पाचोड (जि.औरंगाबाद) : गतवर्षी सोन्याचा भाव मिळविलेल्या मोसंबीचे दर आता अचानक दक्षिण भारतातील वातावरणात झालेल्या बदलांमुळे कमालीचे घसरल्याने मोसंबी उत्पादक आर्थिक कोंडीत सापडला आहे. टनामागे ४० ते ५० हजार रुपयांची घसरण झाल्याने मोसंबी उत्पादकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरून त्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. पन्नास ते पंचावन्न हजार रुपयांपर्यंत प्रतिटन भाव मिळविलेली मोसंबी (Aurangabad) सध्या पाच ते पंधरा हजार रुपये प्रतिटनाप्रमाणे विक्री होत असून शेतकरी पूर्णत: नागवला. त्यांचे आर्थिक गणित पूर्णतः विस्कटले गेले. त्यामुळे पाचोडसह (ता.पैठण) (Paithan) चौफेर मोसंबी उत्पादकांना आर्थिक फटका बसून मोसंबी उत्पादकांवर मोसंबीपेक्षा कापुस बरा म्हणण्याचा दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे. तुर्तास मोसंबी पाचशे ते पंधराशे रुपये तर कापूस आठ ते साडेआठ हजार प्रतिक्विंटलप्रमाणे विक्री होत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. (Sweet Lemon Price Come Down, Farmers In Trouble Aurangabad Latest News)
तूर्तास उत्पादकांसाठी मोसंबी आंबट तर ग्राहकांसाठी गोड झाली असून रस्त्यावर स्टॉल लावून मोसंबी विक्रीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. मागील आठ -दहा वर्षांपासून मराठवाड्यात दुष्काळी स्थिती निर्माण होऊन पाण्याअभावी मोसंबीच्या बागांवर कुर्हाड चालवण्याची नामुष्की मोसंबी उत्पादकावर येऊन हजारो बागा तोडल्या गेल्या. बिकट स्थितीत मोसंबी उत्पादकांनी निसर्गासमोर हार न पत्करता टॅंकरच्या पाण्यावर बागा जगविल्या. गतवर्षा पासून मर्यादेपेक्षा अधिक पाऊस झाल्याने मोसंबीस फायदा होण्याऐवजी तोटाच अधिक झाला. हलक्या व माळरानातील मोसंबीला मात्र या पावसाचा लाभ झाला. त्यांचे बऱ्यापैकी उत्पादन निघू लागले. चार महिन्यापूर्वी आंबा बहराची मोसंबी पन्नास ते पंचावन्न हजार रुपये प्रतिटन विकली जाऊन मागील उच्चांक मोडला गेला. त्यामुळे शेतकर्यांनी पुन्हा नव्या उमेदीने बागांना नवसंजीवनी देत दुप्पट उत्पन्न घेण्याचा मनसुबा आखला. अन् त्यातच पुन्हा निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना फटका बसण्यास सुरवात झाली. दक्षिण भारतात पडलेली थंडी, पावसाची हजेरी अन् बाजारपेठेत विक्रीसाठी आलेली विविध फळे, आंध्राची मोसंबी आदींमुळे परदेशात मजल मारणारी मराठवाड्याची मोसंबी कोमेजली गेली. अन् स्थानिक मोसंबीचे भाव कमालीचे गडगडले. यातून शेतकर्यांना लाखों रुपयांचा फटका बसत आहे. अनेक उत्पादकांनी भाववाढीच्या अपेक्षेने आंबा बहराची फळे विक्री न करता झाडावर ठेवल्याने त्यास मगरी लागून फळांची मोठी नुकसान झाली.
त्यातच मृग बहरातील मोसंबीचे उत्पादन निघायला सुरुवात होताच. त्यास सुरवातीला बारा ते सतरा हजारांचा प्रतिटन भाव मिळाला व आता तर दोन्ही बहाराच्या फळांना चक्क पाच ते पंधरा हजार प्रतिटनापेक्षा अधिक दराने कुणी खरेदी करण्यास इच्छुक नसल्याने शेकडो टन मोसंबी झाडावर आहे. अपेक्षित दरासाठी फेब्रुवारीची वाट पाहावी लागणार आहे. नेहमी गजबजलेल्या येथील मोसंबीच्या बाजारपेठेत शुकशुकाट पाहावयास मिळत असुन गरजु व्यक्ती दोन -पाच टन मोसंबी विक्रीसाठी तुर्तास गरज भागवितांना पाहावयास मिळतो. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात मोसंबीची आवक कमालाची घटली असून दररोज तिनशे टनाचा पल्ला गाठलेली आवक दहा-पाच टनावर येऊन ठेपली आहे. विशेष म्हणजे मागील चाळीस वर्षांनंतर यंदा प्रथमच मोसंबीला चांगला भाव मिळू लागला होता. यामुळे शेतकर्यांच्या चेहर्यावर हास्य फुलले होते. परंतु आंध्राच्या मोसंबीचे आगमन व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हिरावला गेला. अतिवृष्टीमुळे यंदा मोसंबीचे उत्पादन कमी असल्याने बाजारात मागणी वाढुन मोसंबीने भाव खाल्ला होता. आता सर्वत्र मोसंबीचे दर गडगडल्याने शेतकर्यांना लाखोंचा फटका सोसावा लागत आहे.
आंध्राच्या मोसंबी सोबत अन्य फळांची दिल्ली, अहमदाबाद, सुरत, आग्रा, नागपूर, हैदराबाद, मुंबई, पुणे, कलकत्ता आदी बाजारपेठेत आवक वाढल्याने स्थानिक मोसंबीची कोंडी झाली. त्यातच मोसंबी हे नाशवंत असल्याने त्यास अधिक काळ टिकवून ठेवू शकत नाही. दररोज दिल्ली येथे आंध्राची शेकडो ट्रक मोसंबी विक्रीसाठी येत असल्याने मराठवाड्यातील मोसंबीला फटका बसत आहे. आणखी दीड -दोन महिने अशी स्थिती राहील.
- शिवाजी भालसिंगे, व्यापारी, पाचोड
बऱ्यापैकी उत्पन्नाच्या आशेपायी ठेवलेली मोसंबी बाजारात पाच ते पंधरा हजार रुपये टनाप्रमाणे विकत असल्याने आमचं आर्थिक गणितच विस्कटलं. मोसबी पाचशे रूपये तर कापूस आठ हजार रुपये प्रतिक्विंंटलने विकत असल्याचे पाहुन मोसंबीपेक्षा कापुस बरा असे वाटु लागले. मोसंबीच्या बागेवर लाखो रुपये खर्च करूनही पदरात तोटाच पडत आहे.
- बाबुतात्या गोजरे, मोसंबी उत्पादक, वडजी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.