स्वातंत्र्यानंतर प्रगतीसोबतच वाढली विषमता

स्वातंत्र्याचा सूर्य अनेकांपर्यंत पोचलाच नाही : साहित्य संमेलनाच्या परिसंवादात सूर
Neelam Gorhe
Neelam Gorhesakal
Updated on

भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी (उदगीर) : स्वातंत्र्यानंतर देशाने शैक्षणिक, आरोग्य, औद्योगिक, विविध क्षेत्रात प्रगती साधली. ज्या देशात खायला अन्न नव्हते, त्या देशाने हरितक्रांती केली. मात्र, हे सर्व करीत असतानाच समाजात विषमताही वाढली, असा सूर उदगीर येथे आयोजित ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील पहिल्या दिवशीच्या परिसंवादात उमटला.

उद्‍घाटन सत्रानंतर ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव : काय कमावले, काय गमावले?’ यावर परिसंवाद झाला. ज्येष्ठ विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे अध्यक्षस्थानी होते. परिसंवादात विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, अजय कुलकर्णी, राजेश करपे सहभागी होते.

स्वातंत्र्यानंतर आपल्याला लोकशाही मिळाली. जगाला आदर्श ठरावी अशी राज्यघटना मिळाली. सर्व क्षेत्रात प्रगती साधली; पण समाजातील विषमता काही दूर होऊ शकली नाही. आजही महिलांबाबत दुजाभाव केला जातो. कुटुंबातसुद्धा लोकशाही राहिली नाही, असे परखड मत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. आजही समाजात आर्थिक, राजकीय, सामाजिक विषमता दिसते. स्वातंत्र्याचा सूर्य अनेकांपर्यंत पोचलाच नाही. आहे रे आणि नाही रे वर्ग निर्माण झाले आहेत. हीच परिस्थिती राहिली तर देशात यादवी माजेल, अशी भीती राजेश करपे यांनी व्यक्त केली.

तरुणांना काय अपेक्षित आहे त्या पद्धतीचे लेखन होण्याची गरज आहे. राष्ट्र बलशाली होण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे, असे मत अजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यानंतर अनेक संस्थाने भारतात विलीन झाली; पण आपण महात्मा गांधीजींना गमावून बसलो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना दिली. देशाने वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती साधली. लोकशाही वाढली, विकास झाला पण आजही लोकांच्या डोळ्यात अश्रू आहेत. समाजात विषमता वाढत आहे. धर्म, मंदिरांचा राजकारणासाठी वापर होत आहे. राज्यघटना धोक्यात आली आहे. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असे मत डॉ. जनार्दन वाघमारे यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.