औरंगाबाद : साहित्य महामंडळच ‘बॅकफूट’वर!

संमेलनात राजकीय व्यक्तींना ‘विशेष स्थान’ : साहित्य महामंडळाचा नाराजीचा सूर
औरंगाबाद : साहित्य महामंडळच ‘बॅकफूट’वर!
औरंगाबाद : साहित्य महामंडळच ‘बॅकफूट’वर! sakal
Updated on

औरंगाबाद : अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिकला होत आहे; पण या संमेलनात राजकीय व्यक्तींना देण्यात येणाऱ्या स्थानावरून वादाला तोंड फुटत आहे. संमेलनात राजकीय व्यक्ती नकोच, अशी आग्रही भूमिका साहित्य महामंडळ व अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी वारंवार घेतली; पण आता याच संमेलनात राजकीय व्यक्ती विशेष भूमिकेत येत आहेत. त्यामुळे महामंडळालाही ‘अडचण’ होत असून आयोजकांच्या याच निर्णयावरून महामंडळाची भूमिका बॅकफूटवर गेली आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संमेलन साधे घ्यावे, अशी अखिल भारतीय साहित्य महामंडळाची भूमिका होती. तेव्हाची स्थिती वेगळी होती आता स्थिती सुधारत असल्याने लोकहितवादी मंडळाकडून जोर लावला जात असून संमेलन भव्य असेल असे दिसते. त्यातही राजकीय व्यक्तींना उद्‍घाटन व समारोप कार्यक्रमांना स्थान दिले जात असून अनेक राजकीय मंडळींचीही संमेलनात या-ना त्या कारणांनी रेलचेल राहणारच आहे. त्यामुळे साहित्य महामंडळाच्या भूमिकेला फारसे महत्त्व दिले गेले नाही. त्यामुळे साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त होत आहे. राजकीय व्यक्तींना व्यासपीठावर बसविण्यावरून आता आयोजक व साहित्य महामंडळ यांच्यात दरी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. ‘बोलायचे एक व करायचे एक’ असाच सूर साहित्य महामंडळाचा आयोजकाबद्दल असून आयोजक डोईजड झाल्याची बाबच दिसून येत आहे. अर्थातच आयोजकांच्या अशा भूमिकेमुळे महामंडळाच्या भूमिकेला महत्त्व राहिले नसून ते बॅकफूटवर गेले आहेत. आयोजकांबद्दल कौतिकराव ठाले पाटील यांनी तूर्तास काहीही बोलण्यास नकार दिला.

याबाबत लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी स्पष्ट केले, की सुभाष देसाई यांच्या मराठी विभागाचे स्टॉल संमेलनात आहेत. त्यामुळे त्यांचा सहभाग संमेलनात आहे. व्यासपीठावर नाही. परिसंवादात खासदार डॉ. अमोल कोल्हे येत आहेत. परिसंवादात ते नाटकाविषयी भाष्य करतील. नीलम गोऱ्हे या साहित्यिकही आहेत. कोरोनानंतरचे आर्थिक राजकारण या विषयाच्या परिसंवादात मत मांडायला येत आहेत. हेमंत टकले हे साहित्यिकही आहेत. ते राष्ट्रवादीत जाण्याआधीपासून लोकहितवादी मंडळाचे माजी अध्यक्ष होते. आता या संस्थेचे ते विश्‍वस्त आहेत. विश्‍वास ठाकूर हे पक्षाचे असले तरीही संमेलनाच्या चाळीस समित्यांचे मुख्य समन्वयक आहेत. रंजन ठाकरे हे मंडप समितीचे काम करीत आहेत. ही राजकीय मंडळी कुठेही उद्‍घाटन समारंभात नाही ना व्यासपीठावरही नाही. या सर्वांचा सयुक्तिक अर्थ काढला म्हणून गैरसमज झाला आहे.

उस्मानाबादला वेगळा, नाशिकला वेगळा न्याय!

उस्मानाबादेतील संमेलनाच्या स्थानिक आयोजकांना पूर्णपणे कौतिकराव ठाले पाटील व महामंडळाने अंकित ठेवले होते. नाशिकचे आयोजक मात्र त्यांच्या वरचढ निघाले आहेत. त्यांनी छगन भुजबळ यांना स्वागताध्यक्ष केले. उस्मानाबादसह त्याआधीच्या संमेलनांना वेगळा न्याय व नाशिकला वेगळा असे का? असा सवालही आता रसिकजनांतून साहित्य महामंडळाला विचारला जात आहे.

"मला फक्त संमेलन होण्यातच रस आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टींत काहीच रस नाही. सध्या संमेलन पार पाडणे महत्त्वाचे आहे. मी त्यांना संदेश दिला होता पण त्याबद्दल मी बोलल्यास तेही गोंधळतील व गांगरून जातील. संमेलन होईपर्यंत नाशिकचे संमेलन, निमंत्रण पत्रिका व आमच्यात आधी झालेल्या संवादाविषयी मला काहीही बोलायचे नाही."

-कौतिकराव ठाले पाटील, अध्यक्ष साहित्य महामंडळ.

"संमेलनात उद्‍घाटक व समारोपात साहित्यिकच हवेत, हे कौतिकराव ठाले पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले होते. त्यानुसार उद्‍घाटक म्हणून साहित्यिक विश्‍वास पाटील व समारोपाला माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर असतील, ही बाब आम्ही पाळली आहे."

-जयप्रकाश जातेगावकर, अध्यक्ष लोकहितवादी मंडळ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.