पैठण : राज्य शासनाकडून प्रामाणिक कर्ज फेड केलेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले पीक कर्जमाफी योजनेंतर्गत पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांना आठ कोटींहून अधिक अनुदानाचा लाभ होणार आहे. तालुक्यातील तीन हजार ४६८ शेतकरी या योजनेचे लाभार्थी ठरणार आहेत.
सेवा संस्थेकडून आलेल्या यादींची छाननी होऊन नावे निश्चित होणार आहेत. गेली सहा महिने लटकलेल्या शासनाच्या या योजनेला आता गती आली आहे. शासकीय पातळीवर कागदपत्रांची पूर्तता करून घेण्याची कामे सुरू असून, लवकरच ५० हजार रुपयांप्रमाणे प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे. योजनेंतर्गत शासनाने घालून दिलेल्या आर्थिक वर्षात नियमित पीक कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.
तालुक्यातील अनेक सेवा संस्था व राष्ट्रीयीकृत बँका, वित्तीय संस्था यांच्यामार्फत वाटप केलेल्या शेतकऱ्यांना हे आठ कोटींचे अनुदान प्राप्त होणार आहे. पण, शासन निर्णयानुसार शासकीय, निमशासकीय, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, निवृत्ती पेन्शनधारक यांना वगळण्यात आले आहे.
महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. यासाठी अजून शेतकरी संख्या अंतिम झाली नाही. याद्या तयार करण्याचे काम बँकांकडून सुरू आहे. मात्र, या योजनेत पात्र असणाऱ्यांनी आधार लिंकिंग करून घेणे गरजेचे आहे. विशिष्ट क्रमांक आल्यावर लगेच खात्यात रक्कम जमा होण्यास मदत होईल.
- अनिल पुरी, सहायक निबंधक, सहकारी संस्था, पैठण
अपूर्ण कागदपत्रांची शेतकऱ्यांनी पूर्तता करून दिल्यानंतर विकास सेवा संस्थांनी तयार केलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत. शासनाच्या नियमाप्रमाणे अपात्र लाभार्थी वगळून पात्र शेतकऱ्यांच्या याद्या सेवा संस्थेकडे देण्यात येणार आहेत. गावातील प्रमुख कार्यालयांच्या ठिकाणी या याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. आठ कोटींचे अनुदान मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.