Chhatrapati Sambhajinagar : एकट्या तरण्या पोरीला कुठं ठिवायचं? पुस्तकांच्या जागी ऊसतोडीचा कोयता!

‘सायेब! ही माझी पोरगी कल्याणी, यंदा दहावीला हाय. गुरुजी म्हणत्यात लै हुशार हाय! पोरगी नाव काढील तुमचं, तिला शाळेत पाठवा, पण एकट्या तरण्या पोरीला कुठं ठिवायचं?
Chhatrapati Sambhajinagar : एकट्या तरण्या पोरीला कुठं ठिवायचं? पुस्तकांच्या जागी ऊसतोडीचा कोयता!
Updated on

छत्रपती संभाजीनगर - ‘सायेब! ही माझी पोरगी कल्याणी, यंदा दहावीला हाय. गुरुजी म्हणत्यात लै हुशार हाय! पोरगी नाव काढील तुमचं, तिला शाळेत पाठवा, पण एकट्या तरण्या पोरीला कुठं ठिवायचं? गावात आमचं कोणीबी न्हाय म्हणून नाइलाजानं सोबत आणलं. तिचा बी आर्धा कोयता सुरू केल्याने उचल फेडायला मदत होतीया.

पण येक सांगू ‘कवळ्या पोरीला असं उन्हातान्हात हातात कोयता काम करताना पाहून जीव कासावीस होतूया’ असं म्हणत त्या माउलीने डोक्यावरच्या पदराने डोळे पुसत आपली कैफीयत मांडली.

पैठण तालुक्यातील जायकवाडी, विहामांडवा, डोणगाव परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. शनिवारी (ता.३०) या परिसरातून फेरफटका मारत असताना काही शाळकरी मुले ऊसतोड करताना; तर काही रस्त्याच्या कडेला वाढे विकताना दिसली. त्यावेळी सोबत असलेल्या पालकांना बोलते केले.

तेथे उभा असलेला जगन्नाथ यादव हा ऊसतोड कामगार म्हणाला, ‘आम्ही चाळीसगाववरून आलोय ऊस तोडायला. अवंदा पाऊस कमी पडल्याने शेतात काहीच पिकलं नाही. गावात प्यायच्या पाण्याची पंचाईत. गुरांना चारा न्हाय, म्हणून घेतली मुकादामाकडून उचल अन् आलो ऊस तोडायला. त्यात पोरांना कुठं ठेवायचं म्हणून आणलं सोबत.

तुमच्यासारख्यांकडे पाहिलं की वाटतं आमच्या मुलानंबी असंच शिकून मोठं व्हावं. पण काय करणार? आमच्या कोप्याच्या शेजारी मुलांच्या शाळेची सोय व्हायला पाहिजे, असं वाटतं. पण बोलणार कोणाला? तुमच्यासारख्या लोकांना सांगितलं तर कामावरून काढून टाकतील,’ असं म्हणत तो ऊस तोडायला निघून गेला.

साखरशाळा संकल्पना बंद

शासनाने २०१५ पासून साखरशाळा ही संकल्पना बंद केली आहे. त्यामुळे त्या ऊसतोडणी मजुरांच्या मुलांना ते ज्या परिसरात वास्तव्यास आहेत, त्या परिसरातील जिल्हा परिषद शाळांत शिक्षणासाठी घालावे, असे शिक्षण विभागाचे आदेश आहेत.

मात्र, गावकुसाला असणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या मुलांना दूरवरील शाळेत सोडण्याचा, आणण्याचा प्रश्‍न तसेच स्थानिक मुलांबरोबर मिसळण्याच्या अडचणी आदी कारणांमुळे ही मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. बहुतांश ठिकाणी मुक्काम एकीकडे आणि शाळा दुसरीकडे अशीच स्थिती आहे.

खंत मुलांची

रोशणी राठोड सांगत होती... ‘यावर्षी दहावीला होते. दिवाळीपर्यंत शाळेत गेले. त्यानंतर ऊसतोडीचा हंगाम सुरू झाला. त्यात घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे आईवडिलांनी ऊसतोडणीला जाण्याचा निर्णय घेतला. मला कुठे ठेवायचं, हा प्रश्न असल्याने घेऊन आले ऊस तोडायला.’

केवळ मुलगी म्हणून जन्माला आले म्हणून आणि घरच्या परिस्थितीमुळे शाळा सोडावी लागल्याचे तिच्या बालमनाला पटत नव्हतं. आम्ही शाळेत गेलो, की सगळी मुलं आमच्याकडे गणवेश, कपडे नसल्यामुळे बघून हसतात. आमच्या खोडी काढून चिडवतात. त्यामुळं शाळेत जावंसं वाटत नसल्याचे अमोल यादव या चिमुकल्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.