छत्रपती संभाजीनगर : गॅस गळतीच्या घटनेनंतर शहरातील सर्वच प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्या असून, शहर सुरक्षेच्या अनुषंगाने नियमावली तयार करण्याचा निर्णय मंगळवारी (ता. सहा) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. शहराच्या कोणत्याही भागात रस्त्यावर कामे करताना महापालिकेला कळविणे बंधनकारक असल्याची सूचना यावेळी प्रशासक जी. श्रीकांत यांनी केली.
सिडको उड्डाणपुलाजवळ गेल्या आठवड्यात एचपी कंपनीचा गॅस टॅंकर धडकला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणात गॅस गळती होत असल्याने संपूर्ण एन-३ परिसराला धोका निर्माण झाला होता. महापालिका, पोलिस, आपत्ती व्यवस्थापन विभागासह इतर यंत्रणांनी १२ ते १३ तास अथक परिश्रम करून नागरिकांच्या जिवाचा धोका टाळला.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून मंगळवारी स्मार्ट सिटी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी प्रशासक जी. श्रीकांत, अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, शहर अभियंता ए.बी. देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, महापालिकेचे कार्यकारी अभियंता बी.डी. फड, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक थोरात, आपत्ती व्यवस्थापनप्रमुख स्वप्नील सरदार यांच्यासह एचपी कंपनी, शहरात गॅस पाइपलाइन टाकणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.
शहरात असा अनुचित प्रकार भविष्यात घडू नये, यासाठी सर्वसमावेशक नियमावली तयार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. ही नियमावली तयार झाल्यानंतर सर्व विभागांना पाठविली जाणार आहे.
एचपी कंपनीकडून वसूल करणार नुकसानभरपाई
महापालिकेने एचपी कंपनीकडून नुकसानभरपाई वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने सुमारे पाच लाख लिटर पाण्याचा मारा टॅंकरवर केला होता. त्यासोबत अग्निशमन विभागासह इतर यंत्रणा दिवसभर रस्त्यावर उभी होती. जालना रोडची वाहतूक बंद करण्यात आल्याने व परिसरातील दुकाने बंद करण्यात आल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. नुकसानभरपाईच्या रकमेतून अग्निशमन विभाग व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सक्षमीकरण केले जाईल, असे जी. श्रीकांत यांनी नमूद केले.
एचपी कंपनीकडून
सर्व रस्त्यांवर रिफ्लेक्टर, सूचनाफलक लावण्यात यावेत.
रस्त्यावर काम करताना बांधकामाचे साहित्य तातडीने उचलण्यात यावे.
खड्डे तत्कळ बुजविण्यात यावेत. काम करण्यापूर्वी महापालिकेची परवानगी घेणे बंधनकारक असेल.
काम करताना त्याठिकाणी रिफ्लेक्टर असलेले बोलार्ड, बॅरिकेडस् लावण्यात यावेत.
गॅससह धोकादायक केमिकल व इतर पदार्थांची वाहतूक करणारी वाहने शहराबाहेरून पाठविण्यात यावीत.
वाहनाच्या केबिनमधील सीसीटीव्ही सुरू असणे गरजेचे आहे. वाहनासोबत क्लीनर असणे गरजेचे आहे.
संबंधित संस्थेने वाहनचालकाची झोप झाली आहे का? तो प्रशिक्षित आहे का? व्हीटीएस यंत्रणा सुरू आहे का? याची तपासणी करावी.
वाहतुकीला अडथळा ठरतील असे होर्डिंग्ज काढण्यात यावेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.