Assembly Election 2024 : ठाकरे गटाचे शहरप्रमुख शिंदे गटात....आठवडाभरात आणखी बडे पक्षप्रवेश : राजेंद्र जंजाळ
छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गट, शिंदे गटात फोडाफोडी करण्याच्या तयारीत असतानाच शिंदे गटाने ठाकरे गटाला हादरा दिला आहे. छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे ठाकरे गटाचे शहरप्रमुख विजय वाघचौरे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी रविवारी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला.
छत्रपती संभाजीनगरमधील संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातील शिंदे गटाचे विद्यमान आमदार संजय शिरसाट यांना झटका देण्यासाठी शिवसेना (ठाकरे) प्रयत्नशील असून शिंदे गटातील अस्वस्थ आणि नाराज पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न करीत आहे. त्या आधीच शिंदे यांच्या शिवसेनेने रविवारी ठाकरे यांच्या शिवसेनेला दणका दिला.
रविवारी मुंबईत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाचे शहरप्रमुख आणि माजी सभापती विजय वाघचौरे, उपजिल्हाप्रमुख संजय बारवाल, माजी नगरसेविका शोभा काळे, विभाग प्रमुख योगेश ठाकूर, निखिल तिवारी, संतोष बोर्डे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख सागर वाघचौरे, संतोष बारवाल यांनी शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला. ठाकरे गटातील हे सारे पदाधिकारी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे निकटवर्ती मानले जातात.
या प्रवेशाच्या वेळी आमदार संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांची उपस्थिती होती. ‘सकाळ’शी बोलताना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ म्हणाले, वाघचौरे यांना पश्चिमचे शहरप्रमुख नियुक्त करण्यात आले असून विद्यमान शहरप्रमुख विकास जैन यांच्याकडे सहसंपर्क प्रमुख पद देण्यात आले आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे पश्चिम मतदारसंघातील अस्तित्व लवकरच संपणार असून येत्या आठवडाभरात ठाकरे गटाचे माजी महापौर, तसेच अनेक पदाधिकारी प्रवेश करणार आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.