मुग, सोयाबीन, उडीद यासह पिके जोमात असताना पावसाने खंड दिला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता
औरंगाबाद: Aurangabad Rain Update: पुनरागमनानंतर पावसाचा जोर चांगलाच वाढला असून, बुधवारी (ता. १८) रात्री सुरू झालेली रिपरिप गुरुवारी (ता. १९) दिवसभर कायम होती. कधी हलका तर कधी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने अनेक सखल भागात रस्त्यावर पावसाचे पाणी साचले होते. गेल्या तीन दिवसांपासून शहरात सूर्यदर्शन नसल्याने वातावरणातील गारठा वाढला आहे. दिवसभराच्या पावसाची चिकलठाणा वेधशाळेत १४.६ मिलिमिटर एवढी नोंद झाली आहे. जून, जुलैच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाला असला तरी ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली होती.
मुग, सोयाबीन, उडीद यासह पिके जोमात असताना पावसाने खंड दिला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. हवामान विभागाने १६ ऑगस्टपासून पाऊस परतेल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार पावसाला सुरवात झाली. बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते पण पावसाने उघाड दिली होती. मात्र रात्री रिमझिम पावसाला सुरुवात झाली. रात्रभर व गुरुवारी दिवसभर भीज पाऊस होता. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. अनेक नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळले. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट होता. वातावरणातील गारठा वाढल्याने वृद्ध, लहान मुलांचा त्रास वाढला आहे. पावसामुळे लेबर कॉलनी येथे झाड कोसळले तर महापालिका मुख्यालयासमोर झाडाची फांदी कोसळण्याची घटना घडली.
रस्त्यावरील खड्डे पडले उघडे
महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून शहरातील रस्त्यांची कामे केली असली तरी अद्याप काही रस्ते खराबच आहेत. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या रस्त्यावरील खड्डे उघडे पडले असून, या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी दुचाकीस्वार घसरून पडण्याचे प्रकार घडत आहेत.
बीड बायपासवर हाल
बीड बायपास रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. उड्डाणपुलांसाठी खोदकाम करण्यात आले आहे, अशा ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक वळविण्यात आली आहे. अशा ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, त्यातून मार्ग काढताना वाहनचालकांच्या नाकीनऊ येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.