- सचिन पवार
छत्रपती संभाजीनगर : केंद्रात अर्थ राज्यमंत्री असताना डॉ. भागवत कराड यांनी शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसह इतर कामांच्या प्रत्येक महिन्याला बैठका घेतल्या. लोकसभा निवडणुकीपूर्वी पत्रकार परिषद घेऊन वेळोवेळी या कामाबद्दल माहितीही दिली. पण, निवडणुकीत डॉ. कराड यांना उमेदवारी मिळाली नाही.
त्यातच आता रविवारी (ता. २३) राज्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पैठणपर्यंत पाहणी केली. यात कराडांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. यामुळे भाजपमध्ये स्थानिक पातळीवर कराडानंतर सूत्रे सावेंच्या हाती जाणार का, अशी चर्चा आहे. राज्यसभा पाठोपाठ केंद्रीय राज्यमंत्रिपद मिळाल्याने स्थानिक भाजपमध्ये डॉ. कराड यांचे वजन वाढले होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा विविध कामांचा दर महिन्याला महापालिकेत किंवा स्मार्ट सिटीत बैठका घेऊन आढावा घेतला.
या बैठकीला मंत्री सावे यांचीदेखील उपस्थिती असायची. परंतु, लोकसभा निवडणुकीनंतर कराड यांचे मंत्रिपद गेले. त्यानंतर रस्त्याची राहिलेली कामे असो की नवीन पाणीपुरवठा योजना किंवा महावितरण संबंधित कामे या सर्व कामांच्या बैठकांवर सावे यांनी गेली काही दिवसांत जोर दिला. विशेष म्हणजे या बैठकांना भाजपचे इतर पदाधिकारीही उपस्थित असायचे.
रविवारी पैठण येथे झालेल्या पाणीपुरवठा संबंधी बैठकीला, पाहणीला भाजपच्या सरचिटणांसह माजी नगरसेवकसुद्धा उपस्थित होते. त्यामुळे कराड यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. हा सर्व घटनाक्रम पाहता स्थानिक भाजपची सूत्रे आता सावेंच्या हाती जाणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळाली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.