छत्रपती संभाजीनगर : टेलिग्रामवर आलेल्या पार्ट टाइम नोकरीच्या मेसेजला रिप्लाय करणे ट्रॅक्टर शोरूममालकास तब्बल ५४ लाखांत पडले. टेलिग्रामवर एका वेबसाइटवरून हॉटेलला रेटिंग करून आकर्षक कमिशनचे आमिष दाखविले गेले, त्यासाठी सुरवातीला कमिशनही दिले,
त्यानंतर विश्वास संपादन करत सहाजणांनी मिळून शोरूममालकाला वेळोवेळी ‘तुमची लेवल वाढली आहे, एकूण आठ लेव्हल झाल्या की एकदाच पैसे मिळतील’ असे सांगितले. त्यासाठी सहा लाख भरा’ अशी कारणे देत आरोपींनी एप्रिल ते २५ मेदरम्यान तब्बल ५४ लाख २२ हजार रुपये उकळले. मात्र फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच शोरूममालकाने छावणी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.
फिर्यादीनुसार, राजू रामराव मुत्तलवाड (४३, रा. प्लॉट क्र.८, नंदनवन कॉलनी) हे फिर्यादी आहेत. त्यांचे वाळूज येथे स्वतःचे ट्रॅक्टरचे शोरूम आहे. त्यांना एप्रिल २०२३ मध्ये टेलिग्रामवर पूजा गुप्ता नावाच्या महिलेने पार्टटाईम जॉबसंदर्भात संदेश पाठविला. त्यावरुन राजू यांनी महिलेस जॉबबाबत विचारले असता, तीने ट्रिप ॲडव्हायजर या वेबसाइटवरून हॉटेल रेटिंग करून कमिशन मिळते असे सांगितले. सुरुवातीला राजू यांना हॉटेल रेटिंग करणेसाठी काही पैसे भरण्यास सांगितले. आठ ते दहा दिवस कमिशनही दिले.
अशी केली फसवणूक
राजू यांना आकर्षक कमिशन देऊन विश्वास संपादन केल्यानंतर आरोपी पूजा हिने माझ्या वरिष्ठांची माहिती देते म्हणत आरोपी हिमांशू शर्मा, राहुल शर्मा, रितेश देशपांडे, सोनाली, दृष्टी टोपवाल यांची माहिती दिली. त्यानंतर वरील सर्व आरोपींनी राजू यांचा विश्वास संपादन केला. दरम्यान राजू यांना काही लेव्हल्स दाखविण्यात आल्या.
टेलिग्रामवर ‘ट्रॅव्हलर्स चॉईस ७६३’ नावाच्या ग्रुपमध्ये ॲड करून ग्रुपमधील विविध सदस्यांचे कमिशन फिर्यादीला दाखविले. त्यामुळे फिर्यादीचाही विश्वास बसला. एप्रिल २०२३ ते २५ मे २०२३ दरम्यान राजू यांच्याकडून आरोपींनी विविध बॅंक खात्यात एकूण ५४ लाख २२ हजार रुपये रेटिंगसाठी भरून घेतले. त्यानंतर मात्र आरोपींनी पैसे मिळताच कमिशन देणे बंद केले. त्यावर राजू यांनी विचारणा केली असता, त्यांना आरोपींनी ‘तुमची लेव्हल वाढली असून आठ लेव्हल्स झाल्या की एकदाच पैसे मिळतील असे सांगितले.
दरम्यान २५ मे रोजी पाच लाख रुपये भरावे लागतील असे सांगितल्यावरून राजू यांनी पाच लाख रुपये भरले, त्यानंतर सहा लाखांची मागणी करत तुमचे पैसे मिळतील, पण सध्या रिजेक्ट झाले असून तुम्हाला सहा लाख रुपये इन्शुरन्सपोटी भरावे लागतील, असे सांगण्यात आले. त्यावेळेस मात्र राजू यांना संशय आल्याने त्यांनी २९ मेरोजी पोलिस आयुक्त कार्यालयात लेखी तक्रार अर्ज दिला.
त्यानंतर १४ जून रोजी छावणी पोलिस ठाण्यात वरील सहा आरोपींविरोधात फसवणुकीसह गुन्हा दाखल झाला. तपास निरीक्षक कैलास देशमाने यांच्याकडे आला होता, दरम्यान हा गुन्हा आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याचे श्री. देशमाने यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.