छत्रपती संभाजीनगर : दक्षिण-मध्य रेल्वेकडून सातत्याने सापत्न वागणूक मिळूनही छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकाने २०२३-२४ या वर्षभरात तब्बल शंभर कोटींपेक्षा अधिक व्यवसाय केला आहे. रेल्वेस्थानकावरून दररोज साधारण १४ ते १५ हजार प्रवासी प्रवास करतात. यातून शंभर कोटींपेक्षा अधिक उत्पन्न वाढल्याने स्थानकाला रेल्वेचा एनएसजी-२ हा दर्जा प्राप्त झाला आहे. दर्जावाढ झाल्याने आता रेल्वेस्थानकावर अधिक सोयीसुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकात तिकीट खिडकीवर दररोज तिकीट घेऊन प्रवास करणारे साधारण १४ ते १५ हजारपेक्षा अधिक प्रवासी आहेत. शिवाय आरक्षण खिडकीवरून आसन आरक्षित करून प्रवास करणाऱ्यांची संख्या आणि पास काढून अपडाऊन करणाऱ्यांची संख्या वेगळी आहे. या रेल्वेस्थानकावरून रोज साधारण ६५ रेल्वेगाड्या ये-जा करत असतात. त्यात एक्स्प्रेस, सुपरफास्ट एक्स्प्रेस, साप्ताहिक एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्यांचा समावेश आहे.