Sambhaji Nagar : तब्बल १६७ आरक्षणे वगळली!;प्रारूप विकास आराखडा; शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांना तिलांजली

विकास आराखडा तयार करताना शहराच्या लोकसंख्येनुसार आरक्षणे टाकण्यासाठी शासनाने मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिली आहेत. असे असताना जुन्या व विस्तारित शहराच्या प्रारूप विकास आराखड्यात मार्गदर्शक तत्त्वांना तिलांजली देण्याचे काम शासन नियुक्त विशेष अधिकारी श्रीकांत देशमुख यांनी केले आहे.
Sambhaji Nagar
Sambhaji Nagarsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : विकास आराखडा तयार करताना शहराच्या लोकसंख्येनुसार आरक्षणे टाकण्यासाठी शासनाने मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिली आहेत. असे असताना जुन्या व विस्तारित शहराच्या प्रारूप विकास आराखड्यात मार्गदर्शक तत्त्वांना तिलांजली देण्याचे काम शासन नियुक्त विशेष अधिकारी श्रीकांत देशमुख यांनी केले आहे. जुन्या शहराच्या २००१-०२ चा व विस्तारित शहराच्या १९९१ च्या मंजूर विकास आराखड्यातील तब्बल १६७ आरक्षणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे आता विकास आराखड्यात ३९६ आरक्षणे शिल्लक राहिली आहेत. लोकसंख्येचा विचार करता ही आरक्षणे अत्यल्प असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जुन्या व विस्तारित शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावरील ८ हजार ६५० आक्षेपांपैकी ५ हजार ६१६ आक्षेपांवर सुनावणी घेण्यात आली आहे. तब्बल ३ हजार ३४ आक्षेपधारक विविध कारणांमुळे हजर राहिलेले नाहीत. तब्बल ३३ वर्षे शहराचा विकास आराखडा रखडला. त्यामुळे शहराला गुंठेवारीचा विळखा पडला, तर दुसरीकडे महापालिकेचे कोट्यवधींचे नुकसान झाले. त्यात विकास आराखड्याचे काम पूर्ण होत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात होते. पण, प्रारूप विकास आराखड्यात झालेल्या चुका पाहता, शहराचा विकास होणार कसा? असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे.

विकास आराखड्याचा गाभा असलेला पायाभूत नकाशाच चुकीचा असल्याचे समोर आले आहे. त्यात ७४ नाले गायब आहेत. आता प्रारूप विकास आराखड्यातून तब्बल १६७ आरक्षणे वगळण्यात आल्याचे समोर आले आहे. नव्याने आराखडा तयार करताना त्यात आरक्षण ठेवण्यासाठी शासनाने मार्गदर्शक तत्त्वे ठरविली आहेत. मात्र, प्रारूप आराखड्यात या निकषांना तिलांजली देण्यात आली आहे. जुन्या व विस्तारित शहराच्या यापूर्वी अंतिम झालेल्या आराखड्यामध्ये एकूण ५६३ आरक्षणे होती. नवा आराखडा तयार करताना यातील १६७ आरक्षणे रद्द करण्यात आली आहेत. ही आरक्षणे वगळताना ठोस कारणे देण्यात आलेली नाहीत. मोठ्या संख्येने आरक्षणे वगळण्यात आल्याने आता शहर परिसरात ३९६ आरक्षणे शिल्लक राहणार आहेत. शहराची २०४२ पर्यंत वाढीव लोकसंख्येचा विचार करता, ही आरक्षणे पुरेशी नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ड्राफ्टबुकमध्ये चुकीची माहिती

प्रारूप विकास आराखड्याच्या ड्राफबुकमध्ये आरक्षणासंदर्भात चुकीची व अपूर्ण माहिती देण्यात आली आहे. घाईगडबडीत स्थळपाहणी न करता प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आल्याने ड्राफबुकमध्येही प्रचंड चुका दिसून येत आहेत. जुनी आरक्षणे कायम ठेवताना अनेक ठिकाणी जागेचे क्षेत्रफळ, आरक्षणांचे क्रमांक देण्यात आलेले नाहीत.

अनेक आरक्षणांचा विसर

सध्या तयार केला जाणारा विकास आराखडा हा २०४२ पर्यंत शहराचा विकास गृहीत धरून केला जात आहे. पण शासन नियुक्त विशेष अधिकाऱ्याला अनेक आरक्षणांचा विसर पडला आहे. शहरात एकीकडे मेट्रो सुरू करण्याचे स्वप्न दाखविले जात आहे. पण, दुसरीकडे वाहतुकीचासुद्धा विचार करण्यात आलेला नाही.

उद्यान, पार्किंग, शॉपिंग कॉम्प्लेक्स-पार्किंग, रुग्णालय, जडवाहनांसाठी तळ, संशोधन केंद्र, मोठे हॉस्पिटल, नाट्यगृह, कलाभवन, महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रशिक्षण विद्यालय, आयटीआय, बसस्थानक, रेल्वेस्टेशन, महिला व पुरुष स्वच्छतागृहे, ग्रंथालय, पोलिस ठाणे, शाळा, मैदाने, अग्निशमन केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, मॅटर्निटी होम, सभागृह, करमणूक केंद्र, ग्रीन फॉरेस्ट, विद्युत केंद्र, भाजीमंडई, आठवडे बाजार यांसारखी अनेक आरक्षणे अपेक्षित आहेत. मात्र, शहर परिसरात नवे बसस्थानक, स्वच्छतागृह, अग्निशमन सेवा यासह अनेक आरक्षणांचा विचार करण्यात आलेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com