७१ वर्षीय आजीने ५१ दिवस कोरोनाशी दिली झुंज

corona photo.jpg
corona photo.jpg
Updated on

औरंगाबाद : कोरोना झाला म्हटले की, अनेकांच्या जीवाचा थरकाप होतो. अनेकांचा बळी घेण्यास कोरोना कारणीभूत ठरला. त्य़ात वयस्कर व्यक्तीला कोरोना झाला तर काहीच खरं नाही. मात्र, घाटी रुग्णालयात दाखल झालेल्या ७१ वर्षीय आजीने तब्बल ५१ दिवस झुंज देत विजयादशमीच्या दिवशी कोरोनावर विजय मिळविला. जणू दुसऱ्या जन्माचे सीमोल्लंघनच त्यांनी केले. सर्वच कुटुंबियांचे आजीवर प्रेम असल्याने ती कोरोनातून बरी होताच दसऱ्याच्या एक दिवस आधी तिला घाटीतून घरी आणत कुटुंबाने आनंदोत्सव साजरा केला. रांगोळी काढून, फुलांची आरास करून औक्षण करून आजीचा गृहप्रवेश झाला.

कोरोनामुक्त झालेल्या या आजी पिसादेवी रोडवरील सनी सेंटर परिसरात कुटुंबासह राहतात. त्यांच्याबद्दल माहिती देताना नातवाने सांगितले की, शहरात कोरोनाने धडक दिल्यापासून मी व माझे कुटुंबीय प्रचंड काळजी घेत होतो. मात्र, आमच्या आजीला सुरवातीला सर्दी झाली. डॉक्टरांकडे गेल्यानंतर बरे वाटले आणि अचानक तिसऱ्या रात्रीपासून तिला खोकला यायला लागला आणि सकाळी दम लागायचा. शंका बळावल्याने आधी तिचा एक्स-रे केला. नंतर छातीचा सिटीस्कॅन केल्यानंतर तीन सप्टेंबर रोजी ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आम्ही सर्वच काळजीत पडलो. कारण त्यावेळी शहरात कुठेही आयसीयू बेड उपलब्ध नव्हता. आम्ही कुटुंबियांनी लगेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थातच घाटीचा मार्ग निवडला. दरम्यान, आजीची ऑक्सिजनची गरज वाढत होती. तिला घाटीत नेल्यानंतर वॉर्डमध्ये शिफ्ट करणे मोठे जोखमीचे काम होते. अपघात विभागापासून तिथपर्यंत जायला अॅम्ब्युलन्सने जावे लागणार होते. ती त्यात कधीच बसलेली नव्हती. तिने धीर सोडू नये म्हणून मी स्वत: तिच्यासोबत बसून, तिला वॉर्डापर्यंत सोडून आलो. आजीच्या या कोरोना लढ्याबाबत आणि घरी केलेल्या स्वागतोत्सवाची माहिती देणारा एक व्हिडिओ नातवाने सोशल मिडीयावर देखील टाकला आहे.

तीस दिवस आयसीयू बेडवर
घाटीत दाखल केल्यानंतर आजीजवळ आतमध्ये घरचे कुणीच नव्हते. दुसऱ्या दिवशी तिला आयसीयूमध्ये शिफ्ट करावे लागले. ४-५ दिवस चांगले गेले. दुसऱ्या आठवड्यात मात्र आजीची प्रकृती खालावली. तब्बल पंचवीस दिवस व्हेन्टिलेटरवर काढले. २७ सप्टेंबरला व्हेंटिलेटर काढले. नंतर कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. मात्र त्यानंतरही तिला तब्बल २५ दिवस पूर्णपणे बरे होण्यास लागले. दसऱ्याच्या एक दिवस आधी तिने तब्बल ५१ दिवस कोरोनाशी लढा देत तिने दुसर्या जन्मात सीमोल्लंघन केले. तेव्हा तिचा स्वागतोत्सव करताना सर्वांचेच डोळे पाणावले. 

मनोधैर्य, इच्छाशक्तीच्या जोेरावर जिंकली
आजीचा नातू अक्षय पवार सातत्याने डॉक्टरांच्या संपर्कात होता. ट्रिटमेंटबाबत तो डॉक्टरांशी नियमित संवाद साधत होता. त्याला पीपीई कीट घालून दररोज आजीला भेटून संवाद साधण्याची परवानगी आम्ही दिली होती. त्यामुळे आजीचे मनोधैर्य वाढले. डॉक्टरांचे परिश्रम आणि इच्छाशक्ती दांडगी असल्याचा सकारात्मक परिणामामुळे वयोवृद्ध आजीबाईंनी कोरोनावर लीलया मात करू शकल्या. 
डॉ. सुधीर चौधरी, उपाधिष्ठाता, घाटी रुग्णालय. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.