छत्रपती संभाजीनगर - छत्रपती संभाजीनगर-पुणे हा प्रचंड वर्दळीचा महामार्ग झाला आहे. चारपदरी सुसज्ज मार्ग असला तरीही ठिकठिकाणी पावसामुळे खड्डे पडले आहेत. त्यातच सततच्या वाहतूक कोंडीने पाच तासांचा प्रवास सात ते आठ तासांवर गेला आहे.
पुणे तिथे काय उणे अशी म्हण आहे. म्हणूनच संपूर्ण मराठवाड्यातील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी आणि नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने पुणे येथे आहेत. या शिवाय मराठवाड्यातील आयटी क्षेत्रातील चार ते पाच हजार तरुण पुण्यात आहेत. शेकडो पर्यटकही दररोज हजेरी लावतात. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरातून जाणाऱ्या सर्व मार्गांत छत्रपती संभाजीनगर-पुणे हा महामार्ग सर्वाधिक व्यस्त झाला आहे. दररोज पन्नास हजारांपेक्षा अधिक वाहनांमधून जवळपास लाखभर प्रवासी प्रवास करत असतात.