आयुष्यात वेगळं काहीतरी करायचं आहे, पण नेमकं काय आणि कसं, हा ध्यास घेतलेल्या रसिक प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं 'स्वयं टॉक्स'च्या कार्यक्रमात! 'सकाळ' माध्यम समूहाच्या साथीने केलेल्या या कार्यक्रमात सर्व वयोगटातल्या उद्यमशील, चोखंदळ व होतकरू रसिकांनी सहभाग घेतला.
शनिवार ३१ ऑगस्ट २०२४ रोजी या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विमाने, हेलिकॉप्टरचा व्यवसाय करणारे मराठमोळे व्यावसायिक मंदार भारदे, स्त्रिया तसेच मुलांच्या सायबर सेफ्टीसाठी लढा देणाऱ्या सोनाली पाटणकर, ६१ व्या वर्षी एव्हरेस्ट शिखर सर करणारे शरद कुलकर्णी आणि खेडेगावात 'बाप' नावाची आयटी कंपनी सुरु करून शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या देणारे रावसाहेब घुगे या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचे अनुभव रसिकांना जाणून घेता आले.
डॉ. उदय निरगुडकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. विषयांमधील वैविध्य पाहता महाविद्यालयातील विद्यार्थी आणि एकूणच उपस्थित तरुण प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा विशेष लाभ झाला अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटली.
विमानाचा व्यवसाय करणारे मंदार भारदे यांच्या बोलण्यातून मराठी माणूस उद्योग जगतात किती मोठी भरारी घेऊ शकतो याची प्रेक्षकांना कल्पना आली. तर सोनाली पाटणकर यांनी सद्यस्थितीत सर्व वयोगटातील लोकांना सायबर सेफ्टी कशी महत्त्वाची आहे हे सोदाहरण पटवून दिले. मनात आणले तर पूर्ण प्रयत्नानिशी कोणत्याही वयात एव्हरेस्टसुद्धा सर करता येतो हे शरद कुलकर्णी यांनी पटवून दिले आणि रावसाहेब घुगे यांनी खेडेगावातील तरुण देखील मोठी स्वप्ने कशी पाहू शकतो हे स्वतः च्या उदाहरणातून सिद्ध केले.
या सर्वांशी डॉ. उदय निरगुडकर यांनी साधलेला संवाद अतिशय माहितीपूर्ण आणि रंगतदार ठरला. श्रोते आणि वक्ते कार्यक्रमात पूर्णतः रंगून गेले होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व प्रायोजकांचा सन्मान करण्यात आला. पगारिया ऑटो हे या कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक, तर पोलाद हे या कार्यक्रमाचे सह प्रायोजक होते. स्मार्ट मनी सोल्युशन्स व स्वयं टॉक्स फाउंडेशन हे असोसिएट पार्टनर्स तर खिंवसरा ग्रुप यांनी हॉस्पिटॅलिटी पार्टनरची जबाबदारी उचलली होती.
'स्वयं टॉक्स' तर्फे असे मेंदूला टॉनिक देणारे कार्यक्रम महाराष्ट्रात निरनिराळ्या ठिकाणी होणार आहेत. लोकांसमोर सादर झालेले सर्व टॉक्स व मुलाखती नंतर त्यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरदेखील उपलब्ध करण्यात आले आहेत. swayamtalks.org तसेच swayam talks या युट्युब चॅनेलवर तुम्हाला ते पाहता येतील.
हा उपक्रम समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी 'सकाळ' समूहाने पुढाकार घेतला आहे. ऑगस्ट २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत महाराष्ट्रातील ११ शहरांमध्ये हा उपक्रम 'सकाळ' समूहाच्या सहकार्याने होणार आहे. 'स्वयं टॉक्स'साठी जमलेल्या प्रेक्षकांमध्ये विविध क्षेत्रातील विद्यार्थी, उद्योगपती, व्यावसायिक, कलाकार, बुद्धिवंत अशा विविध क्षेत्रांतील लोकांचा समावेश असतो! या कार्यक्रमात आल्यावर अशा अनेक मान्यवरांना भेटण्याची संधीदेखील मिळू शकते. ज्यांना नवीन काही ऐकण्याची, शिकण्याची आणि करण्याची इच्छा असलेल्या लोकांनी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावायला हवी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.