी असतात. त्यातून रहदारीमुळे वाहने मध्येच उभी राहात असल्याने महामार्ग पार करण्यासाठी पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.